Table of Contents
फतेहपुर सिक्री (Fatehpur Sikri) – मुघल वास्तूकलेचा अविष्कार ( निर्मिती १५५९ )
ऐतिहासिक वास्तूंमधे जर तुमचं मन तासनतास रमत असेल तर फतेहपुर सिक्रीला (Fatehpur Sikri) तुम्ही भेट द्यायलाच हवी. आग्र्यापासून सुमारे २२ किलोमीटर अंतरावर आहे ऐतिहासिक शहर ‘फतेहपूर सिक्री. (Fatehpur Sikri) आजही येथील अनेक वास्तू उत्तम स्थितीत, त्यांचे पूर्वीचे वैभव टिकवून दिमाखात उभ्या आहेत. त्याकाळचे वैभव, वास्तूकलेतील श्रीमंती अनुभवायची असेल तर निवांत वेळ काढून फतेहपूर सिक्रीची सैर करायलाच हवी. या शहराची निर्मीती बादशहा जलाल्लुदीन अकबर याने १५५९ च्या दरम्यान केली होती. या ठिकाणाच्या निर्मीतीचा इतिहास, माहिती खुपच रोचक आहे.
फतेहपुर सिक्रीचा इतिहास – History Of Fatehpur Sikri
फतेहपूर सिक्रीचा (Fatehpur Sikri) उल्लेख अगदी प्रागैतिहासिक काळापासून सापडतो. विक्रम संवत १०१० – १०६७ मधील एका शिलालेखात या जागेचा उल्लेख ‘सेक्रिक्य’असा सापडतो. सन १५२७ मधे बाबराने खानवाच्या युद्धात विजय प्राप्त केल्यानंतर तो या ठिकाणी आला होता, त्या आठवणीत त्याने या जागेला सिकरी म्हटले आहे. त्याने याठिकाणी एका जलमहाल आणि विहीरींची निर्मीती केल्याचा उल्लेखही सापडतात.
अकबराने का बांधला हा महाल ? Why Akbar build this Palace ?
अकबराच्या अनेक राण्या आणि बेगम होत्या. परंतु त्या कोणापासूनही अकबराला पुत्रप्राप्ती झालेली नव्हती. त्यामुळे अकबर अनेक पिर आणि फकिरांकडे पुत्रप्राप्तीसाठी नवस बोलण्यासाठी जात असे. असेच एकदा अकबराची फकीर शेख सलिम चिश्तींशी भेट झाली आणि त्या फकीरांनी अकबराला सांगितले की, “बच्चा तू हमारा इंतज़ाम कर दे, तेरी मुराद पूरी होगी।” काही दिवसांनी, दैवयोगाने अकबराची हिंदू राणी जी कछवाहचा राजा बिहारीमल यांची मुलगी होती आणि भगवानदासची बहिण होती, जिचं नाव जोधाबाई. ती गर्भवती राहीली. तीने एका पुत्राला जन्म दिला. अकबराने मरियम उज जमानीला म्हणजे जोधाबाईला बाळंतपणासाठी सिकरीच्या सलीम चिश्तींकडेच पाठवले होते. त्याचे नावही शेखच्या नावावरून सलिम असेच ठेवण्यात आले. पुढे जाऊन सलीम हाच जहाँगिर या नावाने अकबराचा उत्तराधीकारी झाला.
अकबर फकीर सलीम चिश्तींशी खुपच प्रभावित होता. त्यामुळे त्याने त्यांच्यापाशीच रहाण्याचा निर्णय घेतला. सलीम चिश्ती रहात होते त्या ठिकाणीच अकबराने १५७१ मध्ये किल्ला बांधायला सुरूवात केली. अकबराने निश्चय केला होता की जिथे त्याच्या पुत्राचा जन्म झाला तिथे तो एक सुंदर नगरी वसवणार. मुघल काळातील सर्वात पहिली ही योजनाबद्ध वसवण्यात आलेली वैभवशाली नगरी होय. येथेच राहून अकबराने सर्व धर्मातील चांगल्या गोष्टी एकत्र करून त्याने त्याचा दिन-ए-इलीही नावाचा नवा धर्म निर्माण केला. परंतु हा धर्म स्विकारण्यासाठी त्याने कोणालाही बंधन घातलेले नव्हते. बीरबलासहीत दरबारातील मोजक्याच लोकांनी त्याला यात साथ दिली होती.
राजधानीचे स्थलांतर – सन १५७१ मध्ये आग्रावरुन सिक्रीला राजधानीचे स्थलांतर करण्यात आले. त्याच वर्षी अकबराने गुजरातची लढाई जिंकली . (फतेह केली ) त्यामुळे नव्या राजधानीचे नाव फतेहपूर सिक्री (Fatehpur Sikri) असे करण्यात आले. १५७२ ते १५८५ पर्यंत अकबर येथेच राहिला. सुमारे १४ वर्ष सिक्रीच मुघलांची राजधानी होती. अकबराने येथे अनेक वास्तू, सुखसोयी निर्माण केल्या, आग्र्या प्रमाणे एका मोठ्या नगराचे स्वरूप त्याला प्राप्त झाले होते. मात्र येथे पाण्याची कमी होती. त्यामुळे अकबराने नंतर आपली राजधानी आग्र्याला स्थलांतरित केली.
फतेहपुर सिक्री (Fatehpur Sikri) नगरीच्या निर्माणासाठी लागला तब्ब्ल १५ वर्षांचा काळ.
अकबराच्या स्वप्नांची नगरी असे याठिकाणाचे वर्णन करतात. आणि येथे भेट दिल्यावर त्याची खरंच प्रचिती आपल्याला येते. आजही येथील कोपरानकोपरा सुंदर कलाकुसरीने नटलेला दिसतो. जेव्हा ही नगरी निर्माण करण्यात आली असेल तेव्हा तर ती किती सुंदर असेल याचाच आपण विचार करत रहातो. अकबराने अतिशय मनापासून ही नगरी वसवली होती. त्यात त्याने जातीने लक्ष घातले असल्यामुळे त्याच्या योजनेसाठी १५ वर्षांचा मोठा कालावधी लागला. फतेहपुर सिक्रीच्या (Fatehpur Sikri) निर्माणाआधी मुघलांची राजधीनी आग्रा येथे होती. मात्र फकीर शेख सलीम चिश्तींच्या सन्मानार्थ अकबराने या नगरीची निर्मिती केली होती. काही वर्षातच येथे नियोजनबद्ध प्रशासकिय इमारती, महाल आणि धार्मिक वास्तूंची निर्मिती करण्यात आली.
येथिल जमा मशीद ही सर्वात प्रथम बांधली गेली असल्याचे सांगितले जाते. नंतर पाच वर्षांनी बुलंद दरवाजा बांधण्यात आला. याशिवाय येथे सलीम चिश्ती दरगाह, नौबत – उर – नक्करखाना, टकसाल, कारखाना, खजिना इमारत, हकीम का घर, दिवाण ए आम, मरियम का निवास, जोधाबाई चा महाल, बीरबलाचा महाल अशा अनेक महत्त्वाच्या वस्तू येथे उत्तम स्थितीत आहेत. मात्र सलीम चिश्तीच्या भक्तीच्या भरात अकबराने ही नगरी निर्माण केली होती. मात्र काही वर्षात पाण्याच्या कमतरतेमुळे आणि काही राजकीय पेचामुळे ही जागा राजधानीसाठी योग्य नसल्याचे अकबराच्या लक्षात आले होते. पाण्याच्या कमतरतेमुळे एका पहाडावर बांध तयार करून एक सरोवर निर्माण करावे लागले. त्याचेच पाणी राजधानीत येत असे. ऑगस्ट १५८२ मध्ये हा बांध फुटला आणि मोठी हानी झाली. १४ वर्ष येथे राजधानी करून कारभार केल्या नंतर अकबराला वाटले की, हे स्थान तितके उपयोगी नाही. म्हणून पुन्हा १५८४ ला आग्रा येथेच राजधानी हलवण्यात आली.
फतेहपुर सिक्री (Fatehpur Sikri) येथील वैशिष्ट्यपूर्ण वास्तू –
बुलंद दरवाजा आणि सलीम चिश्ती दरगाह – फ़तेहपुर सिक्री (Fatehpur Sikri) येथील अनेक वस्तू आजही चांगल्या स्थितीत बघायला मिळतात. येथेही सर्वात मोठी इमारत बुलंद दरवाजा आहे. १६०२ मध्ये अकबराने गुजरातच्या विजयानंतर त्या विजयाचे स्मारक म्हणून याची निर्मिती केली होती. ज्याची उंची जमिनीपासून २८० फूट आहे. ५२ पायऱ्या चढून गेल्यानंतर पर्यटक आत प्रवेश करू शकतात. लाल बलुआ प्रकारच्या दगडाचा वापर करून हा दरवाजा वापरण्यात आलेला आहे. त्यावर पांढऱ्या आणि काळ्या रंगाच्या संगमरवरी दगडाने नक्षीकाम करण्यात आलेले आहे. याच दरवाजातून आत शेख सलीम यांच्या दर्ग्यामध्ये प्रवेश करावा लागतो. त्याच्या डाव्या बाजूला जामा मशीद आहे. बाजूलाच एक घनदाट वृक्ष आहे. त्याच्या बाजूलाच संगमरवरी झरा बांधण्यात आलेला आहे. मशिदीच्या जवळ एक दगड असून, त्याच्यावर थाप मारल्यास नगाऱ्याचा आवाज ऐकू येतो. मशिदीवरील नक्षीकाम आपले लक्ष बंधून घेते. येथे संगमरवरामध्ये कोरलेली जाळी लांबून पाहिल्यास एखादे रेशमी वस्त्र असल्यासारखी भासते. समाधीच्या वर एक अनोखे शिल्प आहे, जे आजही नवे भासते.
नौबत खाना – मुघलकाळातील एक प्रकारचा हा ड्रम हाऊस आहे. येथे शहनाई आणि ढोल वाजवण्यात येत असे. येथे दिवसातून पाच वेळा ढोल वाजवले जायचे. येथील कोरीवकामही पाहण्यासारखे आहे.
पचीसी न्यायालय – या ठिकाणी बादशहा अकबर शतरंजचा खेळ खेळत असे. त्यासाठी लागणाऱा पट येथे बनवण्यात आलेल आहे. सोंगट्यांच्या जागी माणसांना वापरण्यात येत असे.
पंचमहाल – या किल्लाच्या आत एक पंचमहाल आहे. पाच मजली असणारी ही इमारत दिसायला खास आहे. ज्याची शैली बौद्ध विहाराप्रमाणे आहे. याच्या पाचव्या मजल्यावरून लांबपर्यंतचे दृश्य दिसते.या महालाचा वापर बादशहा सायंकाळी फिरण्यासाठी करत असे. तसेच हरममधील खास राण्यांसाठी येथे मनोरंजनाचे कार्यक्रम चालत असत. १७६ खांबांवर उभारण्यात आलेली ही इमारत पहिल्या मजल्यावर मोठी, दुसऱ्या मजल्यावर त्यापेक्षा थोडी लहान अशा उतरत्या क्रमाच्या आकारात बांधण्यात आलेली आहे. सर्वात शेवटी एकच सज्जा उभारण्यात आल्याचे दिसते. ज्या खांबांच्या आधारे ही इमारत बांधली आहे त्या खांबांवर सुंदर कोरीव काम करण्यात आलेले आहे.
अकबराचा राजमहाल – येथील समाधीच्या मागे उंच जागेवर बांधण्यात आलेला आहे. त्याच्या शेजारीच अकबराची तुर्की बेगम रुकैया बेगमचा महाल आहे. काहींच्या मते इथे सलिमा बेगम रहात असे. येथील भिंतींवरील कलाकुसर फारच अप्रतिम आहेत.
मरीयम उज जमानी पॅलेस (जोधाबाईचा महाल ) – मुख्य किल्ल्याच्या परिसरात असणारा हा महाल अकबराची हिंदू पत्नी जोधाबाईच्या वास्तव्याचे ठिकाण असल्याचे सांगितले जाते. खरोखर हा महाल आजही खुप चांगल्या स्थितीत आढळतो. आतील कलाकारी, कोरीव काम निव्वळ अप्रतिमच. येथील महालात फिरल्यावर आपलं मन जोधाबाई भोवती फिरत रहातं. तिच्याविषयीच्या सत्य, काल्पनिक घटनांचा मागोवा आपण घेत रहातो .
इबाबदत खाना – या वास्तूला आराधना घर असेही म्हटले जाते. याठिकाणी सुन्नी मुस्लिम अनेक विषयांवर चर्चा करण्यासाठी एकत्र येत असत.
दिवान – ए – खास – रुकैया बेगम च्या महालाच्या डाव्या बाजूला दिवान -ए – खास आहे. येथे दोन बेगमसह अकबर न्याय करत असे. बादशहाचे नवरत्न मंत्री यावेळी उपस्थित असत. त्याच्या चारही बाजूला सामान्य जनतेसाठी जागा बांधण्यात आलेल्या आहेत. त्याच्या मधोमध हत्तीला बांधण्यासाठी एक मोठा दगड आहे. हा हत्ती शिक्षा झालेल्या आरोपीला चिरडून मारण्यासाठी असे.
बीरबलचा महल – मला जास्त आवडलेली वास्तू म्हणजे बिरबलचा महाल. लहानपणापासून अकबर बिरबलच्या गोष्टी वाचल्या होत्या. बिरबल विषयी एक आपुलकी आहे. लहानपणापासून आपल्या मनातल्या हिरोचं रहाण्याचं ठिकाण असं अनपेक्षितपणे समोर आल्यवर काय आनंद होतो. हा महाल १५८२ मध्ये बांधण्यात आला. बीरबल महालाच्या बाजूलाच अकबराच्या खाजगी घोडे , ऊंट बांधण्याची जागा आहे. याशिवाय येथील अनेक महत्त्वाच्या वास्तू काळाच्या ओघात नष्ट झाल्या आहेत.
फतेहपुर सिक्रीच्या (Fatehpur Sikri) या किल्ल्याचे वैशिष्ट्य त्याच्या भव्यतेमधे आहे. येथील प्रत्येक वास्तू, भिंती, आंगण सर्व काही विशाल आहेत. जणूकाही अकबराच्या विशाल मनाचे प्रतिक त्याने निर्माण केलेल्या या नगरीच्या भव्यतेत दडलेले आहे. मुघल साम्राज्यकाळातील सर्वात उदार,धर्मनिरपेक्ष बादशहा अशी अकबराची ओळख आहे. त्याची प्रचिती येथील अनेक वास्तूंवरून आपल्याला येते. जोधाबाईचा महाल, बीरबलाची हवेली अशा अनेक वास्तू आपल्याला आकर्षीत करतात. त्याकाळचा इतिहास जाणून घ्यायला प्रवृत्त करतात. येथील भव्यता, मोकळे पटांगणं, लाल दगडातील महाल, शांत, रम्य वातावरण हे सर्व अनेक दिवस आठवत रहातं. तेव्हा आगऱ्याला कधी गेलात, तर ताजमहालसह फतेहपुर सिक्रीला (Fatehpur Sikri) भेट देण्याचंही नियोजन त्यात नक्की करा.
याठिकाणाला भेट द्यायला कसे जाल ?
This post was last modified on March 27, 2021 3:49 pm
View Comments (3)
ज्योती बेटी, तुमचा हा लेख नेहमी प्रमाणेच सर्वांग सुंदर. प्राचिन ऐतिहासिक वास्तूना आपल्या शब्दांच्या आभूषणानी सजवून सादर करण्याची जी आपली हातोटी आहे त्याला खरोखरच वंदन.
वाचताना त्या वास्तूशी एवढी एकरूपता येते कि क्षणभर आपण प्रत्यक्ष ते मनोहारी दृश्य पाहात आहोत त्याच्या शिल्पकलेचा स्वाद घेत आहोत असा भास होतो.
अथक प्रयत्नानी, सखोल अभ्यास करून लिहिलेला व सुयोग्य चित्रिकरणाने सजवून हा लेख एक परिपूर्ण दस्तावेज झाला आहे.
म्हणुनच मी आपले लेख हृदयाशी जपून ठेवतो. आणि पुनःपुन्हा त्याच्या वाचनाचा स्वाद घेतो.
शुभम भवतु ॥
आनंद ग. मयेकर
ठाणे
लेख खूप चांगले आहेत. असचे चांगले लेख नेहमी व अविरतपणे लिहीत रहा !
Thanks for sharing. I read many of your blog posts, cool, your blog is very good.