BMC Elections : अ,ब आणि क वर्ग महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक चार सदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार प्रभाग रचना करण्याबाबत आदेश जारी झाले आहेत. मुंबई महानगरपालिकेमध्ये 227 एक सदस्यीय प्रभाग रचना करण्यात येणार आहे.
मुंबईं : 2025-06-11
गेल्या तीन ते चार वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या होत्या. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. या निवडणुकांसाठी तीन टप्प्यात प्रभाग रचना तयार कऱण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. त्यामुळे आता ऑक्टोबर महिन्यात मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुका लागल्याचा अंदाज आहे. तत्पूर्वी लोकसंख्येनुसार मुंबई महानगर पालिकेत प्रभाग रचना करण्यासंदर्भात राज्य सरकारने आदेश दिले आहेत. राज्यातील 9 महानगर पालिकांच्या निवडणुका घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
राज्यात ज्या ठिकाणी महापालिका निवडणुका घेण्यात येणार आहेत त्या ठिकाणी आता प्रभाग रचनेचे आदेश दिलेले आहेत. त्यामध्ये प्रभागांची रचना कशी करायची आणि लोकसंख्येचे काय निकष ठरवायचे याचे स्पष्ट निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत. अ,ब, आणि ब वर्ग महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुक चार सदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार प्रभाग रचना करण्याबाबतचे आदेश दिले आहेत.
मुंबईमध्ये जुन्याच प्रभागानुसार निवडणुका होणार
सर्वोच्च न्यायलयाच्या आदेशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तात्काळ घेण्याचे आदेश जारी झाले आहेत. राज्यातील 9 महानगरपालिकांच्या निवडणुका होत आहे. महापालिकांची प्रभाग रचना करण्याबाबतचे आदेश जारी कऱण्यात आल्यानंतर मुंबईमध्ये जुन्याच प्रभागानुसार निवडणुका होणार असल्याचे स्पष्ट झालं आहे. त्यानुसार मुंबई महानगरपालिकेमध्ये 227 एक सदस्यीय प्रभाग रचना करण्यात येणार आहे. तर पुणे, नागपुर, ठाणे, नाशिक, नवीमुंबई, पिंपरी, चिंचवड, छत्रपती संभाजीनगर यासह इतर सर्व महापालिकांमध्ये चार सदस्यांचे प्रभाग असणार आहेत.
मुंबईमध्ये आधीही 227 प्रभाग होते. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर त्यामध्ये वाढ होऊन 236 प्रभाग करण्यात आले होते. पुन्हा महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर 227 प्रभाग करण्यात आले. त्यास सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. परंतु ती याचिका फेटाळण्यात आली. त्यामुळे मुंबईमध्ये आता 227 प्रभाग असणार आहेत.
महानगर पालिकांच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये
- प्रभाग रचना करणे आणि आरक्षण ठरविणे
- विधानसभा मतदार यादीचे प्रभागनिहाय विभाजन करणे
- प्रत्यक्ष निवडणूक घेणे अशा तीन प्रमुख टप्प्यांचा समावेश आहे. या तिनही टप्प्यांच्या प्रक्रियेमध्ये उप-टप्पे देखील आहेत.
या महानगरपालिकांसाठी चार सदस्यीय प्रभाग
अ,ब, आणि क वर्ग महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक चार सदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार रचना करण्याबाबतचे आदेश जारी झाले आहेत.
महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 21 दिनांक 11-03-2022 महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ मधील कलम 5 मधील तरतुदीनुसार निवडणुकीकरता प्रभाग रचना शासनाने,राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेने करावयाची आहे. खालील अ,ब,क वर्ग महानगरपालिकांच्या बाबतीत प्रभाग रचनेचे प्रारुप तयार करण्याच्या अनुषंगाने सदस्य संख्या निश्चित करून प्रभाग रचनेचे प्ररुप तयार करणे ही जबाबदारी संबंधीत महानगरपालिका आयुक्त यांची असणार आहे.
- अ वर्ग महानगर पालिकेत -पुणे, नागपुर
- ब वर्ग महानगर पालिकेत – ठाणे, नाशिक, पिंपरी-चिंचवड
- क वर्ग महानगर पालिकेत – नवीमुंबई, वसई-विरार, छत्रपती संभाजी नगर, कल्याण-डोंबिवली यांचा समावेश आहे.