X

Translate :

Sponsored

Cathédrale Notre Dame d’Amiens – Construction Period – (1220 to 1270)

अमिन्स कॅथड्रेल ( Cathédrale Notre Dame d’Amiens )– निर्मीती काळ – (१२२० ते १२७०)

युरोपमध्ये फिरत असताना तुम्हाला निसर्ग जसा खुणावतो, तसेच तुम्हाला भूरळ पाडतात त्या येथील जुन्या वास्तू, चर्च, रस्ते आणि किल्ले. अनेक शतकांपूर्वी बांधण्यात आलेल्या या वास्तू आजही त्यांचे सौंदर्य राखून आहेत हे बघून आपल्याला फार आश्चर्य वाटते. आज मिसलेनियस वर्ल्डच्या माध्यमातून आपण अशाच एका सुंदर वास्तूचा आढावा घेणार आहोत. फ्रान्समधिल अमिन्स कॅथड्रिल ( Cathédrale Notre Dame d’Amiens ) ही एक जागतिक वारसास्थळ आहे. त्याची भव्यता, सुंदरता पर्यटकांसाठी आकर्षणाचा भाग आहे. हे चर्च बाहेरून जितके सुंदर आहे तितकेच ते आतूनही सुंदर आहे.

कॅथेड्रल म्हणजे काय ?

हे एक कॅथलिक चर्च आहे. कॅथेड्रल हे असे चर्च असते, की ज्या चर्चमध्ये बिशप ऑफ एमियन्सचे एक पद (आसन) असते. जे त्याठिकाणच्या धार्मिक कार्यांचे केंद्र समजले जाते. एरवी प्रत्येक चर्चमध्ये असे पद अनिवार्य असतेच असे नाही, मात्र ज्या चर्चमध्ये असे पद असते त्याला कॅथड्रेल असे म्हणतात.

अमिन्स कॅथड्रेल ( Cathédrale Notre Dame d’Amiens ) कोठे आहे हे ठिकाण ?

हे ठिकाण पॅरिसच्या उत्तरेस सुमारे १२० किलोमीटर अंतरावर आहे. फ्रान्सच्या पिकार्डी प्रदेशाची प्रशासकीय राजधानी असणाऱ्या एमियन्समधील सोम्मे नदीच्या किनाऱ्यावर हे कॅथड्रेल आहे.

कॅथड्रेलचा निर्मिती काळ.

हे चर्च फार जुने आहे. कॅथेड्रेल ( Cathédrale Notre Dame d’Amiens ) सुमारे १२२० आणि १२७० च्या दरम्यान बांधले आहे. या भव्य गॉथिक चर्चसाठी तुलनेने बराच कमी कालावधि लागल्याचे सांगण्यात येते.

कॅथड्रेलची वास्तूशैली.

गॉथिक कालखंडातील असामान्य व उच्चदर्जाची रेयोनंट वास्तूशैली हे या चर्चचे मुख्य वैशिष्ट्य आहे. ही शैली सुमारे १२३६ च्या दरम्यान सुरु झाली होती.

कॅथड्रेलचे एक अनोखे वैशिष्ट्य.

या चर्चच्या बांधकामाविषयी अशी अख्यायिका आहे, की चर्च बांधणारे कामगार आणि सत्ताधारी यांना या चर्चची आतून उंची इतकी मोठी करायची होती की ज्यामुळे त्यांना स्वर्गापर्यंत पोहोचता येईल. असे जुन्याकाळात सांगण्यात येत असे. पण आतील चर्चची उंची जास्त ठेवली तर भरपूर सुर्यप्रकाश येईल त्यामुळे हे चर्च जास्तीत जास्त उंच बांधण्यात आले असावे. मात्र कारण कोणतेही असो, त्याचा परिणाम म्हणून ‘अमिन्स कॅथड्रिल’ ( Cathédrale Notre Dame d’Amiens ) हे फ्रान्समधिल सर्वात उंच चर्च आहे. त्याचा आकार २००,००० क्यूबिक मीटर (२६०,०००) इतकी आहे.

जागतिक वारसास्थळांच्या यादीत समावेश.

या कॅथड्रेलचा समावेश युनेस्कोने जागतिक वारसास्थळांच्या यादीत १९८१ला केला. याच्या गॉथिक शिल्पकलेच्या वैशिष्ट्यामुळे त्याला हा दर्जा देण्यात आला आहे. या कॅथड्रेलचा मुळ स्टेन्ड ग्लासचा बराचसा भाग नष्ट झाला तरीही त्याचे सौंदर्य आजही पर्यटकांना भूरळ घालते.

चर्चच्या पुर्नबांधणीचा काळ.

१२१८ मध्ये या चर्चला आग लागली आणि या आगीमुळे चर्च आणि शहराचा भाग नष्ट झाला होता त्याचे पुर्नबांधकाम ११३७ आणि ११५२ च्या दरम्यान करण्यात आले. पुढे ११९३ मध्ये फ्रान्सचा राजा फिलिप दुसरा यांच्या लग्नाचे आयोजन या चर्चमध्ये करण्यात आले. १२१८ मध्ये लागलेल्या आगीने रोमनेस्क कॅथेड्रल नष्ट झाले होते. नवीन कॅथेड्रलच्या ( Cathédrale Notre Dame d’Amiens ) निर्मीतीसाठीचे नियोजन मास्टर बिल्डर रॉबर्ट डी लुझार्चेस यांनी केले होते. त्यानंतर १२२० मध्ये बिशप एव्हरार्ड डी फौइलोय यांनी या चर्चच्या बांधकामाचा पहिला दगड रोवला आणि चर्चच्या बांधणीला सुरुवात झाली.

लुझार्चेसने गॉथिक बांधकाम पद्धतीत क्रांती घडवून आणली. चर्चच्या विविध भागांच्या बांधकामासाठी त्यात्या प्रकारच्या, आकाराच्या दगडांचे तुकडे वापरण्याएवजी त्यांनी एकाच प्रमाणित आकाराचे दगड वापरून ही बांधकामशैली विकसीत केली. १२२८ पर्यंत ते या चर्चच्या बांधकामाचे वास्तूविशारद होते. पुढे १२५८ पर्यंत थॉमस डी कॉर्मोंच यांनी त्यांच्या या शैलीचे पालन केले. पुढे त्यांचा मुलगा रेनॉड डी कॉर्मोंट यांनी १२८८ पर्यंत आर्किटेक्ट म्हणून काम केले.

चर्चची बांधकामशैली.

चर्चच्या मुख्य मध्यवर्तीभागाचे बांधकाम पश्चिमेकडून पूर्वेकडे सुरू करण्यात आले. डी कॉर्मोंटने चर्चची भव्य कमान आणि खिडक्या असमान्य बनवून त्याच्या संरचनेला एक वेगळा आयाम मिळवून दिला. या सुंपूर्ण चर्चचे बांधकाम टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यात आले. मुख्य भाग (नेव्ह) १२३६ मध्ये बांधन पूर्ण झाला तर चर्चच्या गायनगृहाच्या वरच्या खिडक्यांचे बांधकाम १२६९ पर्यंत करण्यात आले होते. १३ शतकाच्या शेवटी चर्चमधिल क्रॉसच्या बाजू पूर्ण करण्यात आल्या तर १४ शतकाच्या सुरूवातीला चर्चचा दर्शनी भाग आणि बुरूजांचे काम करण्यात आले. अशा प्रकारे या भव्यदिव्य चर्चच निर्मीती अनेक काळ सुरू राहीली.

संरक्षण आणि जिर्णोद्धार.

पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी चर्चचे बरेच नुकसान झाले. युद्धादरम्यान त्याच्या काचेच्या सुंदर तावदानांचे हल्ल्यापासून बचाव करण्याच्या हेतूने त्या स्टेन्ड काचेच्या खिडक्या काही काळासाठी काढून टाकण्यात आल्या. असे केल्यामुळे चर्चचे या काळात फार कमी नुकसान झाल्याचे सांगण्यात येते. दरम्यानच्या काळात काही गोष्टींचे काळानुरूप नुकसान झाले असले तरी १९७३ आणि १९८० च्या दरम्यान अनेक भागांची पुर्नरचना करण्यात आली. १९८१ ला युनेस्कोने कॅथड्रेलला जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले. त्यानंतर पश्चिमेकडील दर्शनी भागाचा जिर्णोद्धार अलिकडील २००१ च्या वर्षी करण्यात आला.

फ्रेंच राज्यक्रांतीच्या वेळचे नुकसान.

फ्रेंच राज्यक्रांतीच्या वेळी फ्रान्समधील इतर लहानमोठ्या चर्चेस आणि वास्तूंप्रमाणे या सुंदर आणि भव्य कॅथड्रेलचेसुद्धा बरेच नुकसान झाले. अनेक पुतळे, वस्तू नष्ट करण्यात आल्या. येथील सामान, खजिना लुटला गेला. कॅथड्रेलचा बराचसा भाग क्रांतिकारी उत्सवांमध्ये वापरला जात असे. धार्मिक कार्यासाठीचा कॅथड्रेलचा वापर कमी होऊन क्रांतीच्या कार्यासाठी तो होऊ लागला. पुढे १८०० मध्ये कॅथड्रेल पुन्हा धार्मिक स्थळ म्हणून नावारूपास आले. त्यानंतर 1802 मध्ये त्याचे पहिले जीर्णोद्धार कार्य सुरू झाले. अनेक वास्तूविशारदांचा हात या कॅथड्रेलच्या निर्माणासाठी लागले आहेत.

कॅथड्रेलच्या बांधकामातील स्थित्यंतरे – (16-18 वे शतक )

फ्रेंच राज्यक्रांती म्हणजे काय ?

फ्रेंच राज्यक्रांती ही घटना जगाच्या इतिहासातील एक महत्त्वाची घटना आहे. अठराव्या शतकातील ही घटना संपूर्ण जगावर दूरगामी परिणाम करणारी होती. या क्रांतीमुळे युरोपमधील सरंजामशाही समाजरचना पूर्ण नष्ट झाली आणि भांडवलशाही समाजरचना औद्योगिक क्रांतीच्या पायावर उभारली जाऊ लागली म्हणून आधूनिक युरोपची उभारणी फ्रेंच राज्यक्रांतीपासून झाली असे मानतात. त्याचप्रमाण क्रांती ही संकल्पना इतिहास व राज्यशास्र यांत प्रथम अस्तित्वात आली, ती फ्रेंच राजक्रांतीनंतर व राज्यक्रांतीमुळेच.

16 व्या शतकात या कॅथड्रेलवर ( Cathédrale Notre Dame d’Amiens ) तीनवेळा संकटे कोसळले. कॅथड्रेलला लागलेली आग, याच काळात आलेले मोठे वादळ आणि येथून जवळच असणाऱ्या पावडरच्या कारखान्यात झालेला स्फोट हे ते तीन संकटं. मात्र या तीनही प्रसंगात कॅथड्रेलला फार नुकसान सोसावे लागले नाही. बदलत्या जीवनशैलीनुसार आणि आलेल्या संकटांमुळे या कॅथड्रेलमध्ये वेळोवेळी अनेक बदल करूनही आज ते आपल्याला सुंदर आणि जुन्या काळाप्रमाणेच गुढ, भव्य भासते हे त्याचे विशेष. खास गुलाबाची एक खिडकी पश्चिम ट्रान्ससेप्टमध्ये स्थापित करण्यात आलेली आहे.

मध्ययुगीन रॉड स्क्रिनची जागा अलंकृत लोखंडी ग्रिल कॉयर स्क्रिनने बदलली आहे. ज्यामुळे मुख्यभागात असणाऱ्या लोकांना चर्चच्या मुख्य वेदीवरील दृश्य पहाता येतील अशी त्यांची नवीन रचना करण्यात आली आहे. चर्चच्या आत तुम्ही पाऊल ठेवताच तुम्हाला त्याची भव्यता आणि तेथील थंडावा जाणवतो. प्रत्येक कोपरानकोपरा कलाकुसर करून सजवण्यात आला आहे. काचेची सुंदर तावदानं, अनेक चित्रं, लाईटस् हे सर्व पहातच रहावेत असे आहेत.

कॅथड्रेलच्या बाहेरील परिसर

युरोपमधिल सर्वच ठिकाणी ओपन कॅफेजची जी पद्धत पहायला मिळते तीच पद्धत येथेही आहे. भव्यदिव्य कॅथड्रेलच्या बाहेर संपू्र्ण परिसरात विविध कॅफे आहेत. शॉपिंगसाठी काही दुकाने आहेत. येथे भेट देण्यासाठी पर्यटकांची भरपूर गर्दी असते. आणि चर्च भरपूर मोठे असल्याने तुम्हाला सर्वत्र फिरून बघण्यासाठी तुमच्याकडे वेळ असायला हवा. तरच संपूर्ण चर्च बघून होते.

खरेदी.

या चर्चच्या आजुबाजूला सुंदर गल्ल्या, घरं आहेत. छोट्या मोठ्या दुकानांमध्ये अनेक वस्तू आहेत ज्या युरोपची खासियत म्हणता येईल. पण युरोपमध्ये प्रत्येक शहरात तेथील पर्यटनाच्या स्थळांचे असे एक फ्रिज मॅग्नेट मिळतात, ते मात्र तुम्ही घ्यायला हरकत नाही.

चर्चच्या आत तुम्ही पाऊल ठेवताच तुम्हाला त्याची भव्यता आणि तेथील थंडावा जाणवतो. प्रत्येक कोपरानकोपरा कलाकुसर करून सजवण्यात आला आहे. काचेची सुंदर तावदानं, अनेक चित्रं, लाईटस् हे सर्व पहातच रहावेत असे आहेत. तुम्ही जर कधी फ्रान्स देशाला भेट दिली तर या पर्यटन स्थळांच्या यादीत तुम्ही या कॅथड्रेलला नक्की स्थान द्या. फ्रान्समधिल आयफेल टॉवरप्रमाणेच हे कॅथड्रेलही तुम्हाला नक्की आवडेल.

This post was last modified on May 20, 2024 10:02 pm

Sponsored
Jyoti Bhalerao:

View Comments (1)

  • Hi my family member I want to say that this post is awesome nice written and come with approximately all significant infos I would like to peer extra posts like this.

Sponsored

This website uses cookies.

Sponsored