Hindi Compulsion Update, Raj Thakery VS Gunaratna Sadavarte : आज दिवसभर हिंदीची सक्ती हा एकच विषय राज्यातील राजकारणात चर्चिला जात आहे. अशातच आता राज ठाकरेंनी 5 जूलैला आयोजिलेल्या मोर्चावर गुणरत्न सदावर्ते यांनी टिका करत, त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
मुंबई : 26/06/2025
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारच्या हिंदी भाषेविषयीच्या शैक्षणिक धोरणाला कडाडून विरोध केला आहे. यासाठी त्यांनी 5 जूलैला मुंबईमध्ये गिरगाव येथे मोर्चा आयोजित केला आहे. आता या मोर्चाला ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी विरोध केला आहे. राज ठाकरे यांच्या कायद्याने मुसक्या आवळल्या पाहिजे, अशी मोठी मागणी सदावर्ते यांनी केली आहे.
काय म्हणाले सदावर्ते ?
राज ठाकरे हे शिक्षणाच्या आड येत असून ते अक्षम्य आहे. हा विरोध म्हणजे सरस्वती आईच्या विचारांना विरोध करण्यासारखे आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार हे त्रिभाषा सुत्र अस्तित्वात आहे. आधी राज ठाकरे म्हणत होते हिंदी भाषा नको. आता बोलतात हिंदी भाषा सक्ती नको. हा विरोध नक्की कशासाठी केला जातोय ? असा सवाल सदावर्ते यांनी राज ठाकरेंना केला आहे.
सदावर्ते यांनी मनसेच्या मोर्चाला परवानगी मिळालेली नाही, असा दावा केला आहे. मोर्चा काढण्याची जागा ही आझाद मैदान आहे. गिरगाव चौपाटी नाही. कायदा आणि सुव्यवस्थेत अडचण निर्माण कऱण्याची ही भानगड आहे, असा आरोप सदावर्ते यांनी केला आहे.
पोलीस तसेच मुख्यमंत्र्यांना दिले आहे पत्र
न्यायालयाने ठरवून दिलेल्या जागेतच मोर्चे काढायचे असतात. आम्ही मनोज जरांगे यांच्या मोर्चालाही विरोध केला होता, असे सदावर्ते म्हणाले. तसेच राज ठाकरे यांच्या मोर्चासंदर्भात आम्ही पोलीस तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांना पत्रं दिले आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
राज ठाकरेंच्या मोर्च्याला परवानगी नसल्याचा दावा
मोर्चाच्या माध्यमातून काहीतरी घडवण्याचा हा प्रकार आहे. भाषेच्या नावावर सांप्रदायिकतेच्या नावाखाली वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. राज ठाकरे मोर्चा काढू शकत नाही. त्यांना मोर्चा काढण्यासाठी परवनागीच दिलेली नाही, असा थेट दावा सदावर्ते यांनी केला आहे. राज ठाकरे यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई झाली पाहिजे. कायद्याप्रमाण त्यांच्या मुसक्या आवळल्या पाहिजेत. अशी मागणी सदावर्ते यांनी केली आहे. राज ठाकरे यांना किंमत देण्याची गरज नाही, असेही सदावर्ते म्हणाले.