X

Translate :

Sponsored

बौद्ध लेणी, वेरूळ – मनःशांतीचे प्रतिक (Buddhist cave,verul 6th to 10th century AD) ( इ.स.६ ते १० वे शतक )

भारतातील मंदिरं, प्रार्थनास्थळं आणि लेणीवैभव हे जगासाठी कायमच आकर्षणाचा विषय आहे. विविध धर्मांची मंदिरं आणि प्रार्थनास्थळं, त्यांच्या कलाकुसर, बांधकामांच्या शैली या सगळ्याला आपल्या भारतीय जीवनात आणि पर्यटनामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. भारतातील लेण्या हे भारताचा फार मोठा मौल्यवान ठेवा आहे. भारतामध्ये एकुण सुमारे १ हजार लेणी असल्याची नोंद आहे. त्यापैकी साधारण शंभर लेणी या हिंदू आणि जैन पद्धतीच्या आहेत तर उरलेल्या सर्व लेण्या या बौद्ध धर्माचा प्रसार आणि जतन करण्यासाठी बांधलेल्या आहेत. संपूर्ण भारतात लेण्या खोदलेल्या असल्या तरी महाराष्ट्रातील संभाजीनगर येथील वेरूळ गावातील ‘लेणी’ (Buddhist cave) हे जागतिक पर्यटकांचे आज मोठे आकर्षण आहे.

वेरूळ हे संभाजीनगर पासून सुमारे २९ किमी अंतरावर आहे. या गावाच्या बाजूने इला नदी वहाते. शांत, रम्य असे हे गाव. येथील लेण्यांची निर्मीती ही सुमारे सहाव्या शतकापासून सुरू झाली. पुढे टप्प्याटप्प्याने येथील लेण्यांची निर्मीती करण्यात आली. आज येथील ३४ लेणी या पर्यटकांसाठी खुल्या आहेत. पुरात्त्वखात्याने त्यांना क्रमांक देऊन पर्यटकांच्या फिरण्यासाची येथे चांगली सोय केली आहे.

वेरूळच्या लेण्यांमधील १ ते १२ क्रमांकांची लेणी बौद्ध कलाशैलीची आहे. १३ ते २९ क्रमांकाची लेणी हिंदू आणि उरलेल्या ३० ते ३४ क्रमांकाची लेणी ही जैन कलाप्रकारातील आहे.

वेरूळला कसे जाता येईल ?

वेरूळ लेणीला पोहोचण्यासाठी, संभाजीनगर पासून तुम्हाला रिक्षा, बस, खाजगी वाहन असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. तेथे पोहोचल्यावर तिकिट काढून आत प्रवेश दिला जातो. समोरची ‘जागतिक वारसास्थळ वेरूळ लेणी’ अशी दगडी पाटी आपले लक्ष वेधून घेते. आत प्रवेश करताच विस्तिर्ण हिरवळ पसरलेली आपल्या दृष्टीस पडते. हिरवळीच्या दोन्ही बाजूने दगडीमार्ग तयार केले आहेत. त्यामार्गांवर लेणी क्रमांक आणि तिकडे जाण्यासाठीचे दिशादर्शक बाण कोरल्याचे दिसते. मुख्य गेटपासून उजव्या बाजूने जर तुम्ही लेणी पहाण्यास सुरूवात केली तर तुम्हाला बौद्ध लेणींकडे (Buddhist cave) जाण्याचा मार्ग दिसतो. आणि तुमची सैर सुरू होते. आज आपण या लेखात वेरूळ येथील बौद्ध लेण्यांची सफर करणार आहोत. वेरूळ येथील कैलास मंदिर आणि जैन लेणी यांची माहीती तुम्हाला या लिंकवर वाचता येईल.

बौद्ध लेणींचे (Buddhist cave) स्वरूप !

वेरूळ येथील बौद्ध लेणी (Buddhist cave) या मुख्यत्वेकरून विहारगृहे या प्रकारातील आहेत. येथे फक्त एकच चैत्यगृह प्रकारातील लेणी आहे. येथील प्रत्येक लेणी, त्यातील विहार हे भव्य, ऐसपैस आहेत. ही सर्व लेणी या महायान पंथीयांची आहेत. मात्र काही गुंफांमधून वज्रयान प्रतिमांची सुरूवात झाल्याचे दिसून येते. खरं तर वेरूळला येणारे पर्यटक येथील लेणीदर्शनाची सुरूवात प्रसिद्ध अशा ‘कैलास मंदिरा’पासून करतात. कारण हे मंदिर मुख्य प्रवेशद्वारापासून समोरच विराजमान आहे. ते पाहून मग या मंदिराच्या उजव्याबाजूला असणाऱ्या बौद्ध लेण्या फिरण्यास सुरुवात होते.

तुम्ही सकाळी जर येथे लवकर पोहोचला तर दुपार पर्यंत तुमचा कैलास मंदिराचा भाग पाहून होतो. बौद्ध लेण्या पाहण्यासाठी दुपारी भर उन्हातही काही वाटत नाही कारण बौद्ध लेण्यांमध्ये (Buddhist cave) खूप नैसर्गिक थंडावा आहे. आजही आपण एखाद्या लेणीमधील कोपरा धरून तेथे ध्यानधारणा करू शकतो. कितीही गर्दी असली तरी येथे आपल्याला शांतता अनुभवता येते. येथील लेण्यांची माहिती घेण्याआधी आपण बौद्ध लेणींच्या साधारण प्रकाराविषयी थोडक्यात माहिती घेऊ.

चैत्यगृह म्हणजे काय ?

बौद्ध धर्मियांच्या प्रार्थनास्थळाला चैत्यगृह म्हणतात. हे बौद्ध सत्पुरूषांच्या समाधिस्थळ असते. येथे बौद्ध संतांच्या अवशेष असलेल्या समाध्या असतात. हे स्तूपाप्रमाणे बांधण्यात येतात. आणि त्यावर भव्य भगवान बुद्धाची मूर्ती कोरण्यात येते.

विहारगृह :

बौद्ध विहार म्हणजे भिक्षूंचे निवासस्थान, धार्मिक कार्य आणि ध्यानाचे केंद्र किंवा बौद्ध शिक्षणाचे केंद्र असायचे. अनेक बौद्ध लेण्या (Buddhist cave) या याच उद्देशाने निर्माण करण्यात येत.

वेरूळ येथील १२ लेणींपैकी ११ लेणी या विहार प्रकारातील आहे. तर १० क्रमांकाची लेणी ही चैत्यगृह प्रकारातील आहे.

लेण्यांची क्रमवार माहिती –

  • क्रमांक १ लेणी – हे लेणे म्हणजे शिल्परहित विहार आहे. येथे भिक्षूंना निवासासाठी एकुण आठ खोल्या आहेत.
  • क्रमांक २ लेणी – हे लेणे म्हणजे प्रार्थनास्थळ आणि निवास या दोन्हीसाठी असल्याचे दिसून येते. येथे राहण्यासाठी दोन खोल्या आहेत. गर्भगृह आणि बुद्धमूर्ती येथे आहेत. गर्भगृहात धर्मचक्रप्रवर्दनमुद्रेत सिंहासनावर बुद्धाची मूर्ती असून , डाव्या बाजूस अवलोकितेश्वर बोधिसत्त्वाची मूर्ती (Buddhist cave) आहे. उजव्या बाजूच्या दुसऱ्या बोधिसत्त्वाच्या मुकुटात स्तूपाची प्रतिमा आहे. वरील बाजूस गंधर्वांच्या मूर्ती आहेत. बाहेरील बाजूस द्वारपालाच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. या लेणीच्या प्रवेशमंडपातून आत गेल्यावर बारा खांबांचा चौकोनी मंडप आहे. त्या मंडपाच्या दोन्ही बाजूंस प्रचंड आकराच्या पाच बुद्धमूर्ती (Buddhist cave) आहेत.
  • क्रमांक ३ लेणी – येथे शिल्पे, शिल्पपट आणि अलंकृत स्तंभ ही या लेणीची काही वैशिष्ट्य आहेत. या लेणीची पडझड झालेली आहे. याच्या एका भिंतीवर एक भव्य शिल्पपट आहे. अग्नी, मारेकरी आणि जलप्रवासातील अपत्ती यांच्यापासून अवलोकितेश्वर संरक्षण करीत आहे, अशा आशयाचे हे शिल्प आहे. याच्या उजव्या बाजूला सिंह, नाग, हत्ती व पिशाच्चे यांपासून तो संरक्षण करत आहे हे शिल्पातून दाखवले आहे. मध्यभागी असलेल्या मंडपात बारा खांब आहेत. त्यावर कलश आणि पत्रपल्लवी कोरलेल्या आहेत.मंडपाच्या बाजूच्या दोन्ही भिंतीत आठ, तर गर्भगृहाच्या दोन्ही बाजूंसही दोन खोल्या असून गर्भगृहात बुद्धमूर्ती (Buddhist cave) आहे. द्वारपालांपैकी डाव्या बाजूची मूर्ती अवलोकितेश्विराची आहे.
  • क्रमांक ४ लेणी – हे लेणे दुमजली आहे. दुसऱ्या मजल्यावर बुद्धाची प्रतिमा (Buddhist cave) आणि दोन लहान खोल्या आहेत. मूर्तीच्या शेजारी कमलनालधारक अवलोकितेश्वर आहे. बोधिसत्त्वाच्या शेजारी स्री सेविका आहेत. कमलपुष्प हातात धरलेली तारा आणि कमंडलू धरलेल्या भृकुटीचे शिल्प आहे.
  • क्रमांक ५ लेणी – सर्वात भव्य, प्रचंड आकारचे हे लेणे आहे. हे लेणे महाविहार म्हणून ओळखले आहे. गाभारा, दालन, मुख्य मंडप आणि दोन्ही बाजूंच्या पडव्या अशी या भव्य लेणीचे विभाजन करण्यात आले आहे. येथील दहा खांबांच्या रचनेमुळे येथील निरूंद पडव्या तयार करण्यात आलेल्या आहेत. मागील बाजूस बुद्धप्रतिमा (Buddhist cave) असलेले विहार आहे. मंडपाच्या बाजूला लागून एकुण सतरा खोल्या आहेत. चैत्यगृहाप्रमाणे या लेणीची रचना आहे. येथील बुद्धमूर्ती धर्मचक्रप्रवर्तनमुद्रेत आहे.
  • क्रमांक ६ लेणी – तीन भागात विभागलेली अशी ही लेणी. पहिल्या भागात स्तंभ शालभंजिकांच्या सुंदर शिल्पांनी अलंकृत आहेत. मधील भागात मंडप, त्यामागे अंतराल आणि त्याच्या मागे बुद्धमंदिर (Buddhist cave) आहे. या मध्यभागाच्या दोन्ही बाजूस दोन मोठे मंडप आणि बाजूंना नऊ खोल्या आहेत. आतील भागात वज्रपाणी व अवलौकितेश्वर यांच्या भव्य मूर्ती आहेत. डावीकडे तारादेवी तर उजवीकडे अवलोकितेश्वर यांच्या भव्य मूर्ती आहेत. मयूरवाहनाखालील बाजूस पोथी वाचत असलेले भिक्षू तर अंतराळात विद्याधर दाखविलेले आहेत. येथील अनेक मूर्ती वैशिष्ट्यपूर्ण आहेत. गंगा यमुनेच्या लहान पण सूबक मूर्ती अशाच सुंदर आहेत.
  • क्रमांक ७ – ही लेणी अपूर्ण असून शिल्पविरहीत आहे.
  • क्रमांक ८ लेणी – या लेण्यांचे वैशिष्ट्य म्हणजे गाभाऱ्यातील प्रदक्षिणापथाची केलेली रचना. येथे गर्भगृह व बोधिसत्व, जंभाल व हरिती यांच्या मूर्ती आहेत.
  • क्रमांक ९ लेणी – या लेणीचे काम अत्यंत कोरीव आहे. येथेही अनेक प्रमाणबद्ध खांब, पद्धपाणी आणि तारा या देवतांचा प्रार्थनापट आदी शिल्पे येथे कोरण्यात आलेली आहेत.
  • क्रमांक १० लेणी – ही लेणी या सर्व बौद्धलेण्यांमधील (Buddhist cave) सर्वात आकर्षक, भव्य लेणी आहे. विश्वकर्मा लेणे किंवा सुतार लेणे या नावाने हे लेणे प्रसिद्ध आहे. हे लेणे चैत्यगृह स्वरूपाचे आहे. या चैत्यगृहाचा त्रिदलसदृश दर्शनी व इतर चैत्यगृहे यांत फरक आहे. हे चैत्यगृह भारतीय शैलगृहामधील अखेरची कलाकृती आहे. त्यामुळे चैत्यगृहांच्या मांडणीत कसकसे बदल होत गेले हे या चैत्यगृहाकडे बघून समजते. या चैत्यगृहाच्या आत गेल्यावर याचे सौंदर्य समजते. आत प्रशस्त आंगण आहे. दोन्ही बाजूला खांबांचे सोपे आणि ओसरी आहे. प्रांगणाच्या सर्व बाजूंचे स्तंभ घटपल्लवयुक्त आहेत. त्यांच्याद्वारे वरचा संपूर्ण मजला तोलून धरला आहे. मागच्या बाजूने असणाऱ्या भींतीत असणाऱ्या दरवाजातून चैत्यगृहात प्रवेश करता येतो. हे गृह गजपृष्ठाकृती आकाराचे असून त्यामध्ये एक मोठा स्तूप कोरलेला आहे. या स्तूपाच्या दर्शनी भागावर बोधिवृक्षाखाली प्रलंबपादासनातील धर्मचक्रप्रवर्तनमुद्रेतील बुद्धमूर्ती जीची उंची ४.८७ मीटर इतकी उंच आहे. या मूर्तीच्या दोन्ही बाजूस बोधिसत्वाच्या मूर्ती, त्यावर आकाशात विहार करणारी गंधर्व-मिथूने बुद्धावर पुष्पवर्षाव करीत आहेत असे शिल्प कोरण्यात आले आहे. या लेणीचा दर्शनी भाग इतर बौद्ध लेण्यांहून (Buddhist cave) वेगळा व कलात्मक आहे. या लेणीच्या गवाक्षाच्या दर्शनी भागावर डाव्या कोनाड्यात असणाऱ्या शिल्पात एक शिलालेख आहे. मात्र हा शिलालेख महायान पंथियांनी प्रसारित केला असल्याचे त्याच्यावर प्रसारित केलेल्या मंत्रावरून,त्याच्या अक्षरावरून स्पष्ट होते.
  • क्रमांक ११ लेणी – हे लेणे दोन ताल या नावाने ओळखले जाते. तर याच्या शेजारील लेणे हे तीन मजली असल्याने याला तीन ताल असे संबोधतात. येथे गर्भगृह आणि भिक्षूगृह, बुद्धप्रतिमायुक्त गर्भगृह यांमुळे हे एकाचवेळी मंदिर आणि विहार असे असावे.  या लेणीच्या पुढच्या भागात आठ खांब आहेत.त्यांच्या मागे अरूंद ओवरी आहे. येथील मागच्या भागात भव्य बुद्ध मूर्ती आहे. ही मूर्ती ध्यानासनात असून भूमीस्पर्शमुद्रेत आहे. मूर्तीचे आसन गण सावरून धरीत आहेत, जवळच बुद्धाला पायस देणाऱ्या सुजाताचे शिल्प आहे. बाजूला अवलोकितेश्वर आणि वज्रपाणी हे बोधीसत्व आहेत. बाजूच्या भिंतीत अनेक बोधीसत्त्वांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. येथील शिल्पांमध्ये मैत्रेय, स्थिरचक्र, मंजुश्री, ज्ञानकेतू या स्पष्टपणे दिसतात. ही बौद्धलेणी (Buddhist cave) असूनही या लेणीचे वैशिष्ट्य म्हणजे येथे हिंदू देवदेवतांच्या महिषासुरमर्दिनी, गणेश, काल-प्रतिमा कोरल्या आहेत.
  • क्रमांक १२ लेणी – दोन ताल लेण्याच्या शेजारचे हे तीन ताल नावाचे हे लेणे आहे. हे तीन मजली लेणे आहे. अनेक खांबांनी निर्माण करण्यात आलेले हे लेणे आहे. या लेण्याची भव्यता, ऐसपैसपणा डोळ्यात भरणारा आहे. महायान पंथाची ही शेवटची निर्मीती आहे. येथील सर्वच मूर्ती, शिल्पं फार सुंदर आहेत. बौद्ध लेण्यांची (Buddhist cave) वैशिष्ट्य म्हणजे मोठ मोठ्या खोल्या, प्रांगण, भव्य खांब, भव्य बुद्ध मूर्ती  हे आहे. येथे भर उन्हाळ्यातही वातावरण एकदम थंड असते. कदाचित येथे बुद्ध धर्माचा प्रसार करताना बैद्ध भिक्खू येथे मुक्काम करत असतील. त्यांना उन्हाळ्यात या दगडी लेण्यांमध्ये शांतपणे ध्यान करण्यासाठी या लेणी उत्तम ठिकाण आहेत. आपल्याला अनेक ठिकाणी लेण्यांच्या मार्गातून, दगडी कपारीतून फार सुंदर पाण्याचे झरे वाहताना दिसतात. आधीच थंड असणारे वातावरण या पाण्याने आणखी थंड भासते. बुद्धाच्या भव्य मूर्ती, ऐसपैस जागा यांमुळे येथे कमालीची शांतता जाणवते. काही काळासाठी का होईना आजच्या धकाधकीच्या वातावरणात आपण शांतता अनुभवतो.

वेरूळ येथील सगळ्याच लेण्या आपल्याला आत्मिक शांती प्रदान करतात. हे एक असे पर्यटन स्थळ आहे जिथे आपल्याला फिरण्याच्या आनंदासह अध्यात्माचीही अनुभूती होते. तुम्ही जगात कोठेही पर्यटन करा, पण भारताचा हा जागतिक वारसा एकदातरी प्रत्यक्ष पहावा असाच आहे. या लेण्या खोदल्या त्यावेळचा तंत्रज्ञानाचा असणारा अभाव, वाहतुकीची तुटपुंजी साधनं अशी प्रतिकूल परिस्थीती असतानाही इतकं अलौकिक अशा वास्तू कशा निर्माण करण्यात आल्या असतील याचा विचार आपण सतत करत रहातो. कला, अध्यात्म आणि धर्म यांची सांगड असणारे असे हे अलौकिक वेरूळ भारतासह संपूर्ण जगाचा वारसा आहे. तो आपण जपायला हवा.

येथे कसे पोहोचाल ?

Sponsored
Jyoti Bhalerao:

View Comments (2)

  • I spent over three hours reading the internet today, and I haven't come across any more compelling articles than yours. I think it's more than worth it. I believe that the internet would be much more helpful than it is now if all bloggers and website proprietors produced stuff as excellent as you did.

Sponsored

This website uses cookies.

Sponsored