बीड:2025-06-11
Beed Crime News : बीड जिल्ह्यात लग्नाळू मुलांना फसवणाऱ्या टोळीला( Marriage Cheating Gang ) पकडण्यात पोलीसांना यश आलं आहे. या टोळीने वडवणी तालुक्यात तसेच आष्टी तालुक्यातील 2 तरुणांना फसवल्याचे उघड झाले होते. त्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली होती. आधील मुलांच्या तुलनेत मुलींचे गुणोत्तर कमी असल्याने लग्नासाठी मुली मिळत नाही. त्यातून आता असे प्रकार होत असल्याचे दिसून येत आहे. अशा लग्नाळू मुलांना फसवणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्याने मुलांच्या कुटुंबियांमध्ये धास्तीचे वातावरण आहे.
पोलीसांनी सापळा रचून या टोळीला (Marriage Cheating Gang) जेरबंर करण्यात यश मिळवले आहे. याविषयीची माहिती बीड पोलीस अधिक्षक नवनीत कॉवत यांनी सांगितले आहे.
दरम्यान याबद्दल बोलताना कॉवत म्हणाले की, आम्हाला याबद्दल तक्रार मिळाल्यानंतर लगेच आम्ही सापळा लाऊन या टोळीला पकडलं आहे. मात्र अशा अजून काही टोळ्या आहेत. यामध्ये लग्न लावतात आणि दोन ते चार दिवसाच्या आत ते पळून जातात. या ठिकाणी मुलाच्या घरातील मौल्यवान वस्तू, दाग-दागिने घेऊन पळून जात असल्याचे उघडकीस आले आहे. बीड जिल्ह्यातील तरूणांनी अशा टोळ्यांपासून सावध रहाणे गरजेचे आहे, जेणेकरून तुमची आर्थिक, मानसिक आणि कौटुंबिक हानी होणार नाही असे आवाहन कॉवत यांनी केले आहे.