पुणे : 2025-06-15
Indrayani River Accident : पुण्यामधील मावळमधल्या कुंडमळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळण्याची धक्कादायक घटना घडल्यानंतर आजा बचावकार्यासाठी एनडीआरएफची टीम याठिकाणी दाखल झालेली आहे. या दुर्घटनेत 20 ते 25 पर्यटक नागरिक वाहून गेलेले आहेत. वाहून गेलेल्या पर्यटकांना वाचवण्यासाठी बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.
दरम्यान, अंधार पडण्यास सुरूवात झालेली असल्याने बचाव कार्याला वेग आलेला आहे. काही नागरिकांना पाण्यातून बाहेर काढण्यात एनडीआरएफच्या जवानांना यश आलेलं आहे. तर कोसळलेल्या पूलात देखील काही लोक अडकून पडलेले आहेत. त्यांना बाहेर काढण्यासाठी लोखंडी पूल कापून बचावकार्यात केलं जात आहे.
आज रविवार असल्याने येथे पर्यटकांची गर्दी होती. याच दरम्यान दुपारी साडेतीनच्या सुमारास हा पूल कोसळला. घटनास्थळी बचाव कार्य सुरू आहे, काही पर्यटकांचा जीव वाचवण्यात यश आलं आहे. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत या घटनेतील मृतांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ?
पुणे जिल्ह्यातील तळेगावनजीक इंदोरी येथे इंद्रायणी नदीवरील एक पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेचे वृत्त एकुण अतिशय दुःख झाले. या घटनेत प्राथमिक माहितीनुसार 2 लोकांचा मृत्यू झाला आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. या घटनेसंदर्भात विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि संबधित तहसीलदार यांच्याशी मी सातत्याने संपर्कात आहे. काहीजण वाहून गेल्याने त्यांचा युद्धपातळीवर शोध घेतला जात आहे. घटनास्थळी एनडीआरएफला पाचारण करण्यात आले आहे. मदत कार्याला तातडीने वेग देण्यात आला आहे. 6 जणांना आतापर्यंत वाचवण्यात यश आले आहे. सर्व यंत्रणांना अलर्ट मोडवर ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 32 लोक जखमी झाले, त्यापैकी 6 गंभीर आहेत. त्यांना उपचारांसाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्वतःविभागीय आयुक्त घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत, असे ट्विट फडणवीस यांनी केले आहे.
पुण्यातील इंद्रायणी नदीवर असलेला पूल कोसळण्याची घटना घडली आहे. मावळमध्ये असलेल्या कुंड मळ्यात ही घटना घडली आहे. या घटनेत 20 ते 25 भाविक वाहून गेल्याची माहिती समोर आली आहे. तर आतापर्यंत दोघांचे मृतदेह हाती लागले आहेत. घटनास्थळी बचाव कार्य सुरू असून, काही पर्यटकांचा जीव वाचवण्यात यश आले आहे.