IMD Weather Forecast Heavy Rain : यावर्षी मान्सून राज्यात वेळेआधी पोहोचला. मात्र गेले पंधरा दिवस त्याने विश्रांती घेतल्याचे दिसून आले. मात्र पुन्हा एकदा दडी मारलेल्या या पावसाने आपले दमदार आगमन केले आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे हवामान खात्याने त्याविषयीचे नवीन अंदाज वर्तवले आहेत.
महाराष्ट्र : 2025-06-13
यंदा पाऊस वेळेपूर्वीच दाखल झाला. महाराष्ट्रात तर पावसाने मे महिन्याच्या मध्यालाच दमदार हजेरी लावली होती. सुमारे 12 दिवस आधीच आलेल्या पावसाने काही काळ धुवांधार कोसळून पुन्हा काही दिवस दडी मारली होती. त्यामुळे शेतकऱ्यांची शेतीची अनेक कामे थांबली होती. आता मात्र परत एकदा पावसाने कोसळण्यास सुरूवात केली आहे.त्यामुळे पेरणीपूर्व मशागतीला वेग आला आहे. शेतकरी पावसाची आता आतूरतेने वाट पहात होते. आणि शेतकऱ्यांची वाट पहाणे आता थांबले आहे. तसा इशारा हवामान खात्यानेही दिला आहे. राज्यात पुन्हा एकदा अनेक भागांमध्ये हवामान खात्याकडून मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान खात्याचा इशारा
गेल्या दोन दिवसांपासून पाऊस सुरू आहे. आता पुढील 24 तासांमध्ये हवामान विभागाकडून मुसळधार पावसाचा इशारा देत, राज्यातील 6 जिल्ह्यांना हाय अलर्ट देण्यात आला आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार पुढील 24 तासांमध्ये कोल्हापुर, पुणे, सांगली, सातारा, ठाणे या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याती शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
आज मुंबईत संध्याकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. सांगलीमध्येही दोन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.