LPG Gas Cylinder Price : १ जुलै 2025 पासून एलपीजी गॅसच्या नवीन किंमती जाहीर झाल्या आहेत. 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या किंमतीत दिल्लीत 60 रूपयांनी लक्षणीय घट झाली आहे मात्र घरगुती सिलेंडरच्या किंमतीत मात्र कोणतेही बदल झालेले नाहीत.
दिल्ली : 01/07/2025
सगळ्या दैनंदिन गरजेच्या वस्तूं आणि सेवांमध्ये महागाई वाढत असताना, आता सामान्यांना थोडा दिलासा मिळाला आहे. आता 1 जूलै पासून तेल विपणन कंपन्यांनी एलपीजी गॅस सिलेंडरचे( LPG Gas Cylinder Price) नवे दर जाहीर केले आहेत. यात व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत लक्षणीय कपात करण्यात आली आहे. यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
तेल विपणन कंपन्यांनी एलपीजी गॅस सिलेंडरचे नवे दर जाहीर केले आहेत. 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीत लक्षणीय घट झाली आहे. दिल्लीपासून वाराणसीपर्यंत हा सिलेंडर 60 रुपयांपर्यंत स्वस्त झाला आहे. ज्यामुळे हॉटेल, रेस्टॉरंट आणि इतर व्यावसायिक आस्थांपनांना फायदा होईल. मात्र घरगुती सिलेंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही.
व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत कपात
देशातील विविध शहरांमध्ये 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत 57 ते 60 रुपयांपर्यंत कपात झाली आहे. दिल्लीमध्ये व्यावसायिक एलपीजी सिलेंडर 1723.50 रुपयांना होता, पण आता हा सिलेंडर 1665 रूपयांना मिळणार आहे. तर कलकत्त्यामध्ये 1826 रुपयांना विक्री होणारा सिलेंडर 1769 रुपयांना मिळणार आहे. तसेच मुंबईत हा सिलेंडर आता 1616 रूपयांना मिळेल. तर चेन्नईमध्ये त्याची किंमत 1823.50 रूपये इतकी झाली आहे.
दरम्यान सर्वसामान्यांसाठी दिलासादायक बाब म्हणजे 14 किलोच्या घरगुती सिलेंडरच्या किंमतीत मात्र कोणताही बदल करण्यात आलेला नाही. दिल्लीसह मुंबई, कलकत्ता या शहरात घरगुती सिलेंडरची किंमत साधारण 8०० ते ९०० रुपये आहे. हा सिलेंडर सरकारी अनुदानाच्या (सबसिडी) कक्षेत येतो, ज्यामुळे लोकांना आधीच काही प्रमाणात दिलासा मिळत आहे.
| शहर | घरगुती सिलेंडरची किंमत (रूपये) |
| दिल्ली | 853.00 |
| पाटणा | 942.50 |
| लखनऊ | 890.50 |
| मुंबई | 852.50 |
| हैद्राबाद | 905.00 |
| गाजियाबाद | 850.50 |
| वाराणसी | 916.50 |
उज्ज्वला योजना
सरकार उज्ज्वला योजनेअंतर्गत 10 कोटी लाभार्थ्यांना सिलेंडरवर 300 रूपयांची थेट सबसिडी दिली जाते. यासाठी 2025-26 च्या अर्थसंकल्पात 11100 कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. या योजनेमुळे दुर्बळ घटकातील लोकांना मोठा आधार मिळतो. घरगुती वापरात्या गॅस किंमतीत घट झालेली नाही, मात्र वाढही न झाल्यामुळे सामान्यांना दिलासा मिळाला आहे.