Heavy Rain In Maharashtra : यंंदा महाराष्ट्रात वेळेआधीच मान्सुनची एंट्री झालेली आहे. पुणे जिल्ह्यासह महाराष्ट्रात पावसाने थैमान घातले आहे. अनेक भागात ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे.
महाराष्ट्र : 2025-05-26
महाराष्ट्रात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस (Heavy Rain In Maharashtra ) सुरू आहे. त्यामुळे अनेक भागात मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरले आहे, तर रस्त्यांवरही पाणी वहात आहे. अशा परिस्थितीत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्यातील पावसाच्या स्थितीचा आढावा सातत्याने घेत आहेत. संपूर्ण प्रशासनाला अलर्ट मोडवर रहाण्याचे आदेश दिले आहेत. ज्या ज्या ठिकाणी नुकसान झाले आहे, त्याठिकाणी पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. राज्याच्या मुख्य सचिव आणि राज्याच्या आपत्ती निवारण कक्षाशीही ते सातत्याने संपर्कात आहेत.
राज्यात पुणे, सातारा, सोलापूर, रायगड, मुंबई या भागात अतिवृष्टी झालेली आहे. दौंडमध्ये 117 मि.मि., बारामतीत 104.75 मि.मि. , इंदापूरमध्ये 63.25 मि.मि इतका पाऊस झाला आहे. बारामतीत 25 घरांची थोडी पडझड झाली आहे. पुरात अडकलेल्या काही जणांना वाचवण्यात प्रशासनाला यश आले आहे. मोबाईल सेवा विस्कळित झाल्या होत्या, त्या आता पूर्ववत दुरूस्त केल्या आहेत. इंदापूरमध्ये 2 जणांना पूरस्थितीतून बाहेर काढण्यात आले आहे. फलटणमध्ये 163.5 मि.मि. इतका पाऊस झाला.30 नागरिक दुधेबावीगावाशेजारी अडकले होते. त्यांना निवास आणि भोजनाची सोय पुरविण्यात आली आहे.
सोलापूरमध्ये 67.75 मि.मि. पाऊस झाला, माळशिरस तालुक्यात 6 नागरिक पुरात अडकले होते. त्यांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. पंढरपूर येथे भीमा नदी पात्रात 3 जण अडकले होते, त्यांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. पंढरपूर येथे भीमा नदी पात्रात 3 जण अडकले त्यांनाही वाचविण्याचे कार्य सुरू आहे.
रायगडमध्ये एकाचा वीज पडून मृत्यू झाला आहे. महाड ते रायगड किल्ला रस्ता अतिवृष्टीमुळे बंद करण्यात आला आहे. मुंबईत 24 तासांत 135.4 मि.मि इतक्या पावसाची नोंद केली आहे. 18 ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या आहेत. तर 5 ठिकाणी इमारतीच्या भिंती पडण्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. मुंबई महापालिका, अग्निशमनदल, मुंबई पोलीस आणि इतरही यंत्रणा सज्ज आहेत. कुठेही प्राणहानी झालेली नाही. मुंबईत 5 ठिकाणी एनडीआरएफ टीम कुठल्याही प्रकारच्या मदतीसाठी सज्ज आहेत. मुंबईत पुढील 24 तासांत विजांच्या गडगडाट, वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. ठाण्यालाही पावसाने झोडपले आहे. रात्रभर संपूर्ण जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला.