X

Translate :

Sponsored

Hawa Mahal ! A special palace of Rajput women in the royal family, Jaipur, Rajasthan (Built in 1799).

राजघराण्यातील रजपूत स्त्रियांचा खासा हवामहल, जयपुर,राजस्थान ( बांधकाम इ.स. १७९९).

राजस्थान म्हणजे भारतीय संस्कृती, स्थापत्यकला, खाद्यसंस्कृती आणि लोकसंस्कृतीचा एक अनमोल ठेवा आहे. येथील कला, संस्कृती आणि येथे असणाऱ्या अनेक पुरातन वास्तू, राजमहाल आणि बागबगीचे म्हणजे पर्यटनासाठीचा मोठा खजिना आहे. राजस्थानच्या प्रत्येक शहरात, गावात आपल्याला अनेक महाल, वास्तू आजही खूप चांगल्या अवस्थेत दिसून येतात. राजस्थानची राजधानी असणाऱ्या जयपूर या गुलाबी शहरालाही असाच मोठा ऐतिहासिक वारसा आहे. येथील राजमहाल, किल्ले अतिशय सुंदर आहेत. त्यांच्या निर्मितीचा, तेथील वैभवाचा इतिहास जाणून घेणे अतिशय रंजक आहे. 

राजस्थानचे गुलाबी शहर अशी ओळख असणाऱ्या जयपूरमधील बाडी चौपड याठिकाणी असणारा हवामहल (Hawa mahal) हा महाल म्हणजे राजपुतांचा शाही वारसा आहे. हा महाल म्हणजे  वास्तुकला आणि संस्कृतीचा अनोखा मिलाफ आहे. राजस्थानच्या सर्वात प्राचीन वास्तूंपैकी ही एक वास्तू आहे. पर्यटकांसाठीचे हे सर्वात मोठे आकर्षण आहे. या महालाला अनेक खिडक्या आणि झरोके असल्यामुळे या महालाचे दुसरे नाव ‘पॅलेस ऑफ विंडस’ (Palace of winds) म्हणूनही ओळखले जाते. 

भगवान श्रीकृष्णाच्या मुकुटाच्या आकारात बांधलेल्या या इमारतीला एकूण ९५३ झरोके आहेत. हे झरोके अगदी मधमाशीच्या पोळ्याप्रमाणे भासतात. हा महाल राजपुतांच्या वैभावाची साक्ष आहे. लाल आणि गुलाबी रंगाच्या बलुआ दगडात बांधलेल्या हा हवामहल सिटी पैलेसच्या बाजूला बांधलेला आहे. कोणत्याही पाया शिवाय बांधण्यात आलेली ही जगातील एकमेक सर्वात उंच इमारत आहे. या महालाला (Hawa mahal) भेट देण्यासाठी देशविदेशातुन पर्यटक येत असतात. येथे अनेक देशविदेशातील चित्रपटांचे शूटिंग करण्यात येते. शुटिंगसाठीचे हे एक प्रसिद्ध स्थळ आहे.

या महालाचे नाव  हवामहल (Hawa mahal) असे  का ठेवण्यात आले ? Why Mahal Is Called Hawa Mahal ? याचे उत्तर आहे, की हवेचा महाल अथवा जेथे भरपूर हवा खेळती असते असा महाल. या महालाला एकूण ९५३ खिडक्या  आणि छोटे छोटे झरोके बांधण्यात आलेले आहे. इतक्या खिडक्या बांधल्या गेल्या कारण त्याकाळी हवेसाठी, वातावरण थंड रहाण्यासाठी भरपूर खिडक्या असणे हा एकमेव मार्ग होता. या खिडक्यांमुळे महालात कायम ताजी हवा येत असे. राजस्थानच्या उन्हाळ्यात जीवाला थंडावा मिळवण्यासाठी राजपुतांचे हे आवडते ठिकाण होते. कारण छोट्याछोट्या  झुरक्यातून येणारी हवा संपूर्ण महालात थंडावा टिकवून ठेवत असे. या महालाच्या पाचव्या मजल्याला हवामंदिर असे संबोधले जात असे, यावरूनच या संपूर्ण महालाला हवामहल असे नाव पडले. 

हवामहलचा इतिहास – History Of Hawa Mahal Jaipur

राजस्थानची राजधानी असणाऱ्या जयपूर मधील हवामहलची (Hawa mahal) निर्मिती महाराजा सवाई जय सिंह यांचे नातू सवाई प्रताप सिंह यांनी सन १७९९ ला केली. राजस्थानाधील झुंजनू शहरातील महाराजा भूपाल सिंह यांनी निर्माण केलेला खेतडी महाल पाहून सवाई प्रतापसिंह खूपच प्राभावित झाले होते. त्यापासून प्रेरणा घेऊन त्यांनी जयपूर येथे अशाच भव्य अनोख्या हवामहलची निर्मीती करवली. जयपूरमधील रॉयल सिटी पॅलेस आहे. त्याच्याच विस्तारीकरणाचा एक भाग म्हणजे हवामहल (Hawa mahal) होय.

त्याकाळी राजघराण्यातीलच नाही तर सामान्य स्त्रियाही पडदा पद्धतीत रहात होत्या. राजघराण्यातील स्त्रियांवर तर अनेक निर्बन्ध होते. त्यांना त्याकाळी बाहेर रस्त्यावर साजरे होणारे सण -उत्सव, दररोजची वर्दळ हे प्रत्यक्ष जाऊन पाहण्याची मुभा नव्हती. त्यामुळे भरपूर खिडक्या, पडदे लावलेल्या बाल्कनी, झरोके बांधलेल्या हवामहालातून या राजस्त्रीयांना उत्सव, रोजची वर्दळ पहाता यावी यासाठी केलेली ही सोय होती. या स्त्रियांना येथून पहाण्याची ही मुभा या महालाद्वारे देण्यात आलेली होती. हा महाल बांधण्याचा मुख्य उद्देश्य या स्त्रियांना आपल्या प्रथांचे पालन करत थोडेफार स्वातंत्र्य देणे हा होता. खिडक्यांमधून पाहताना या स्त्रियांच्या चेहऱ्याला थंड हवा मिळत असे, राजस्थानच्या गरम हवेत हा थंडवा त्यांच्यासाठी मोठा दिलासा ठरत असे आणि त्यांच्या सौंदर्याच्या जपवणुकीसाठीही ते महत्वाचे होते.

या महालाच्या बांधकामात मुघल आणि राजपूत अशा दोन्ही स्थापत्यकलेचा प्रभाव दिसून येतो. एकूण १५ मीटर उंच आणि पिरॅमिडच्या आकारात बांधलेल्या या महालाचे वास्तुविशारद होते लाल चंद उस्ताद. (Lal chand Ustad) पाच मजली इमारत जी पाया शिवाय बांधलेली असूनही आज सरळ आणि भक्कमपणे उभी आहे. 

ही इमारत इस्लामीक मुघल आणि हिंदू राजपूत वास्तुकला यांचे अनोखे मिश्रण आहे. महाराज सवाई प्रतापसिंह कृष्णाचे मोठे भक्त होते, त्यामुळेच या महालाच्या आकारातच त्यांची ही भक्ती प्रतीत होते. महालाचा मुख्य आकार हा श्रीकृष्णाच्या मुकुटाच्या आकारात बांधलेला आहे. महालातील ९५३ खिडक्यांपैकी काही खडक्या या लाकडाने बनवण्यात आलेल्या आहेत. संपूर्ण इमारत उन्हाळयात थंड राहील अशा प्रकारे या खिडक्या बांधण्यात आलेल्या आहेत.

हवामहलची  अन्य वैशिष्ट्ये – Hawa Mahal Information

या महालातील कोरीव काम, फुलं पानांच्या नक्षी, इतर नक्षीकाम हे राजपुत आणि मुघल या दोन्ही शिल्पकलेचे उत्कृष्ट नमुने आहेत. उत्सव, सण साजरे करण्यासाठी  महालाच्या पहिल्या मजल्यावर शरद मंदिर बांधण्यात आले तर दुसऱ्या मजल्यावर रतन मंदिर बांधण्यात आले. रतन मंदिराचा काही भाग हा ग्लासवर्कने सजवण्यात आलेला आहे. विविध प्रकारच्या रंगीत काचा वापरून हे काम करण्यात आलेले आहे. या महालाचे (Hawa mahal) वैशिष्ट्य म्हणजे या महालाला समोरून दिसेल असा एकही दरवाजा नाही, सिटी पॅलेस पासून एक शाही दरवाजा जो हवामहल पर्यंत जातो.

एका मोठ्या प्रागंणाच्या बाजूला सिटी पॅलेसच्या  दोन ते तीन मजली इमारती आहेत, आणि त्याच्या पूर्वेकडच्या भागात हवामहल बांधण्यात आलेला आहे. यांच्या अंगणात सध्या एक पुरातत्त्व संग्रहालय आहे. महालाच्या आतील भागातुन वरच्या भागात जाण्यासाठी पायऱ्या न करता भुयाराप्रमाणे आहे. 

पहिल्या दोन मजल्यावर मोठे अंगण आहेत. त्यासमोर मोठी कारंजे आहेत. त्याच्या वरील तीन मजल्याची रुंदी ही अगदी एका खोली एवढी आहे. वर जायला पायऱ्या ( जिने ) नसल्यामुळे सपाट रॅम्प चा वापर करावा लागतो. सर्वात वरच्या भागातून खालचा नजारा बघने हा अनुभव काही खासच असतो. यासाठी तुम्ही सकाळी लवकर येथे भेट द्यायला हवी. दुपार नंतर येथे पर्यटकांची जास्त गर्दी होते. वरच्या मजल्यापर्यंत जाण्यासाठी थोडी खबरदारी घेत चढावे लागते.

२००६ ला सुमारे ५० वर्षा नंतर संपूर्ण महालाचे नूतनीकरण करण्यात आले. त्यावेळी त्याची किमंत ४५६८ इतकी सांगण्यात आली. जयपूरच्या एका कॉर्पोरेट सेक्टरने प्रारंभी ही जबाबदारी घेतली मात्र नंतर देशाच्या युनिट ट्रस्ट ने हे काम पूर्ण केले.

हवामहलला भेट देण्याची योग्य वेळ -Best Time To Visit Hawa Mahal

संपूर्ण राजस्थान फिरण्यासाठी थंडीचे दिवस सर्वात चांगला काळ आहे. हवामहल ला सकाळी ९:३० ते संध्याकाळ ४:३० वाजेपर्यंत तुम्ही  भेट देऊ शकता. अगदी निवांत तुम्हाला हा महाल पाहायचा असेल तर साधारण एक ते दोन तास तुम्हाला दीले जातात.  सकाळी सूर्याच्या कोवळ्या किरणात हा महाल पाहण्याचा आनंदच काही और आहे. येथिल संग्रहालय शुक्रवारी बंद असते.

हवामहलला भेट देण्यासाठीचे प्रवेशशुल्क – Hawa Mahal Ticket Price

भारतीयांसाठी ५० रुपये तर विदेशी पर्यटकांसाठी २०० रुपये प्रवेशशुल्क आहे. याशिवाय कंपोजिट तिकीट सुद्धा घेण्याची सोय आहे. हे तिकीट दोन दिवसासाठी गृहीत धरले जाते. याची किंमत भारतीयांसाठी ३०० रुपये तर विदेशी लोकांसाठी १००० रुपये आहे. या तिकिटावर तुम्ही दोन दिवस हवामहल आणि आसपासचे काही पर्यटन स्थळ फिरू शकतात. जर तुम्हाला आता कैमेरा न्यायाचा असले तर त्यासाठी वेगळे दहा रुपये भारतीयांसाठी तर विदेशी लोकांसाठी ३० रुपये आकारले जातात. येथे लोकल गाईडची सोयही आहे मात्र त्याचे चार्जेस आधीच ठेरवले तर बरे.

हवा महलला भेट देताना कोणती काळजी घ्याल ? Remember few things while visiting Hawa Mahal –

जर हा हवामहल निवांत पहायचा असेल तर तुम्ही येथे सकाळी लवकर भेट द्यायला हवी. दुपारी गर्दी असल्याने येथे जास्त वेळ थांबणे शक्य होत नाही. 

१) या महालाच्या वरच्या मजल्यावर जाण्यासाठी पायऱ्या नसून चढण आहे, त्यामुळे येथे जाताना आरामदायक चप्पल, बूट घाला. 

२) चढण चढून दमछाक होते तर पाण्याची बाटली नक्की ठेवा. याशिवाय जास्त सामान सोबत ठेवू नका. 

३) जसजसे वरच्या मजल्यावर जाल येथील भिंती फार लहान, अरुंद आहेत तेव्हा फिरताना सावधानी बाळगा. 

४) या महालाच्या बाहेर येथील प्रसिद्ध बाजारपेठे आहे. येथे तुम्ही मनसोक्त खरेदी करू शकता.

ज्या काळात स्त्रीयांवर अनेक प्रकारची बंधन होती, पडदाशीन रहाने त्यांना सक्तीचे होते. अगदी आवश्यक प्रवासाशिवाय त्यांना बाहेरच्या वातावरणाचे दर्शनही दुर्लभ होते. बाहेर जाण्याचा प्रसंग आलाच तर तो बाहेरचा नजारा आपल्या भरजरी घागराच्या नक्षीदार ओढणीतून तो नजारा बघावा लागायचा. राण्या असल्यातरी अशा सर्व समाजबंधन त्यांना पाळावीच लागायची. अशा काळात एक राजा आपल्या घरातील स्त्रियांसाठी बाहेरच्या जगाचे दर्शन होण्यासाठी झरोके, खिडक्यांच्या महालाची सोय करतो हे फारच रोमांचकारी आहे. 

या महालाच्या मजल्यांवर जाण्यासाठी पायऱ्याऐवजी रॅम्प आहेत, त्याचे कारण त्याकाळी राण्यांना जड घागरे घालून पायऱ्या चढणे अवघड जात असे त्यामुळे ही सोय करण्यात आल्याचे सांगितले जाते. अशाप्रकारे स्त्रीयांना बाहेरचे जग बघायला मिळावे यासाठी बंदिस्त का होईना महाल बांधला गेला हे आजच्याकाळातही अप्रूप वाटणारे आहे. तेव्हा असा हा अगदी उत्तम परिस्थितीत असणारा हा महाल पाहणे इतिहासाशी, त्याकाळच्या स्त्रियांच्या भावजीवनाशी जोडण्यासाठीचा एक सुंदर मार्ग ठरतो.

या ठिकाणाला भेट द्यायला कसे जाल ?

ज्योती भालेराव.

This post was last modified on March 2, 2021 2:43 pm

Sponsored
Jyoti Bhalerao:
Sponsored

This website uses cookies.

Sponsored