मिसलेनियस विशेष लेख : 05/18/2025
जागतिक संग्रहालय दिवस दरवर्षी 18 मे ला साजरा करतात. संग्रहालयं ही त्या त्या देशाच्या ऐतिहासिक, सांस्कृतीक, सामाजिक आणि राजकिय घटनांचे साक्षिदार असतात. संग्रहालयांमुळे सांस्कृतिक देवाणघेवाण होते. संस्कृतिचे जतन आणि संवर्धन होते. मागच्या पिढीचा वारसा जमपण्यास मदत होते. म्हणूनच जगभरात संग्रहालयं उभारली जातात. त्यांच्याविषयी जनमानसात जागृती निर्माण व्हावी, त्यांचे संवर्धन व्हावे या हेतूने जगभरात संग्रहालय दिवस साजरा केला जातो. आजच्या संग्रहालय दिवसाच्या (International Museum Day 18 May) निमित्ताने आपण ऐतिहासिक पुणे शहरातील काही प्रसिद्ध संग्रहालयांची माहिती काही भागात करून घेणार आहोत. त्यातला हा पहिला लेख.
या मालिकेतील पहिले संग्रहालय आहे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरीयल
Table of Contents
1 ) डॉ. आंबेडकर मेमोरियल
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, थोर समाजसुधारक आणि मानवतेचे पुजारी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक कार्याची
ओळख करून देणारे चिरंतन स्मारक पुण्यनगरीत आहे. बाबासाहेबांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटनांची छायाचित्ररूपी मालिका आणि त्यांच्या
दैनंदिन जीवनातील अनेक वस्तूंचा आठवणरुपी ठेवा येथे आहे. बाबासाहेबांच्या पत्नी डॉ. माईसाहेब आंबेडकर यांनी बाबासाहेबांच्या निधनानंतर त्यांचा
परिसस्पर्श झालेल्या वस्तू, त्यांचा पवित्र अस्थिकलश, भारतरत्न पदक व मानपत्र हा सगळा ऐवज संग्रहालय उभे करण्यासाठी दान केला. या संग्रहालयाची वास्तू बुद्धवास्तुकलेच्या शैलीतील आणि स्तूपाच्या आकारात बांधलेली आहे.
बाबासाहेबांच्या पांढऱ्याशुभ्र संगमरवरी अर्धपुतळयाच्या दर्शनाने या स्मारकाची सुरुवात होते. येथे बाबासाहेबांच्या जन्मापासून ते महानिर्वाणापर्यंतची, तसेच त्यांच्या आयुष्यातील अनेक महत्त्वाच्या घटनांची दुर्मिळ छायाचित्र पाहून ते ज्या तत्त्वांसाठी जगले त्याचा समर्पक परिचय आपल्याला होतो. हे संग्रहालय वेगवेगळ्या दालनांमध्ये विभागलेलेआहे. बाबासाहेबांनी मिळवलेल्या पदव्या, परदेश भ्रमण करीत असताना त्यांना मिळालेल्या भेटी याचे खास असे दालन आहे. बाबासाहेबांच्या रोजच्या वापारातील वस्तू, जेवणाचे भांडे आदी आणखी एका दालनात मांडून ठेवलेल्या आहेत. दुसऱ्या दालनात राज्यघटना लिहिताना त्यांनी वापरलेल्या विशिष्ट खुर्च्या आहेत.
याच ठिकाणी बाबासाहेब राज्यघटना लिहीत असतानाच्या अवस्थतेतील पुतळा आहे. ज्या खुर्चीत बसून त्यांनी राज्यघटनेची प्रत समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्याकडे सुपूर्द केली, ती खुर्चीही येथे पहायला मिळते. बाबासाहेबांचे निधन ज्या पलंगावर झाले तो पलंग, त्यावर लावलेले घड्याळ त्यांच्या निधनाची वेळ दाखवत आजही येथे पहायला मिळते. बाबासाहेबांच्या रोजच्या वापरातील भांडी, कपडे असा मोठा ऐवज येथे संग्रहित आहे. ठराविक मूल्य येथे भेट देण्यासाठी आकारले जाते. पुणे शहरातील हा ऐतिहासिक ठेवा एकदातरी नक्की बघायलाच हवा. बाबासाहेबांच्या रोजच्या वापरातील वस्तू, भांडी असा मोठा एवज येथे संग्रही आहे. ठराविक मूल्य येथे भेटीसाठी आकारले जाते. सेनापती बापट रस्त्यावरील हे संग्रहालय आवर्जून बघावे असे आहे.
2 ) नॅशनल वॉर म्युझियम – घोरपडी, पुणे
सांस्कृतिक आणि शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच पुणे शहर संग्रहालयांसाठीसुद्धा ओळखले जाते. केळकर संग्रहालय, महात्मा फुले संग्रहालय, बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय, अशी अनेक नावाजलेली संग्रहालय आहेत. परंतु नॅशनल वॉर म्युझियम हे असे एकमेव संग्रहालय आहे, जे लोकवर्गणीतून उभारण्यात आले आहे. याचा प्रस्ताव इ.स. १९९६ मध्ये मांडण्यात आला आणि दोन वर्षात ते आकाराला येऊन ऑक्टोबर १९९८ मध्ये खुले झाले. ज्या शूरवीरांनी देशासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली, त्यांची शौर्यगाथा येथे अनुभवायला मिळते.
हे संग्रहालय आपल्याला लष्कराच्या दक्षिण कमानच्या इतिहासाची सुरुवातीपासून ओळख करून देते. या संग्रहालयाचे मराठा एम्पायर, राजस्थान आणि मुख्य इमारत असे एकूण तीन भाग आहेत. संग्रहालयाची मांडणी अतिशय सुसंगत आहे. सैनिकी जीवनाविषयीची सामान्यजनांची उत्सुकता हे संग्रहालय पूर्ण करते. मुख्य इमारतीचे दोन भाग आहेत. पहिल्या भागात आंतरराष्ट्रीय युद्धाच्या वेळची छायाचित्रे, इतर देशांचे झेंडे, लष्कराची विविध चिन्हे, आपल्या लष्कराचे वेगवेगळ्या प्रदेशासाठी वापरण्यात येणारे झेंडेही येथे पाहायला मिळतात.
तर दुसऱ्या भागात देशातील अंतर्गत संकटांमध्ये लष्कराने केलेल्या मदतकर्यांची छायाचित्रे व माहिती आहे. तसेच सैनिकांना दिली जाणारी विविध पदकेही येथे पाहायला मिळतात. मराठा, राजस्थान एम्पायर, या विभागामध्ये त्या त्या प्रदेशात पूर्वी होऊन गेलेल्या शूरवीरांची माहिती व त्यांची छायाचित्रे लावण्यात आली आहेत. हे संग्रहालय खूपच प्रेरणादायी आहे. प्रत्येक देशाभिमानी व साहसाची आवड असणाऱ्यांनी येथे आवर्जून भेट द्यायला हवी. हे संग्रहालय निःशुल्क असून, घोरपडी पुणे येथे आहे.
3 ) पिंपरी -चिंचवड सायन्स पार्क – पिंपरी चिंचवड, पुणे
अश्मयुगापासून आजच्या संगणक युगापर्यंतचे अनेक वैज्ञानिक शोध कसे लागले. त्यामागील कारणीमीमांसा हसतखेळत समजून घेण्याचे ठिकाण म्हणजे पिंपरी-चिंचवड येथे उभारण्यात आलेले सायन्स पार्क होय. महानगरपालिकेच्या सुमारे ७ एकर क्षेत्रफळावर सायन्स पार्कचा विस्तार आहे. विज्ञानातील अनेक शोध, संदर्भ इमारतीमध्ये प्रदर्शन स्वरूपात आहेत. तर दुसऱ्या भागात खुल्या उद्यानामध्ये विज्ञानाची तत्त्वे उलगडणारी खेळणी ठेवण्यात आलेली आहे. मुख्य इमारतीमध्ये स्वयंचलित वाहने, ऊर्जा, 3 डीसायन्स शो, मनोरंजक विज्ञान, हवामान परिवर्तन, तारामंडल इत्यादी प्रदर्शन आहेत. यठिकाणी विज्ञानातील अनेक मूलभूत शोध त्यांच्या माहितीसह प्रतिकृती स्वरूपात आपल्याला पहायला मिळतात.
स्वयंचलित वाहनांचा विभाग या क्षेत्रात आवड असणाऱ्या तरूणांसाठी खूपच माहिती देणारे आहे. वाहनांची अंतर्गत रचना पाहण्याची संधी मिळावी यासाठी वाहनांच्या छेद दिलेल्या प्रतिकृती, त्रिमितीय दृश्ये वाहनांचे सुटे भाग येथे ठेवण्यात आलेले आहे. याशिवाय संग्रहालयासमोरील विज्ञान उद्यान लहान मुलांचे आकर्षण केंद्र आहे.
या उद्यानातील भारतीय वैज्ञानिकांचे बसवण्यात आलेले अर्धाकृती पुतळे पाहून व त्यांच्याविषयची माहिती वाचून लहान मुलांना नक्कीच प्रोत्साहन मिळते. याशिवाय ३ डी शो, तारामंडल, विज्ञान प्रात्यक्षिक कट्ट्, बाल कट्टा, आकाश दर्शन अशा अनेक अभिनव संकल्पना मुलांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण करणाऱ्या आहेत. सोमवार व्यतिरिक्त सकाळी 10 ते सायंकाळी 5 यावेळेत पर्यटकांसाठी सशुल्क खुले असते. विज्ञानाचा वारसा जपणाऱ्या या वारसास्थळाला नक्की भेट द्यायला हवी.
4 ) राजा दिनकर केळकर संग्रहालय – पुणे
शिवकालोत्तर हिंदुस्थानाचा इतिहास सांगणाऱ्या आणि त्या काळी वापरात असणाऱ्या पारंपरिक वस्तूंचा संग्रह असलेले राजा दिनकर केळकर संग्रहालय हे पुण्याचे भूषण आहे. या संग्रहालयाचे संस्थापक डॉ. दिनकर गंगाधर केळकर हे अतवासी नावाने ऐतिहासिक कविता करीत. त्या छंदातून ते इतिहासकालीन वस्तू जमवू लागले. ६५ वर्षे भारतभ्रमण करून त्यांनी जवळजवळ २० हजार वस्तूंचा संग्रह जमवला.
या पुरातन, ऐतिहासिक वस्तू मांडणी एकुण ९ दालने आणि ४० विभागांत केलेली आहे. वनिताकक्ष, स्वयंपाकघरातील भांडे, हस्तीदंत, वस्त्रप्रावरणे, दिवे, अडकित्ते, दौती, खेळणी, वाद्ये, मस्तानी महाल, दरवाजे अशी विभागणी आहे. मस्तानी महाल हा या संग्रहालाचे आकर्षण बिंदू आहे. बाजीराव पेशव्यांनी कोथरूड येथे इ.स. 1734 मध्ये मस्तानीसाठी महाल बांधलेला होता. केळकरांनी कुशल कारागिरांच्या मदतीने मूळ ठिकाणाहून हा महाल सोडवून त्याची या ठिकाणी पुर्नबांधणी केली. हा महाल बघून त्या काळच्या वैभवाची प्रचिती येते.
तत्कालीन व्यवहारांचा, राहणीचा अंदाज बांधता येतो. तब्बल पाच तप हौस म्हणून जमा केलेला हा संग्रह केळकरांनी इ.स. १९७५ ला सरकारला देणगी म्हणून दिला. या संग्रहालयाला केळकर दांम्पत्याने आपल्या लाडक्या दिवंगत लेक राजा यांचे नाव दिले आहे. येथे भेट देण्यासाठी ठराविक शुल्क आकारले जाते.
5 ) महर्षी कर्वे संग्रहालय – कर्वे नगर , पुणे
अलौकिक समाजकार्य करण्यात ऋषितुल्य व्यक्तिमत्वाचा संपूर्ण जीवनपट म्हणजे कर्वे संग्रहाल. महर्षी धोंडो केशव कर्वे उर्फ अण्णा यांनी
१९०० मध्ये पुण्याजवळील हिंगणे येथे एक झोपडीवजा घर बांधून तिथे स्त्री-शिक्षणाच्या कार्याची सुरुवात केली. आज या ठिकाणी मोठ्या निसर्गरम्य परिसरात संस्थेचे काम आणि हे संग्रहालय मोठ्या दिमाखात उभे आहे. डॉ. कर्वेंच्या उल्लेखनीय आयुष्याची माहिती, छायाचित्रे व माहितीपटांमधून आपल्याला तेथे मिळते. हे संग्रहालय एकूण तीन दालनांमध्ये विस्तारलेले आहे. बालपणीच्या आठवणी, शिक्षण सुरुवातीचा काळ अशा अनेक घटनाक्रमाने पहिले दालन सजवण्यात आले आहे.
दुसऱ्या दालनात कर्वेंच्या पुनर्विवाह, कार्याची सुरुवात, त्यांनी सुरु केलेल्या स्त्री शिक्षणाच्या कार्यात सहभागी झालेल्या स्त्रिया यांची अनेक छायाचित्रे आहेत. याच दालनामध्ये अण्णांच्या वैयक्तिक वापरातल्या वस्तू, जसे त्यांचा चष्मा, टोपी, काठी, कोट, पदवीदान समारंभाच्या वेळेचा गाऊन अशा अनेक वस्तू आहे. अण्णांना महर्षी का संबोधले जात असे, हे त्यांच्या साध्या व विनम्र राहणीमानावरून लक्षात येते. तिसऱ्या दालनात त्यांचा परदेश प्रवास, आईन्स्टाईनसारख्या विख्यात शास्त्रज्ञाची भेट, कुटुंबाची माहिती चित्ररूपाने आहे. त्यांचे पासपोर्टही येथे पहायला मिळतात.
येथील महत्त्वाचे आकर्षण म्हणजे महर्षी कर्वेना मिळालेले भारतरत्न व पदमविभूषण पुरस्कार व पदके येथे ते मुळ स्वरूपात आहेत. संग्रहालयाच्या बाहेर एका सुंदर कुटीवजा जागेत अण्णा व त्यांच्या कार्यात तणमानाने आयुष्यभर साथ देणाऱ्या त्यांच्या द्वितीय पत्नी आनंदी उर्फ बाया कर्वे यांचे समाधी स्थान आहे. आण्णांचा मोठा ब्रॉन्झचा पुतळा व बाया कर्वेंची प्रतिमा पाहून समाजकार्यासाठी आयुष्य अर्पण करणाऱ्या एका अतुल्य दाम्पत्यजीवनाची आपल्याला प्रचिती येते. असा भारावून टाकणारा आयुष्यपट समजून घेण्यासाठी संग्रहालयाला प्रत्येकाने भेट द्यायला हवी.
पुणे शहरात अनेक प्रसिद्ध आणि प्रसिद्धी न मिळालेले असे संग्रहालयं आहेत. पुढील संग्रहालयांची माहिती पुढील भागात घेऊ.
क्रमशः