Table of Contents
“फराहबक्ष” – डोळ्यांना आनंद देणारी ऐतिहासिक वास्तू ( निर्मिती काळ – इ.स.१५७६ ते इ.स.१५८३ ) अहमदनगर.
भारतातीलच नाही तर जगातील प्रत्येक व्यक्ती एकदातरी प्रेमाचं प्रतिक म्हणून ओळखला जाणारा ताजमहाल पाहण्याची इच्छा बोलून दाखवत असतो. अनेकांची ती इच्छा पूर्णही होते, काहीजण त्या प्रतिक्षेत असतात. मात्र ज्या वास्तूवरून जगप्रसिद्ध ताजमहालाची प्रेरणा घेण्यात आलेली आहे ती फराहबक्ष महाल ही वास्तू मात्र आज दूर्लक्षित अवस्थेत इतिहासाची मूक साक्षीदार म्हणून कशीबशी उभी आहे. अहमदनगर शहरातील ‘फराहबक्ष महाल’ (Farah Bagh) त्याच्या नावासारखाच लक्षवेधी आहे.
अहमदनगर शहराला फार मोठा ऐतिहासिक वारसा आहे. मुघल साम्राज्याच्या आधीपासूनच या शहराची सांस्कृतिक, ऐतिहासिक, आर्थिक अशी मोठी परंपरा राहिलेली आहे. निजामशाहीच्या काळात येथे अनेक एश्वर्यसंपन्न, वेगळ्या बांधकामशैलीसाठी ओळखल्या जाणाऱ्या वास्तूंची निर्मीती करण्यात आली होती. अहमदनगरचा भुईकोट किल्ला, दमडी मस्जिद,सलाबत खानाची कबर (चांदबीबीचा महाल) अशा अनेक वास्तू आज शहरात आपले अस्तित्व टिकवून उभ्या आहेत. त्यातीलच एक महत्त्वाची वास्तू म्हणजे ‘फाराहबक्ष महाल’.
कोणी केली फराहबक्ष (Farah Bagh) महालाची निर्मीती ?
या महालाच्या निर्मितीची सुरूवात चंगेजखान याने केली होती. परंतु बुरहान निजामशहा (पहिला) याच्या निर्देशानुसार नियामत खान याने हे कार्य पुर्ण केले. परंतु बुरहान निजामशहाला या वास्तूची शैली आवडली नाही आणि त्याने ही वास्तू पाडून तीचे पुर्ननिर्माण करण्याचे आदेश दिले. पुढे निजामशाहीतील चौथा शासक मुर्तझा निजामशहा याच्या कारकिर्दीत ही वास्तू बांधून पूर्ण झाली. कालांतराने हे कार्य सलाबत खान (पहिला) याच्याकडे सोपवण्यात आले होते. मात्र या वास्तूच्या निर्मीतीकाळातच त्याचा मृत्यू झाल्यामुळे, पुढे जाऊन हे काम सलाबत खान (दुसरा) याने पूर्ण केले. सलाबत खान (दुसरा ) हा सलाबत खान पहिल्याचा भाचा होता. त्यानेच आपल्या मामाचे काम पूर्ण केले. सुमारे इ.स १५७६ ते इ.स. १५८३ च्या काळात हा महाल (Farahbakhsh) बांधून पूर्ण झाला.
फराहबक्ष महालाच्या वास्तूशैलीविषयी ! (Farah Bagh)
ही इमारत अष्ट भुजाकार आकारतील आहे. ज्याचा सर्वात वरचा मजला हा सपाट छताने संपूर्ण झाकलेला आहे. या महालाच्या मध्यभागी जो सर्वात मोठा कक्ष आहे त्याच्या घुमटाची उंची ३० फुट इतकी आहे. यावरूनच या महालाच्या अंतर्गत भव्यतेची प्रचिती आपल्याला येते. ज्या भव्य चौथऱ्यावर हा महाल उभा आहे, त्या चौथऱ्यासहीत संपूर्ण महाल ४५.७२ मीटर बाय ४५.१८ मीटर इतका विस्तारित आहे. या महालाचे संपूर्ण बांधकाम हे दगड आणि चुन्याने करण्यात आलेले आहे.
संपूर्ण बांधकाम तोलून धरन्यासाठी ‘शिसम’ या लाकडाचा वापर करण्यात आलेला आहे. महालाच्या आत तसेच बाहेरून चुन्याचे प्लास्टर करण्यात आलेले आहे. या महालाच्या चारी बाजूने सुकलेले तलाव आपल्याला दिसतात. या सर्व तलावांसाठी शहरातील भिंगार भागातून पाण्याचा पुरवठा होत असे. त्यासाठी तत्कालिन सर्वात अद्ययावत समजल्या जाणाऱ्या खापर नळयोजनेचा वापर करण्यात येत असे. एका अष्टकोनी चौथऱ्यावर या महालाची उभारणी करण्यात आलेली असून, त्याच्या मध्यभागी चौकोनी आकराचा हौद आहे. हा महाल दोन मजली असून वरपर्यंत पोहोचण्यासाठी ९० मी. लांब अशा उंच पायऱ्यांच्या मार्गाने पोहोचता येते.
या वास्तूचा आकार अनियमित अशा अष्टकोनीय आकारात बांधण्यात आलेला आहे. कारण याच्या एका कोपऱ्यातील सपाट भींतीमुळे त्याचा अष्टकोनीय आकार अनियमित झालेला आहे. या मुख्य वास्तूच्या मुख्य चौकोनी पायापेक्षा ही भिंत १५.२४ मी. उंच आहे. मुख्य कक्षामधे उंच आणि भव्य अशा कमानींचे निर्माण करण्यात आलेले आहे. ज्यातील दोन कमानींचे अवशेष आजही आपल्याला पहायला मिळतात. या महालाच्या भोवती मोठी आमराई असलेले मोठे उद्यान आणि कारंजी असल्याचे पुरावे मिळालेले आहेत.
अहमदनगरसारख्या कोरड्या आणि उष्ण हवामान असलेल्या शहरात उन्हाळ्याच्या दिवसात थंडावा मिळावा, येणाऱ्या राजेशाही पाहुण्यांना मनोरंजनाची मेजवानी मिळावी या हेतूने हा महाल बांधण्यात आलेला आहे. येथे जलविहार करण्याचीही सोय होती. जलविहार करूनच त्याकाळी महालात येण्याचा रस्ता होता. त्यामुळेच याला जलमहाल असेही संबोधण्यात येते. सन १५८३ मध्ये या अष्टकोनी महालाची निर्मीती पूर्ण झाली. न्यामतखान दख्खनी आणि सलाबतखान (दुसरा) यांनी बादशहाचे स्वप्न प्रत्यक्षात आणले.
फराहबक्ष महालाची (Farah Bagh) काही खास वैशिष्ट्ये.
- चौरसाकृती तलावाच्या मध्यभागी असलेल्या चौथऱ्यावर ही वास्तू बांधण्यात आलेली आहे.
- उत्तम वायुविजन आणि प्रकाश व्यवस्था यासाठी ही वास्तू प्रसिद्ध आहे.
- पुर्वीच्या काळात बांधण्यात आलेले एक उत्तम प्रतीचे नाट्यगृह (ऑडीटेरीअम) असेही या वास्तूला म्हणता येईल. ही वास्तू नृत्य, गाणी, मुशायरा, जलशांसाठी वापरली जात असल्याने येथील ध्वनी व्यवस्थित एकू जाईल, तसेच दिवाणखान्यातील कार्यक्रम सर्वांनी अगदी वरच्या मजल्यापर्यंत एकू जाईल तसेच दिवाणखान्यातील कार्यक्रम सर्वांना दिसू शकेल अशी या वास्तूची रचना करण्यात आलेली आहे. येथे होणाऱ्या कार्यक्रमांचा ध्वनी सर्वत्र योग्य पद्धतीने पोहोचण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या कोनाड्याच्या रचना आहेत. जुन्या इमारतींमध्ये घुमणारा आवाज या ठिकाणी घुमत नाही, कारण येथील विशिष्ट पद्धतीचे बांधकाम. अगदी तिसऱ्या मजल्यापर्यंत खालच्या मजल्यावर चालणाऱ्या कार्यक्रमाचा आवाज पोहोचत असे.
- मुख्य कक्षामधे कुठेही खांब नाही. त्यामुळे जागा भव्य भासते. संपूर्ण वास्तूला चोहोबाजूने अनेक दरवाजे, जिने आहेत. प्रेक्षकांना सहज ये-जा करता यावी आणि त्याचा कार्यक्रमात कुठलीही बाधा येणार नाही, इतका दूरदर्शी विचार करून ही वास्तू बांधली असल्याचे दिसून येते.
- भर उन्हाळ्यातही येथे थंडावा रहावा यासाठी छतात पोकळी ठेवून त्यातून हवा खेळेल अशी रचना करण्यात आलेली आहे. महाल तलावाच्या मध्यभागी बांधण्यात आलेला असल्याने पाण्यावरून वहात येणारा शीतल वारा महालातील वातावरण थंड ठेवत असे.
- महालाच्या (Farahbakhsh) चारही बाजूला आणि प्रवेशद्वारावर मध्यभागी कारंजे आहेत. ही कारंजी आता बंद असली तरी त्याकाळी यामुळे काय नजारा दिसत असेल याची आपण कल्पना करू शकतो. कारंज्यासाठी पाणी आणण्यासाठी करण्यात आलेली खापरी नळयोजना आजही पाहता येते.
- या वास्तूला आत मध्ये एकही खांब नाही हे याचे आणखी एक वैशिष्ट्य. आरसीसी बांधकामासारखं सागवानी लाकूड कॉलम सारखं भींतीत वापरलेले आहेत. सध्या पडझड झालेल्या भागांमधून ते दिसते. लोकांनी या लाकडाची चोरी केल्याचे दिसून येते. रंगमहालाच्या फ्लोरिंगमध्ये काचा लावलेल्या दिसतात. रात्री दिवे लावले की पुर्ण जमीन उजळून निघावी हा उद्देश. येथील ग्रिनरूम चे बांधकाम तर इतके अफलातून आहे, की आत गेल्याशिवाय तेथे काही आहे हे समजत नाही.
फराहबक्ष (Farah Bagh) म्हणजे नजरेला सुख देणारी असा त्याचा अर्थ होतो. त्याकाळी नजरेला सुख देणारी, सुगंधीत वातावरण, उत्तम वायुविजन, जबरदस्त ध्वनी नियंत्रण यांमुळे अनेक मैफिली जागवलेला फराहबक्ष महाल म्हणजे मध्य युगीन इतिहासातील जगातील अद्वितीय वास्तू होती. त्याकाळी अनेक राजा महाराजांनी निजामशाहीचा पाहुणचार या वास्तूत घेतला. चांदबीबी, अकबरपुत्र मुराद, शाहजहान आणि पानिपतावर मराठ्यांच्या सैन्याचे नेतृत्व करणाऱ्या सदाशिवराव भाऊ पेशव्यांनी देखील येथे पाहुणचार घेतल्याचे, इथे वास्तव्य केल्याचे उल्लेख आहे. शहाजहान बादशहा येथेच काहीच दिवस वास्तव्यास होता.
त्याकाळातच त्याला या वास्तूवरून ताजमहालाची कल्पना सुचली. आणि खरोखरच फराहबक्ष महाल (Farah Bagh) आणि ताजमहाल यांच्या बांधकामशैलीमध्ये कमालीचे साम्य असल्याचे आढळते. असे असताना आज मात्र ही वास्तू खरोखर फारच दुरावस्थेत आहे. मुर्तझा निजामशहा ने १५७६ मध्ये बांधून घेतलेली ही वास्तू आज दुर्लक्षित अवस्थेत असली तरी त्याची भव्यता, वेगळेपण आजही जाणवते. मोठे गवाक्ष, उंच कमानींनी सुशोभित असणारी ही वास्तू आपल्याला बराच वेळ इथेच थांबून ठेवते. महालाच्या मध्यभागी कारंजे, त्याभोवती रंगमहाल, महालाच्या चारही बाजूंनी पुन्हा कारंजे अशी त्याची मोहक रचना, त्याचे अवशेष आजही टिकून आहेत.
अहमदनगरसारख्या शांत, लहान शहरात आज महापालिका आहे. तेव्हा इतक्या महत्त्वाच्या वास्तूची ही दूरावस्था खटकते. फार नाही पण थोडी डागडुजी आणि पर्यटकांसाठी काही सुविधा, नियम केले गेले तर नक्कीच ही वास्तू लोकांचे आकर्षण ठरेल यात शंका नाही.
या ठिकाणाला भेट द्यायला कसे जाल ?
This post was last modified on July 10, 2021 6:01 pm
View Comments (2)
Thanks for sharing. I read many of your blog posts, cool, your blog is very good.
Thank you for your feed back ! Its motivating us to create more such content.