Commonwealth Game 2030 : क्रिडा क्षेत्रासाठी एक आनंदाची बातमी आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्याचा मान भारताला मिळाला आहे. परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांनी सोशल मीडियावरून ही बातमी दिली आहे.
दिल्ली : 16/10/2025
भारतीय क्रीडा चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. 2030 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे (Commonwealth Game 2030 ) आयोजन करण्याचा मान भारताला मिळाला आहे. परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरून ही बातमी दिली आहे. त्यांनी हा देशासाठी अभिमानाचा आणि सन्मानाचा क्षण असल्याचे म्हटले आहे. या प्रतिष्ठित खेळांचे आयोजन करण्याची ही भारताची दुसरी वेळ असणार आहे. यापूर्वी 2010 मध्ये दिल्लीमध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे यशस्वीरित्या नियोजन करण्यात आले होते.
परराष्ट्र मंत्र्यांनी काय सांगितले ? (Commonwealth Game 2030 )
परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे की 2030 चे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा अहमदाबादमध्ये पार पडणार आहेत. जयशंकर यांनी लिहिले की, ” हा केवळ भारतासाठीच नाही तर गुजरातसाठी देखील एक अभिमानाचा क्षण आहे. भारताला जागतिक दर्जाच्या क्रीडा सुविधा आणि प्रतिभेचे केंद्र बनवण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टी आणि दूरदृष्टीचे हे परिणाम आहे.” जयशंकर असे देखील म्हणाले की, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचे आयोजन हे भारतासाठी ऑलिंपिकच्या आयोजनाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे.
गुजरातचे मुख्यमंत्री म्हणाले..(Commonwealth Game 2030 )
गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी देखील या प्रसंगी आनंद व्यक्त करताना लिहिले की, ” हा गुजरातचा आणि संपूर्ण देशासाठी एक ऐतिहासिक क्षण आहे. राष्ट्रकुल क्रीडा कार्यकारी मंडळाकडून 2030 च्या स्पर्धेसाठी अहमदाबादसाठी प्रस्तावित यजमान शहर म्हणून निवड करण्यात आली . जी राज्याच्या क्रीडा पायाभूत सुविधा आणि वाढत्या क्षमतांचा पुरावा आहे.” तसेच पटेल यांनी पंतप्रधान मोदींच्या दूरदर्शी नेतृत्वाची आणि भारताला जागतिक क्रीडा उत्कृष्टतेकडे नेण्याच्या वचनबद्धतेची देखील प्रशंसा केली आहे.
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या इतिहासाबाबत बोलायचे झाले तर या स्पर्धेची सुरूवात 1930 मध्ये कॅनडातील हॅमिल्टन येथे झाली होती. त्यावेळी या स्पर्धेतील ब्रिटिश एम्पायर गेम्स म्हणून ओळखले जात असे. यामध्ये मनोरंजक म्हणजे ब्रिटिश भारताने त्या पहिल्या हंगामात भाग घेतला नव्हता. भारताने 1934 मध्ये लंडनमध्ये झालेल्या दुसऱ्या हंगामात प्रथम भाग घेतला होता. आता येत्या 2030 या वर्षात राष्ट्रकुल स्पर्धेचे आयोजन भारतात होणार आहे. 2026 चे राष्ट्रकुल खेळ स्कॉटलंडमधील ग्लासगी येथे खेळले जाणार आहे. ज्यामध्ये 74 देशांचे 3,000 हून अधिक खेळाडू सहभागी होणार आहेत. त्यानंतर अहमदाबाद येथे 2030 मध्ये राष्ट्रकुल स्पर्धा खेळवल्या जाणार आहेत.