X

Translate :

Sponsored

Leaning Tower of Pisa – Italy – (built between 1173 AD and 1370 AD)

लिनिंग टॉवर ऑफ पिसा (Leaning Tower)– इटली – (निर्माणकाळ  इ.स. ११७३ ते इ.स. १३७० )

युरोप खंडातील अनेक सुंदर देशांपैकी एक, परंतु तरीही इतर अनेक देशांपेक्षा वेगळा वाटणारा देश म्हणजे इटली. इतर युरोपीय देशांपेक्षा येथील हवामान, वास्तूशैली भिन्न आहेत. इटलीमधील अनेक एतिहासिक वास्तू आणि ते निर्माण करणारे अनेक कलाकार जागतिक पटलावर प्रसिद्घ पावलेले आहेत. त्यातल्या ‘लिनिंग टॉवर ऑफ पिसा’ या एका अफलातून वास्तूविषयीची माहिती आपण ‘मिसलेनियस वर्ल्ड’ च्या माध्यमातून घेणार आहोत.

लिनिंग टॉवर (Leaning Tower)ऑफ पिसा कुठे आहे ?

ही वास्तू युरोपमधल्या ‘इटली’ या देशातील ‘पिसा’ या शहरात आहे. इटलीच्या पर्यटनामधील ‘लिनिंग टॉवर ऑफ पिसा’ ही एक लोकप्रिय वास्तू आहे. या वास्तूच्या निर्मितीची कथा, त्याच्या बांधकामाला लागलेला वेळ, बांधकाम पूर्ण करण्यासाठी करण्यात आलेले अनेक प्रयोग या सगळ्याविषयीची माहिती फार मनोरंजक आहे.

या वास्तूला मराठी भाषेत ‘पिसाचा कलता मनोरा’ (Leaning Tower) असे म्हणतात.

कसे आहे या वास्तूचे स्वरूप ?

युरोपमधील सर्वच देश त्यांच्या निसर्गसौंदर्यसाठी प्रसिद्ध आहेत. तसेच येथील अनेक शहरांमधील भव्य चर्च आणि संग्रहालयांसाठीही हे देश प्रसिद्ध आहेत. अनेक वैशिष्ट्यपूर्ण वास्तूशैली असणारे चर्चेस हे पर्यटकांसाठीचे मुख्य आकर्षण असतात. अशाच एका चर्चचा एक भाग असणारा हा ‘पिसाचा मनोरा’ (Leaning Tower) मात्र जगभरात त्या एका भागासाठीच जास्त प्रसिद्ध पावला आहे हे विशेष.

तो कधी बांधला गेला ? कसा बांधला ? आणि हा मनोरा का इतका प्रसिद्ध पावला ? ते आपण पाहू.

कधी बांधण्यात आला हा पिसाचा मनोरा ?

इ.स.११७३ च्या वर्षात ह्या मनोऱ्याच्या बांधकामास सुरूवात करण्यात आली. सुरुवातीलाच हा मनोरा आठ मजली असणार अशी घोषणा याच्या निर्मीतीकाराकडून करण्यात आली होती. मात्र चर्चच्या ज्या आवारात हा मनोरा बांधण्याची सुरूवात करण्यात आली तेथील जमीन ठिसूळ असल्याचे निर्दर्शनास आले. त्यामुळे या मनोऱ्याचा पाया ठिसूळ निर्माण झाला. त्यामुळे सुरूवातीचे तीन मजले बांधून झाल्यावर, मजूरांच्या असे लक्षात आले की, हा मनोरा एकाच बाजूने कलला जात आहे. म्हणजे एका बाजूने झुकतो आहे. त्यामुळे याचे बांधकाम थांबवण्यात आले.

पिसाचा रचनाकार

‘बोनानो पिसानो’ हे या मनोऱ्याचे वास्तूरचनाकार होते. हे इटालियन शिल्पकार होते. त्यांचा जन्म इटली मधील ‘पिसा’ येथे झाला आणि ‘पिसा’ हे शहरच आयुष्यभर त्यांची कर्मभूमी राहीली. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांना पिसाच्या याच झुकत्या मनोऱ्याच्या पायथ्याशीच दफन करण्यात आले. बोनानोने पिसा मनोऱ्यातील (Leaning Tower) अनेक मुख्य भागांच्या निर्मीतीत आपला ठसा उमटवलेला आहे. पिसाच्या कॅथड्रेलचे (चर्चचे ) कांस्य धातूमधील काही भाग ही बोनानोची निर्मीती होती, मात्र १५९५ मध्ये लागलेल्या आगीत तो भाग नष्ट झाला. या चर्चच्या सॅन रानीरी गेटच्या उजव्या बाजूचे कामही  बोनाने यांनी केले आहे. ज्यावर येशू ख्रिस्ताच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटनांचे चित्रण करण्यात आले आहे.मोनरेल कॅथड्रेल गेट ११८५ ते ११८६ दरम्यान बांधून पुर्ण केल्यावर बोनाने याने त्या गेटवर बोनानो सिव्हीस पिसानस अशी स्वाक्षरी केली होती.

मनोऱ्याचा आकार

हा मनोरा (Leaning Tower) आठ मजली आहे. त्याची उंची ५६ मीटर असून या संपूर्ण बांधकामासाठी सुमारे दोन शतकं इतका प्रचंड कालावधी लागला.

मनोऱ्याचा झुकण्याचा प्रवास

इ.स. ११७३ मध्ये या मनोऱ्याच्या (Leaning Tower) बांधकामास सुरूवात झाल्यावर सुरूवातीचे तीन मजले व्यवस्थीत बांधून पूर्ण झाले. मात्र कमकुवत पाया, पायाखालील ठिसूळ जमीन या अनेक कारणांमुळे ११७८ मध्ये हा मनोरा (Leaning Tower) एका बाजूला कलण्यास सुरूवात झाली. त्यानंतर त्याचे काम बंद झाले. या दरम्यान अनेक तांत्रिक अडचणी आणि राजकीय अस्थैर्यामुळे पुढील अनेक वर्षे हे कामच ठप्प राहीले.

पुढे १२७२ ला हे काम परत सुरू करण्यात आले. सलग हे काम सुरू राहून १२७८ पर्यंत या मनोऱ्याचे सात मजले बांधून पूर्ण झाले. तीसऱ्या मजल्यापासून पुढच्या मजल्यांचे काम पूर्ण करताना पुढील मजल्यांची उंची खालच्या मजल्यांपेक्षा जास्त बांधण्यात आली, ज्यामुळे झुकणारा मनोरा सरळ राहील असे त्याच्या निर्माणकारांना वाटले. मात्र तरीही हा मनोरा झुकलेलाच राहिला. यामुळे पुन्हा या मनोऱ्याचे काम थांबवण्यात आले. पुढे १३७० मध्ये आठवा मजला बांधून एकदाचा हा मनोरा पूर्ण करण्यात आला. अशारितीने जवळजवळ दोन शतकांचा कालावधी या मनोऱ्याच्या निर्मीतीसाठी लागला असल्याचे दिसून येते.

अनेक तांत्रिक प्रयोग करून या मनोऱ्याचा तिरकेपणा घालवण्याचे अनेक प्रयत्न वेळोवेळी करण्यात आले. मात्र झुकावाच्या विरूद्ध पायाच्या बाजूला ६०० टन शिसे भरण्याचा प्रयोग बऱ्याच अंशी यशस्वी झाला.  आणि हा झुकाव कमी झाला.

मनोऱ्याविषयीच्या काही रंजक गोष्टी

१ या मनोऱ्याच्या आत एक घंटा आहे, ज्यातून सप्तसुरांचा आवाज निघतो.

२ तळमजल्यावर पंधरा कमानी आहेत. तर पुढील सहा मजल्यांना प्रत्येकी ३० आणि शेवटच्या मजल्याला १६ कमानी आहेत.

३ प्रसिद्ध शास्रज्ञ गॅलिलिओने गुरुत्वाकर्षण सिद्ध करण्यासाठी अनेक प्रयोग ह्याच मनोऱ्यावरून केले होते. याच मनोऱ्यावरून दोन वेगवेगळ्या वजनाच्या धातूचे गोळे खाली टाकून त्यांनी गुरूत्वाकर्षणाचे अनेक प्रयोग केले होते.

४ हा मनोरा अत्यंत सुरेख नक्षीकाम आणि पांढऱ्या शुभ्र संगमरवरी खांबांसाठीही विशेष आहे. मात्र गंमत अशी की हा मनोरा त्याच्या झुकणाऱ्या दोषासाठीच जास्त प्रसिद्ध झाला आहे.

५ पिसा चा हा मनोरा ३.९९ डिग्री कोनात झुकलेला होता. १९९० मध्ये तो ५.५ डिग्री पर्यंत झुकला होता. तेव्हा तो पर्यटनासाठी बंद करण्यात आला.

६ १९९० दरम्यान या मनोऱ्याचा झुकाव बंद करण्यासाठी सुमारे ४० बिलीयन डॉलर खर्च करण्यात आले.

७ पीसाच्या मनोऱ्याचे एकुण वजन १४, ५०० टन इतके आहे. याच्या एकुण पायऱ्या २९६ आहेत.

मनोऱ्याला भेट देण्याची वेळ

हा मनोरा (Leaning Tower) आणि चर्च आठवड्याचे सातही दिवस पर्यटकांसाठी खुले असते. फक्त युरोपमधील ऋतुमानानुसार त्यांच्या वेळांमध्ये बदल होत असतात. हिवाळ्यातील सप्टेंबर ते फेब्रुवारी महिन्यात सकाळी ९ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत खुले असते. तर मार्च मध्ये सकाळी ९ ते संध्याकाळी ७ पर्यंत खुले असते, तर एप्रिल, जून, जूलै, ऑगस्ट पर्यंत सकाळी ९ ते संध्याकाळी ८ वाजे पर्यंत खुले असते.

झुकणाऱ्या मनोऱ्याची सध्याची परिस्थिती

१९८७ ला पिसाच्या या मनोऱ्याला जागतिक वारसास्थळाचे स्थान देण्यात आले असले तरी त्याच्या कलण्याच्या समस्येवर उत्तर मिळाले नव्हते. त्यामुळे १९९० ला पर्यटनासाठी हा मनोरा बंद करण्यात आला.

मनोऱ्यावरील (Leaning Tower) वजन कमी करण्यासाठी त्यावरील सर्व अवजड घंटा काढण्यात आल्या. त्याच्या उंच भागाखालची ३८ क्युबिक मीटर माती काढण्यात आली. त्यानंतर २००८ मध्ये पुन्हा ७० मेट्रीक टन माती काढण्यात आली. हे करण्यामुळे पुढची दोनशे वर्षे तरी हा मनोरा ढासळण्याचा धोका नाही. २००८ पर्यंतच्या मनोऱ्याच्या कालखंडात हा मनोरा २००८ पासून कलण्याचे थांबले आहे.  

पिसाच्या मुख्य कॅथड्रेलविषयी

खरं तर झुकलेल्या मनोऱ्याने (Leaning Tower) इतकी प्रसिद्धी मिळवली आहे, की त्याच्या लगत असणारे सुंदर कॅथड्रेल (चर्च) विषयी फार थोडी माहिती घेतली जाते. मात्र एखाद्या पुराणकाळात आल्याप्रमाणे या चर्च आणि त्याच्या बाजूचा परिसर आहे. सुंदर आणि भव्य दरवाजा, बारीक कोरीव काम, भव्य चर्चचा हॉल अशा अनेक वैशिष्ट्यांमुळे चर्च पहाण्यासारखे आहे. धार्मिक कारणासह वास्तूशास्राचा अभ्यास करणाऱ्यांसाठी हा मोठा ठेवा आहे.

या चर्चच्या निर्मीतीची सुरूवात १०६४ मध्ये करण्यात आली. २६ सप्टेंबर १११८ मध्ये मोठ्या थाटामाटात या चर्चची स्थापना करण्यात आली होती. खरं तर हे कॅथड्रेल दोन टप्प्यात बांधण्यात आले. या चर्चची मुळ बांधणी वास्तूविशारद बुशेटो यांनी केली. ज्यांनी या कॅथड्रेलचे अनेक मुख्य भागांचे काम केले आहे.  

दुसऱ्या महायुद्धाच्या हानीतून वाचलेला हा अभेद्य मनोरा

दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान मीत्र राष्ट्रांनाही असे कळले होते की, जर्मन सैन्य या मनोऱ्याचा उपयोग करून युद्ध टेहळणी करत असतात. त्यांचे हे काम थांबवण्याच्या हेतूने अमेरिकन सार्जंटने हा मनोरा उद्धस्त करण्याचा निर्णय घेतला होता, मात्र ज्या सार्जंट टिम वर हा मनोरा उद्धस्त करण्याची जबाबदारी टाकण्यात आली होती, त्यांनी कदाचित याचे वारसास्थळ म्हणून असणारे महत्त्व ओळखून तो नष्ट न करण्याचा निर्णय घेतला होता.

आणि त्या एका निर्णयाने हा अनोखा मनोरा (Leaning Tower) आजही पर्यटकांसाठीचे आकर्षण म्हणून उभा आहे. पुढे १९८७ मध्ये पिसाच्या मनोऱ्याला जागतिक वारसा स्थान म्हणून घोषित करण्यात आले.

खरेदीसाठीचे उत्तम ठिकाण

युरोप मधील इटली देशातील पिसा हे ठिकाण खरेदीसाठी फार छान ठिकाण आहे. तुम्हाला दर घर सजवण्याची आवड असेल तर सजावटीचे अनेक प्रकार इथे तुम्हाला मिळतील.

भारतातील पर्यटन स्थळांच्या बाहेर जशी अनेक छोट्या दुकानांची गर्दी असते अगदी तशीच गर्दी इथे आहे. त्यामुळे ज्यांना खरेदीची फार आवड आहे त्यांच्यासाठी इथे खजिना आहे. ज्वेलरी, कपडे, खेळणी यांचे अनेक प्रकार इथे रास्त दरात आहेत.

किती वेळ लागतो याठिकाणाला भेट देण्यासाठी ?

पिसाचा मनोरा (Leaning Tower) आणि संपूर्ण कॅथड्रेल बघण्यासाठी तुमच्याकडे भरपूर वेळ हवा. खरं तर आजकाल मोबाईलमुळे सर्वांकडेच कॅमेरा असतो. ताजमहाल, पिसा अशा भव्य वास्तूंच्या समोर फोटो काढण्यासाठी सर्वचजण उत्सूक असतात. त्यामुळे या वास्तूच्या आवारातील प्रत्येक टप्प्यावर फोटोंसाठी गर्दी असतो. त्यामुळे भरपूर वेळ हाताशी असेल तर संपूर्ण परिसर तुम्ही व्यवस्थित पाहू शकता.  

जो कोणी भारतीय या कॅथड्रेलला भेट देईल त्याला आपल्या देशातील ‘ताजमहाल’ या भव्य वास्तूची आठवण नक्की येईल. येथील संगमरवरी खांब, त्यावरील पानाफुलांची नक्षी पाहून ताजमहालावरील कलाकृतीशी आपण तुलना करत रहातो.

इथे कॅथड्रेलच्या आवारात जाण्यासाठी शुल्क आकारले जात नाही. मात्र मनोऱ्यावरील मजल्यांवर जाण्यासाठी आणि कॅथड्रेलमधील मुख्य भागात जाण्यासाठी शुल्क आकारले जाते.

तेव्हा तुमची पर्यटनामधील आवड आणि तुमच्याकडे असणारा वेळ दोन्ही लक्षात घेऊन तुम्ही अशा ठिकाणांना भेट देणे चांगले. म्हणजे तुमचे पैसे आणि वेळ या दोन्हींचा उत्तम वापर करून तुम्ही एका सुंदर कलाकृतीचा आनंद घेऊ शकता.

ज्योती भालेराव.

This post was last modified on September 24, 2024 2:11 am

Sponsored
Jyoti Bhalerao:

View Comments (2)

Sponsored

This website uses cookies.

Sponsored