Table of Contents
समाजवादी संग्रहालय, प्राग – निर्मिती काळ – वर्ष – 2001
युरोपमध्ये अनेक देश आहेत जे पर्यटनासाठी, तेथील निसर्गसौंदर्यासाठी पर्यटकांमध्ये लोकप्रिय आहेत. त्यातील एक लोकप्रिय देश म्हणजे चेक प्रजासत्ताक. या देशातील प्राग या शहराला भेट देणे मोठी ऐतिहासिक अनुभूती ठरते. येथील विविध ऐतिहासिक स्थळं, वास्तू काळाच्या ओघात आजही टिकवून ठेवलेल्या आहेत. संपूर्ण शहर नव्या जुन्याचा संगम आहे. अशा या शहरात थोडे हटके असे एक संग्रहालय आहे. ‘कम्युनिझम म्युझियम’ (Communist museum, Prague ) हे साम्यवादाचा अभ्यास करणाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे संग्रहालय आहे. चेक रिपब्लकिन देशाच्या राजधानीत हे आगळेवेगळे संग्रहालय उभारण्यात आले आहे. राजकिय, सामाजिक अभ्यासकांसाठी हे छोटेखानी संग्रहालय म्हणजे कागदपत्रं आणि माहितीचा खजिनाच म्हणता येईल. कसे आहे हे संग्रहालय ? काय आहे या संग्रहालयाची संकल्पना ? हे आपण आजच्या या भागात जाणून घेणार आहोत.
संग्रहालयाची मुळ संकल्पना
खरं तर साम्यवादाच्या काळातील जीवनशैली मांडण्यासाठी उभारण्यात आलेले हे संग्रहालय (Communist museum, Prague ) मात्र उभारण्यात आले आहे , ते एका खाजगी व्यवसायाच्या स्वरूपात, ही एक गंमतीची गोष्ट वाटते. चेक देशाच्या या लोकांवर एकेकाळी ज्या कम्युनिसट लोकांनी राज्य केले तो इतिहास मांडला गेला आहे तो व्यावसायिकतेतून. पण हे संग्रहालय उभारून या देशाने कम्युनिझमची संपूर्ण कारकिर्दच संग्रही करून ठेवली आहे, जी पुढील पिढ्यांना फार मार्गदर्शन करणारी आहे.
कोठे आहे हे संग्रहालय ?
चेक रिपब्लिकन या देशाची राजधानी असणाऱ्या प्राग या अतिशय सुंदर आणि ऐतिहासिक महत्त्व असणाऱ्या या शहरात हे संग्रहालय (Communist museum, Prague ) आहे. व्ही सेल्निसी – 4 येथे हे संग्रहालय आहे. हे संग्रहालय चेकोस्लोव्हाकियातील दुसऱ्या महायुद्धानंतरच्या कम्युनिस्ट राजवटीचा लेखाजोखा मांडण्यासाठी हे संग्रहालय उभारण्यात आले आहे.
कोणी निर्माण केले हे संग्रहालय ?
या आगळ्यावेगळ्या संग्रहालयाची निर्मिती अमेरिकन व्यापारी आणि राजकारणाचे अभ्यासक असणाऱ्या ‘ग्लेन स्पिकर’ यांनी केली आहे. यासाठी त्यांनी बराच पैसा खर्च केल्याचे दिसून येते. ज्यांनी 28,000 डॉलर्स खर्च करून या संग्रहालयात असणाऱ्या 1 हजार कलाकृती खरेदी केल्या आणि त्यातून हे संग्रहालय उभारण्यात आले. ‘जॅन कॅपलान’ या माहितीपट निर्मात्या यांनी या संग्रहालयाची संकल्पना सत्यात उतरवली आहे. हे संग्रहालय उभारणे हे एकप्रकारचे चेक च्या बदललेल्या अर्थव्यवस्थेचे आणि पाश्चात्य भांडवलशीहीचे द्योतकच म्हणता येईल.
संग्रहालय उभारणाऱ्या ग्लेन स्पिकर विषयी –
ग्लेन स्पिकर हा 1980 च्या दरम्यान युरोपमध्ये स्थलांतरीत झाला. प्रथम तो इंग्लड आणि नंतर पश्चिन जर्मनी असा त्याचा प्रवास होता. दुसऱ्या महायुद्धानंतर जर्मनी दोन विभागात विभागल्यानंतर तो विभाजित जर्मनीत काही काळ फिरला. त्याने सर्व राजकिय, समाजिक व्यवस्थेचा अभ्यास केला. नंतर 1989 मध्ये बर्लिनची भिंत पडल्यानंतर हा तरूण प्रवासी भिंतीच्या पलिकडे प्रवास करून लागला आणि शेवटी प्राग येथे पोहोचला. प्रागमध्ये गेल्यावर त्याच्याकडे कुठलाही ठोस व्यवसाय नव्हता, मात्र त्याकाळात अमेरिकेने चेक देशात नवभांडवशाहीच्या अनेक संधी देऊ केल्या होत्या. या संधीचा फायदा घेत, ग्लेनने स्वतःचा पहिला व्यवसाय सुरू केला, लिटल ग्लेन नावाचा जाझ क्लब. त्यानंतर त्याने बोहेमिया बॅगेल नावाच्या रेस्टॉरंटची साखळी सुरू केली. मात्र या व्यवसायात स्थिर झाल्यावर त्यांना काहीतरी वेगळे करावेसे वाटत होते. प्राग शहरवासीय ‘वेलवेट रिझोल्युशन’ नंतर आपला कम्युनिझमचा इतिहास विसरत चालले होते. त्यांना या इतिहासात कोणताही रस दिसत नव्हता. मात्र प्राग शहराला दरवर्षी लाखो पर्यटक भेट देतात,त्यामुळे अमेरिकन भांडवलशाहीच्या संधी बघून काही लोकांना असे वाटले की, प्रागमध्ये असे साम्यवादाचे संग्रहालय उभारणे एक उत्तम व्यावसायिक कल्पना आहे. त्यातून हे संग्रहालय (Communist museum, Prague ) उभारण्यात आले.
स्पिकरच्या या संग्रहालयातील 1हजाराहून अधिक वस्तू या त्यांनी स्वतः जमवलेल्या आहेत. त्यांनी या वस्तू फ्लि मार्केट आणि रद्दीच्या दुकानांमध्ये फिरून मिळवल्या आहेत.त्यांनी भूतकाळातील अवशेष शोधले, जे स्थानिक लोक फक्त फेकून देणार होते ,अशा अनेक वस्तू त्यांनी जमवल्या आणि संग्रहालय उभारले आहे. जसे की शेतातील नांगर, सीमा तपासणी पथके आणि अमेरिकन विरोधी पोस्टर्स ची छायाचित्रे, रासायनिक युद्ध, संरक्षण सूट आणि लेनिन आणि मार्क्सचे पुतळे यांचा त्यात समावेश आहे.
संग्रहालयाच्या इमारतीविषयी (Communist museum, Prague )
या संग्रहालयाच्या (Communist museum, Prague ) दर्शनी भागात कार्ल मार्क्स चा एक सुबक पुतळा उभारण्यात आलेला आहे. याठिकाणीच पर्यटकांना तिकिटे आणि संग्रहालयाविषयीच्या इतर गोष्टींची माहिती मिळते. सुमारे 1 हजार 500 चौरस मीटर जागेत वसवलेले हे संग्रहालय आहे. याठिकाणि प्रवेश करताच पर्यटकांना अगदी त्याकाळची अनुभूती मिळते. छोटे व्हिडियो, पोस्टर्स आणि काही विशेष कलाकृतींच्या माध्यमातून हे संग्रहालय आकाराला आले आहे. येथे काही दालने अशी आहेत, ज्यामुळे त्याकाळच्या खोल्या, वस्तू, शॉक वर्करच्या कार्यशाळेचे, शाळेचे वर्गखोली, मुलांचे बेडरूम आणि चौकशी कक्षाचे मॉकअप यांची पुर्नरचना केली आहे.
कम्युनिझम अंतर्गत दैनंदिन जीवन कसे होते हे दर्शविणाऱ्या या संग्रहालयात अनेक मनोरंजनात्मक वस्तूही ठेवण्यात आलेल्या आहेत. येथे ६२ पॅनेलवर वर्णन करण्यात आलेले हे दालनं फार मोठा माहिती आणि ज्ञानाचा खजिना आहे. येथे चेक न्यूज एजन्सिचे संग्रह, सुरक्षा सेवा संग्रह, लष्करी छावणी कामगार संघटनेेचे संग्रह आणि आघाडीच्या चेक छायाचित्रकारांच्या वैयक्तिक संग्रहातील मोठ्या प्रमाणातील छायाचित्रण सामग्रीने हे संग्रहालय समृद्ध आहे. चेकोस्लोवाकियामध्ये साम्यवादाच्या सावलीतले जीवन कसे होते याची पुर्नरचना करण्याता प्रयत्न म्हणजे हे संग्रहालय आहे.
प्रागमधील कम्युनिझम संग्रहालय (Communist museum, Prague ) हे अशा प्रकारचे प्रमुख आकर्षण आहे. ते सोव्हिएत युनियनच्या काळातील चेक प्रजासत्ताक या सध्याच्या देशातील लोकांचे जीवनमान पर्यटकांना दाखवते. हे संग्रहालय पहाताना आपल्याला समाजवादी तत्त्वांविषयी अनेक अंगांनी मार्गदर्शन करते. समाजवादाचे विविध पैलू या संग्रहालयाद्वारे समजतात. समाजवादाचे चांगले आणि वाईट असे दोन्ही पैलू येथे मांडण्यात आले आहे.
संग्रहालयातील मुख्य दालनं
या संग्रहालयात साम्यवादाचे आदर्श जीवन दर्शवण्यासाठी काही विशेष दालनं उभारण्यात आली आहेत. दुसऱ्या महायुद्धानंतर कम्युनिस्ट राजवटीत जीवनमान कसे होते ? , पोलीस दल व्यवस्था कशी होती ? त्यांच्या कामांची शोकांतिका दर्शवणारी नाटिका निर्माण केली गेली आहे. त्यात शाळेची खोली, मर्यादित पुरवठा असणारे दुकान, आणि एक गुप्त पोलिस चौकशी कक्ष दर्शविणारी खोली निर्माण करण्यात आलेली आहे. येथील कलाकृतींचा व्यापक संग्रह पहात पर्यटक बराच काळ येथे व्यतित करतात. समाजवादी व्यवस्थेवेळी निर्माण करण्यात आलेले चित्रपट आणि छायाचित्रे येथे भरपूर आहेत. त्याकाळी समाजवादाचा प्रचार करण्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या कलाकृती, ऐतिहासिक कागदपत्रे, विशेष व्यक्तींचे पुतळे आणि लष्करी वस्तूंचा संग्रह आपल्याला या रूक्ष वाटणाऱ्या विषयाची उत्सूकता निर्माण करतो. येथील त्यावेळसारखी पुर्नबांधणी करण्यात आलेली शाळेची खोली, एक समाजवादी दुकान आणि एक वर्कशॉप आहे. जे पर्यटकांना विशेष आवडते.
हे संग्रहालय चेकोस्लोवाकियातील कम्युनिस्ट राजवटीच्या कारकिर्दीचा लेखाजोखा मांडणारे आहे. येथे प्रत्येक दालनाची माहिती चेक आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेत देण्यात आलेली आहे. कम्युनिस्ट राजवटीत जगणे, कायदा आणि सुव्यवस्था, शिक्षण व्यवस्था आणि व्यापार आणि व्यवसाय कसे होते या विषयाची इत्थंभूत माहिती या संग्रहालयातून मिळते. ही सर्व वर्णने लिखित आणि चित्रमय स्वरूपात मांडण्यात आलेली आहे. या सर्व माहितीच्या पार्श्वभूमीला सर्वत्र लाल आणि काळ्या रंगात वेगवेगळ्या कलाकृती मांडण्यात आलेल्या आहेत.
स्वप्न, वास्तव आणि दुःस्वप्न तीन शोकांतिका
संग्रहालयाचा (Communist museum, Prague ) रचनाकार जॅन कॅप्लान यांनी याठिकाणी कम्युनिझमच्या विकासाचे कालक्रमानुसार वर्णन करणारे स्वप्न, वास्तव आणि दुःस्वप्न नावाच्या तीन संकल्पनांमध्ये कम्युनिझमचे वास्तव मांडले आहे. ते पहाणे हे या संग्रहालयाचे खास वैशिष्ट्य आहे.
स्वप्न मध्ये 1918 मध्ये चेकोस्लोव्हाकियाचा पाया, 1920 च्या दशकात कम्युनिस्ट चळवळीची सुरूवात आणि दुसऱ्या महायुद्धाच्या घटना आणि त्यानंतरचा कालपट दाखवण्यात आला आहे. ज्या या घटनांचा कम्युनिस्ट राजवटीच्या स्थापनेसाठी हातभार लावलेला आहे.
वास्तव आणि दुःस्वप्न या विभागात 1948 मध्ये फेब्रुवारीच्या सुरुवातीला सुरू झालेल्या कम्युनिस्ट पक्षाच्या 41 वर्षांच्या राजवटीचे चित्रण पहायला मिळते. नंतरच्या विभागांमध्ये 1950 च्या दशकातील घडामोडी, राजकीय दडपशाही, शो ट्रायल्स आणि कामगार छावण्यांचे युग यांचे वर्णन करणाऱ्या वस्तू, देखावे, फोटोज, कागदपत्रे यांचा समावेश आहे.
शेवटाकडे नेणारा हा भाग अगदी गडद काळ्या रंगात घडवण्यात आला आहे. जेणेकरून त्याकाळची सामाजिक परिस्थिचे गांभिर्य समजेल. सुरुवातीचे सर्व विभाग हे प्रकाशमय, सुंदर रंगसंगतीमध्ये आहेत. त्यामुळे पर्यटकांना चेकोस्लोवाकियातील साम्यवाद्याच्या अंतर्गत दैनंदिन जीवनाचे दर्शन करवतो.
संग्रहालयाचे वैशिष्ट्य
हे संग्रहालय (Communist museum, Prague ) कालक्रमानुसार मांडले आहे. साम्यवादाच्या आरंभाची पार्श्वभूमी महत्त्वाची आहे. म्हणूनच सुरुवातीपासूनचा इतिहास आजच्या पिढीला समजावा अशीच येथे मांडणी करण्यात आली आहे. साम्यवादाचा हा प्रवास सुरू होतो 1918 पासून. चेकोस्लोवाकियाच्या स्थापनेपासून याची सुरूवात झालेली आहे. मार्क्स आणि एंगेल्ससह कम्युनिस्ट विचारसरणीचा जन्म, 1930 च्या दशकात नाझीवादाचा झालेला उदय, म्युनिक करार, 1940 च्या दशकात केलेला कब्जा आणि त्यापासूनची मुक्ती आणि 1948 मध्ये कम्युनिस्टांनी सत्ता काबीज केल्यापासून पुढील सर्व इतिहास येथे सविस्तर समजेल अशा स्वरूपात मांडलेला आहे. म्हणजेच 1948 ते 1989 पर्यंतचा कम्युनिस्ट युग हा संग्रहालयाचा मुख्य भाग आहे.
राजकीय प्रवाहाविषयी सांगणारे संग्रहालय
सोव्हिएत व्यवस्थेचे नीतिमत्ता, खाजगी व्यवसाय आणि सामूहिकीकरणाचे संपूर्ण उच्चाटन, कम्युनिस्ट प्रचार कसा करत असत आणि त्याकाळच्या समाजवादी नायकाचे चित्रण समाजात कसे केले जात असे हा सर्व राजकिय भाग चित्रमय स्वरूपात तुम्हाला समजतो. तसेच पोलीस आणि त्यांची गुप्तचर यंत्रणा कशी काम करत असे, त्यांच्या जीवनशैलीचा या पोलीसांवर कसा परिणाम होत असे हे एका ऑडियोक्लिप लावून आणि पुतळ्यांद्वारे दर्शविण्यात आला आहे. संग्रहालयातील हा भाग थोडा गुढ वाटतो, पण या भागाद्वारे बऱ्याच ऐतिहासिक राजकीय बाबी समजतात.
साम्यवादाच्या जीवनावश्यक गोष्टींविषयीचा अतिरेकी दृष्टीकोन
या संग्रहालयातील हा एक महत्त्वाचा भाग. आजच्या उपभोक्तावादी जीवनशैलीच्या जमान्यात त्यावेळी लोक कसे कमीत कमी साधनांमध्ये जीवन व्यतीत करत असत, हे बघून आपण आश्चर्यचकित होतो. जीवनावश्यक गोष्टींसाठी लोकांना किती कमी पर्याय असत, हे समजते. टॉयलेट पेपर आणि फळांसह मूलभूत उत्पादनांचा अभाव असणारी दुकाने, सर्वकाही खरेदी करण्यासाठी लोकांना रांगा लावाव्या लागत हे समजते. लोकांना सुटी घालवण्यासाठी किती मर्यादित पर्याय असत हे येथे दाखवण्यात आले आहे. एकिकडे जीवनातला हा संघर्ष समाजवाद आपल्याला दाखवतो, तर दुसरीकडे समाजवादी जीवनाच्या सकारात्मक कथाही येथे एकायला आणि पहायला मिळतात.त्यावेळी समाजात समुदाया म्हणून एकीची भावना होती, प्रत्येकाला काहीना काही हाताला काम होते. कोणीही बेकार नव्हते, ही समाजवादाची खरी ताकद येथील कथांमधून समजते.
शीतयुद्ध आणि स्थलांतर विभाग
येथे शीतयुद्ध आणि स्थलांतर यावर एक वेगळा विभाग आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर किंवा शितयुद्धा दरम्यान पळून जाण्याचा कोणी प्रयत्न करणाऱ्या लोकांच्या कथा आणि व्यथा येथे मांडण्यात आलेल्या आहेत. लोकांचा छळ कसा होत असे, राजकीय निर्णय कसे घेतले जात हे सर्व येथील कागदपत्रं, छायाचित्र यातून समजते.
कम्युनिस्टांची काळी बाजू
प्रदर्शनांमध्ये कम्युनिस्टांनी त्यांचे लोखंड, पोलाद आणि खाण उद्योग कसे विकसित केले, परंतु पर्यवरणाचा त्यामुळे नाश कसा झाला हेही येथे स्पष्ट करून दर्शवले आहे.
कोणकोणते पैलू मांडते हे संग्रहालय ?
हे संग्रहालय कम्युनिस्ट काळातील चेकोस्लोव्हाकियातील जीवनाच्या खालील पैलूंचे सूचक चित्रण दर्शवते. दैनंदिन जीवन, राजकारण, इतिहास, क्रीडा, अर्थशास्र, शिक्षण, कला त्यात विशेषतः समाजवादी वास्तववादी कलाप्रकार, माध्यमांमधील प्रचार, पीपल्स मिलिशिया, सैन्य, पोलिस (गुप्त पोलिस, एसटीबीसह ) सेन्सॉरशिप आणि न्यायालये आणि दडपशाहीच्या इतर संस्था, ज्यात स्टॅलिनिस्ट काळात शो ट्रायल्स आणि राजकीय कामगार शिबिरे यांचा समावेश आहे. हे विशेषतः 1948 च्या फेब्रुवारी पासून 1989 च्या क्रांतीपर्यंत देशावर राज्य करणाऱ्या निरंकुश राजवटीवर हे संग्रहालय आपले लक्ष केंद्रीत करते.
दुसऱ्या महायुद्धानंतर जगातील सर्वच देशांमधील जीवनमान बदलले होते. जेते राष्ट्र आणि हरलेले राष्ट्र यांच्यात शीत युद्ध सुरू होते, त्या सर्वांचा परिणामही लोकजीवनावर झाला होता. अनेक देशांमधील राजकीय भूमीका बदलल्या होत्या. त्यातला महत्त्वाचा देश म्हणजे जर्मनी. या संग्रहालयात जर्मनीचा दुसऱ्या महायुद्धानंतर झालेला बदलेला इतिहास फार सुंदररित्या दाखवला आहे. बर्लिनची भींत पाडल्यानंतरचे जल्लोष कऱणाऱ्या नागरिकांची अनेक छायाचित्रं, कागदपत्रं येथे मोठ्या आकारात लावले आहेत.
चैनीच्या जीवनशैलीला कायम विरोध करणाऱ्या कम्यनिस्ट विचारसरणीचे संपूर्ण दर्शन घडवणाऱ्या कम्युनिझम संग्रहालयाची इमारत मात्र अगदी चकाचक आहे. येथील सुविधा आणि व्यवस्था खरोखर वाखाणण्यासारखी आहे. प्राग आज अत्यंत आधुनिक शहर म्हणून ओळखले जाते. येथील ऐतिहासिक पर्यटन स्थळे टिकवूनही या शहराने आपले आधुनिक जग उभे केले आहे. त्यामुळे हे संग्रहालय 20 व्या शतकातील या घटनेचे एक अधिकृत ऐतिहासिक वर्णन म्हणून उभे करत आहे. तुम्ही प्राग या शहराला कधी भेट दिली तर, या संग्रहालयासाठी आवर्जून वेळ काढा. सकाळी 9 ते रात्री 8 पर्यंत हो संग्रहालय पर्यटकांसाठी खुले आहे. संग्रहालयाच्या आत एक छोटेखानी रेस्टॉर्ंटसुद्धा आहे. येथे प्रवेशशुल्कासाठी अनेक पर्याय आहे, जसे की कुटुंबासाठी, ठराविक संख्येच्या ग्रुपसाठी असे काही पर्याय आहेत. पर्यटनासह स्टडीटुरही करायची असेल तर हे संग्रहालय उत्तम पर्याय ठरतो. ज्यांना प्रत्यक्ष जाणे शक्य नाही, त्यांनी या लेखासह जोडलेले फोटो आवश्य बघा, तुम्हाला बरीच इंटरेस्टिंग माहिती मिळेल हे नक्की.
- ज्योती भालेराव
This post was last modified on May 18, 2025 2:04 am