Table of Contents
संग्रहालय कशी पहावीत ? भारतातील महत्त्वाची संग्रहालये (Museums)!
संग्रहालयांची निर्मीती कशी झाली असेल, ती का निर्माण करावीशी वाटली असतील याचा जर विचार केला तर असे वाटते की,आपण जे ज्ञान प्राप्त केले आहे, ज्या काही कलाकृती निर्माण केल्या गेल्या असतील त्याचा प्रसार पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशानेच संग्रहालये निर्माण करण्यात आली असावीत.
संग्रहालय (Museums) ही देशाची, शहराची फार मोठी वारसास्थळे (Heritage) असतात. जुन्या आणि नविन पिढीची सांस्कृतिक, सामाजिक ठेव त्यामुळे जतन होत असते. संग्रहालय म्हणजे फक्त फिरण्याची जागा नसून, ते ज्ञान मिळवण्याचे ठिकाण आहे. तिथे फक्त वस्तूंचा संग्रह केलेला नसून त्यातून कला, संस्कृती, इतिहास, विज्ञानाविषयीची माहिती समजण्यास आपल्याला मदत होते.
संग्रहालयात (Museums) ठेवण्यात येणाऱ्या वस्तूंना विशिष्ट संदर्भ असतात. आपल्याला इतिहासाशी, वेगवेगळ्या विषयांशी जोडून घेणारा तो एक महत्त्वाचा दुवा असल्याकारणाने या संग्रहालयांना भेट देताना याची जाण असणे आवश्यक आहे.
ग्रीक आणि रोमन पुराणकथांनुसार कला, विज्ञान, साहित्य यांच्या नऊ अधिष्ठात्री देवता मानल्या गेल्या आहेत. त्यांना मिळून ‘म्युझेस’ असे म्हटले जाते. त्यांच्यावरूनच ‘म्युझियम’ हा शब्द रूढ झाला आहे. कला, विज्ञान, इतिहास, मानवी संस्कृती यांच्याशी निगडित महत्त्वाच्या वस्तूंचे जिथे जतन आणि प्रदर्शन केले जाते त्या जागेला आपण वस्तुसंग्रहालय म्हणतो. मात्र ही संग्रहालये (Museums) कशी पाहावी, त्यासाठी सुजाण प्रेक्षक कसे व्हावे, याविषयाची सजगता पर्यटकांमध्ये असणे फार महत्त्वाचे आहे. तरच अशी निर्माण झालेली संग्रहालये टिकतील आणि वाढतील.
संग्रहालयाला भेट देताना आपला तेथे भेट देण्याचा उद्देश काय आहे हे समजून घेतले पाहिजे. काहीजण फक्त मनोरंजनासाठी अशा भेटी देतात तर काहीजण विशिष्ट अभ्यासाच्या हेतूने तिकडे जात असतात. सामान्य प्रेक्षकाने संग्रहालय (Museums) पाहण्यापूर्वी आपल्याला किती वेळ आहे ? उपलब्ध वेळेत नेमके काय आणि किती पाहता येईल, याचा विचार करावा. संग्रहालयात केलेली वस्तूंची मांडणी ही विशिष्ट हेतूने आणि ठरावीक पद्धतीने केली जाते. ते वर्गीकृत प्रदर्शन असते.
अशा संग्रहालयांना भेट देताना पुढील उद्दीष्ट ठेवल्यास तुमची भेट ज्ञानार्जित होण्यास मदत होईल.
- संग्रह पाहताना मांडलेल्या वस्तूंचे निरिक्षण करणे. त्या वस्तूचे दिलेले वर्णन व प्रत्यक्ष वस्तू यांची तूलना करणे. प्रदर्शनातील दोन वस्तूंची तुलना करून त्यांच्यातील साम्यभेद शोधणे.
- संग्रहालयात वस्तूंची मांडणी विशिष्ट क्रमाने केलेली असल्याने मांडणी संदर्भात वस्तूंच्या विशेष गुणधर्मात होणारे बदल शोधणे, त्यांचा होत जाणारा विकास समजून घेणे.
- प्रदर्शनातील वस्तूंचे गुणधर्म शोधणे व त्यांचे वर्गीकरण करणे.
- इतिहासाच्या मोठ्या कालखंडाचे संकलन करण्याचे कौशल्य शिकणे.
एतिहासीक,सांस्कृतिक आणि कलात्मक महत्त्व असणारे पुरातन अवशेष आणि कलाकृती सुरक्षित ठेवून त्यांचे जतन करण्यासाठी संग्रहालयांची (Museums) निर्मीती करण्यात येते. इतिहास, संस्कृती आणि कलात्मकतेच्या दृष्टीने ज्या काही गोष्टी उपलब्ध आहेत त्याद्वारे त्या त्या काळातील ज्ञानाचा प्रसार करणे हेच संग्रहालयांचा मुख्य उद्देश्य असतो. मात्र त्यांच्या विकासाचे टप्पे जाणून घेणेही मनोरंजक आहे.
संग्रहालयांचे (Museums) पूर्वरूप –
आदिमकालीन काळापासून दगडांवर, गुफांमध्ये कोरण्यात आलेली शिल्प, चित्र आदि कलाकृती संग्रहालयांचे प्राथमिक स्वरुपच म्हणता येतील. भारताच्या सर्व भागांमध्ये अशी गुंफाचित्र सापडतात. देव,दानव, प्राणी, पक्षी अशा अनेक बाबींविषयीचे चित्रण यात केलेले आढळते. अशा प्रकारच्या कलाकृती साकारून एकप्रकारे त्याकाळचे जीवनमान कसे होते, त्यावेळच्या जगण्यातील महत्त्वाचे घटक कोणते होते हे समजण्यासाठी अशा पद्धतिने चित्रण करून संग्रहित करून ठेवण्यात येत असे, असे आपण म्हणू शकतो.
भारतीय संग्रहालयांच्या (Museums) विकासातील टप्पे –
धार्मिक संग्रहालयांची (Museums) सुरुवात – मानवाच्या सामाजिक, सांस्कृतीक विकासासह त्याच्या धार्मिक संकल्पनाही विकसीत होत गेल्या त्यानुसार अनेक प्रकारच्या मंदिरांची निर्मिती करण्यात येऊ लागली. या काळात संग्रहालयांना एक नविन परिमाण मिळाले.
याठिकाणी वापरण्यात येणाऱ्या वस्तू पवित्र समजण्यात येतात. मंदिरात वापरण्यात येणाऱ्या अनेक वस्तू कालांतराने वापरात येत नसत. जसे की, शिखरमंडल, शंख, स्तंभ, देव प्रतिमा, मूर्ती, धर्म ग्रंथाच्या प्रती, धार्मिक चित्रे, लोक साहित्य,भांडी अशा अनेक वस्तू टाकून न देता मंदिराच्या आसपासच्या जागेत जतन करून ठेवण्यात येत असे.
कालांतराने त्यांचे संग्रहालयात रूपांतर करण्यात आल्याचे दिसून येते. भारतात अनेक ऐतिहासिक मोठ्या शहरांमध्ये अशी धार्मिक संग्रहालये आढळून येतात. त्यात महत्त्वपूर्ण शिलालेख, प्रतिमा संग्रहित करण्यात आल्या आहेत.
राजाश्रयीत संग्रहालये (Museums) –
राजे- महाराजांच्या काळातील, त्यांच्या घराण्यांमधे प्रथेने चालत आलेल्या, पूर्वजांच्या वस्तूं, कपडे, दागिने, हत्यारे, फर्निचर आदिंचा संग्रह करून ठेवण्याची पद्धत असे. मात्र हा संग्रह पाहण्याची संधी फक्त राजवाड्यात येणाऱ्या पाहूण्यांसाठीच असे.
कालांतराने लोकशाहीत ही दालने सामान्य जनतेसाठी खुली करण्यात आलेली आहेत. महाराष्ट्रात पुणे, कोल्हापुर, सातारा अशा जेथे राजसत्तांची केंद्रे होती त्याठिकाणी अशी संग्रहालये (Museums) अस्तित्वात आहेत. याशिवाय हैद्राबाद, कलकत्ता, राजस्थान याठिकाणी अशा राजश्रयातित संग्रहालयांची मोठी परंपरा असल्याचे दिसते.
चित्रमय संग्रहालय –
जिथे चित्रांचे संग्रह केले जातात, अशी चित्र संग्रहालये (Museums) फार पूर्वी पासून अस्तित्वात असल्याचे दिसून येते. रामायण, महाभारत आदि महाकाव्यांमध्ये अशा चित्रशाळांचे उल्लेख आहेत, जिथे चित्रांचे जतन, संवर्धन करण्यात आल्याचा उल्लेख आढळतो.
गुरूकूल,ऋषींचे आश्रम, हिंदू,जैन मंदिरे आणि बुद्ध विहार आदिंमध्ये सचित्र पोथ्या लिपीबद्ध करण्याचा प्रघात दिसून येतो. पौराणिक धार्मिक कथांच्या संग्रहासह यातून अप्रतिम कलानिर्मिती करण्यात आल्याचे दिसून येते. त्यानंतर भारतीय राज्यकर्त्यांनीही त्यांच्या दरबारातील चित्रकारांकडून भारतीय संस्कृती, धार्मिक कथा यांवरील चित्रे काढून ती जतन करण्यावर भर दिल्याचे दिसून येते. भारतातील जवळजवळ सर्व प्राचीन आणि मध्ययुगीन मंदिरामध्ये, राजवाड्यांमध्ये भीत्तीचित्रांचे जतन करण्यात आले असल्याचे दिसून येते.
ब्रिटिशकाळात संग्रहालयांचा झालेला विकास –
भारतात ब्रिटीश आल्यानंतरच्या काळात अनेक सामाजिक बदल झाल्याचे दिसून येते. युरोपात सर्व गोष्टींचे जतन, संवर्धन करण्याची पद्धत आहे. हीच पद्धत त्यांनी आपल्याकडे रूजवण्याचा प्रयत्न केला. हे करताना आपल्याकडे ही पद्धत रूजण्यास मदत झाली असली तरी आपल्याकडील अनेक दुर्मिळ खजिना लुटून इंग्लडमधे नेला गेला हेही खरे.
याकाळात अनेक सामाजिक, सांस्कृतीक वस्तूंचे जतन, संवर्धन करून ते पाहण्यासाठी सार्वजनिक करण्याकडे भर देण्यात आला. राजे-महाराजांच्या वस्तू सोडून इतर सामाजिक, सांस्कृतिक, कलात्मक, हस्तकला,वैज्ञानिक वस्तूंचा संग्रह करण्यात येऊ लागला.
१७व्या शतकापासून ते १९व्या शतकापर्यंत संग्रहालय (Museums) या शब्दाचा अर्थ म्हणजे फक्त पुरातन, पारंपरिक वस्तूंचा संग्रह करणे इतकाच होता. कालांतराने संग्रहालयांची भूमिका आणि उद्देश बदलत गेले.
संग्रहालय हे कला शिकण्याचे, ज्ञान संपादन करण्याचे साधन म्हणून पाहण्यात येऊ लागले. फक्त वस्तू संकलित करणे हाच उद्देश न राहता काहितरी शिकणे आणि शिकवणे याची संग्रहालये केंद्र होऊ लागली. ज्ञानाचे संरक्षण, संवर्धन करण्याचे माध्यम होऊ लागले.
आधुनिक संग्रहालयांचा (Museums) विस्तार –
आधुनिक संग्रहालयात विविध काळातील घटनांचे, घटनांमधील चिन्हांचे अवशेष, चित्र, मॉडेल, यंत्र अशा अनेक गोष्टींचे संवर्धन करण्यात येते. या पृथ्वीवरील कोणत्याही कालखंडातील माती, दगड, खनिजं, वनस्पती, फुलं, पक्षी, विविध जीवजंतू, त्यांचे जिवाश्म, जिवांचे अवशेष, मानवाने वेळेवेळी तयार केलेली उपकरणे, अवजारे, शिल्प, स्थापत्य कलेतील नमुने अशा अनेकानेक गोष्टींचा संग्रह करण्यात येतो.
खगोलिय घटनांसह, ऐतिहासिक. सामरिक, आर्थिक, वैज्ञानिक, सांस्कृतिक जगात घडणाऱ्या घटना किंवा त्यासंबधीत महापुरूषांची चित्रे, घटनांची चित्रे, यंत्र, वेशभुषा आदिंचे संकलन आधूनिक संग्रहालयांमध्ये करण्यात येते. थोडक्यात विविध कालखंडातील प्रकृती आणि जीवजंतूंनी सोडलेल्या अवशेषांचे जतन करणे हेच संग्रहालयांचे (Museums) मुख्य उद्दीष्ट होय. मानवनिर्मित आणि निसर्गनिर्मीत जे काही ज्ञान आहे ते सर्वांपर्यंत पोहोचण्याचे एक माध्यम म्हणजे अशी आधूनिक संग्रहालय आहेत.
आधूनिक संग्रहालयांची स्थापना –
वेळेवेळी मानवाने केलेल्या कार्यांचा, इतिहासाचा आणि पर्यावरणाचा वारसा संरक्षित करून त्याचा प्रचार, प्रसार करण्यासाठी संग्रहालयांची स्थापना करण्यात येते हे आपण पाहिले. या संग्रहालयातील सामग्रीचा उपयोग इतिहास लेखन, शिक्षण, अध्ययन आणि मनोरंजन अशा उद्देशांसाठी करण्यात येतो. संग्रहालयांच्या उभारणीतून देशी-विदेशी पर्यटकांकडून शासनाला अर्थार्जनही करता येते हाही याचा महत्त्वाचा भाग आहे.
आधूनिक संग्रहालयांचे वर्गिकरण –
आजच्या आधूनिक जगात विविध प्रकारच्या वस्तूंचे जतन करण्यासाठी संग्रहालयांची उभारणी होताना दिसते. त्याचे वर्गिकरण करण्याचे ठरवले तर ते असे करता येईल. या वर्गीकरणावरून पर्यटकांना आपल्या आवडीच्या विषयानुसार संग्रहालयांचा शोध घेता येईल.
- कला संग्रहालय – चित्रकला, संगीत, शिल्पकला,लोक वाद्य, हस्तकलांचे नमुने, नृत्यकलेची साम्रगी आदि कलानिगडीत अगणित वस्तूंचा समावेश अशा प्रकारच्या संग्रहालयात असतो.
- ऐतिहासिक संग्रहालय – पुरातन वस्तू, युद्धसामग्री, स्वतंत्रता संग्रमातील इतिहाल, राजवाड्यांचा इतिहास, संवैधानिक प्रगतिचा इतिहास, धार्मिक संप्रदायाचा इतिहास आदिंचा समावेश याप्रकारच्या संग्रहालयात होतो.
- पुरातत्व संग्रहालय – प्राचीन, अर्वाचिन काळातील सापडलेली भांडी, शस्रे, मूर्ती, आभूषण, नाणी आदि वस्तूंचा संग्रह येथे करण्यात येतो.
- विज्ञान आणि औद्योगिक संग्रहालय – माती, दगड, खनिजं, विज्ञान सिद्धांत, त्यासाठीची साधनं, यंत्र आदिंचा संग्रह या प्रकारच्या संग्रहालयात होतो.
- महापुरूषांच्या आयुष्यावरील संग्रहालय – महापुरूषांवरील पुस्तकं, त्यांच्या वैयक्तीक वापरातील वस्तू, कागदपत्र यांचा संग्रह करण्यात आलेला असतो.
- छंद म्हणून जोपासण्यात आलेल्या वस्तूंचा संग्रह – जुनी नाणी, टपालाची तिकिटं, काडेपेटींचा संग्रह असे विविध आकार, प्रकारातल्या वस्तू संग्रही ठेवण्याच्या छंदातून अशी संग्रहालय उभी राहतात.
- खेळविषयक संग्रहालय – खेळाचे साहित्य, महान खेळाडूंनी वापरलेल्या वस्तू आदिंचा संग्रह लोकांना बघायला आवडतो.
- सजीव संग्रहालय – प्राणी, पक्षी आदिंची संग्रहालये, उद्याने
- आंतरजालावरील व्हर्च्युअल संग्रहालय – जगभरातील संग्रहालये घरबसल्या पाहता यावीत यासाठी इंटरनेटचा वापर करून सोय करण्यात येते.
- विशेष संग्रहालय – विविध सामाजिक, वैज्ञानिक, शैक्षणिक संस्थांची संस्थाअंतर्गत संग्रहालय त्यांच्या परवानगीने पाहता येतात.
भारतातील काही महत्त्वाची संग्रहालय – India’s best museums
- आगाखान राजवाडा संग्रहालय, पुणे
- आदिवासी वस्तु संग्रहालय, पुणे
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय, पुणे
- रिझर्व बँकेचे चलन संग्रहालय, मुंबई
- जिल्हा ऐतिहासिक वस्तू संग्रहालय, अहमदनगर
- रणगाडा संग्रहालय, अहमदनगर
- डेक्कन कॉलेज पुरातत्त्व संग्रहालय, पुणे
- तेर संग्रहालय, उस्मानाबाद
- नॅशनल मेरिटाईम म्युझियम, मुंबई
- नाणी संग्रहालय, त्र्यंबकेश्वर
- पोथी संग्रहालय, नाशिक
- प्राज्ञ पाठशाळा, वाई-हस्तलिखिते संग्रहालय
- महात्मा फुले वस्तु संग्रहालय (लॉर्ड रे म्युझियम), पुणे
- दी बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी संग्रहालय, मुंबई
- श्री भवानी संग्रहालय, औंध, सातारा
- डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालय (व्हिक्टोरिया ॲन्ड अलबर्ट म्युझियम), मुंबई
- भारत इतिहास संशोधन मंडळ संग्रहालय पुणे
- भारतीय संग्रहालय दिल्ली
- भूमी अभिलेख संग्रहालय, पुणे.
- मानव संग्रहालय (भोपाळ)
- राजा दिनकर केळकर वस्तु संग्रहालय पुणे
- राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी संग्रहालय, पुणे.
- रेल्वे संग्रहालय, पुणे
- लोकमान्य टिळक संग्रहालय पुणे
- वैदिक संशोधन मंडळ-यज्ञासाठी लागणार्या वस्तूंचे संग्रहालय, पुणे
- छत्रपती शिवाजी महाराज वस्तु संग्रहालय (प्रिन्स ऑफ वेल्स म्यूझियम), मुंबई
- सिद्धगिरी ग्रामीण जीवन संग्रहालय, कोल्हापूर
- मध्यवर्ती संग्रहालय, नागपूर
- भारतीय संग्रहालय कलकत्ता
- सालारजंग संग्रहालय, हैद्राबाद
ही यादी न संपणारी आहे.यातील अनेक संग्रहालयांची सैर आपण टप्प्याटप्प्याने करणारच आहोत. त्यातून तुम्हाला कुठल्या संग्रहालयाला भेट द्यायला आवडेल हे तुम्ही नक्की ठरवू शकाल. जर भारतातील संग्रहालयांविषयीची अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर मराठी विश्वकोशच्या पुढील लिंकवर ही माहिती वाचू शकता. यात भारतातील सर्व भागांमधील संग्रहालयांची यादी देण्यात आलेली आहे.
संग्रहालय या विषयावर अनेक इंग्रजी, मराठी आणि हिंदी पुस्तके आज उपलब्ध आहेत. ऑनलाईन त्यांची उपलब्धताही चांगली आहे. अशी काही पुस्तके येथे सुचवावीशी वाटली. त्याची यादी पुढील प्रमाणे आहे.
This post was last modified on %s = human-readable time difference 12:54 pm