Scenic Baneshwar Shiva Temple, Nasrapur,Pune – (Established 1749)

निसर्गरम्य बनेश्वर शिव मंदिर , नसरापूर , पुणे – (स्थापना इ.स. १७४९)

आजकाल सुटीचा दिवस घरात बसून घालवण्यापेक्षा तो कुठेतरी निवांत ठिकाणी घालवण्याकडे शहरातील लोकांचा कल दिसतो. शहरापासून अगदी जवळ, आणि कमी खर्चिक असे ठिकाण जर तुम्ही शोधत असाल तर पुण्यापासून जवळच असणारे नसरापूर जवळील बनेश्वर महादेव मंदिर हा एक उत्तम पर्याय आहे. बन म्हणजे वन, जंगल अशा निसर्गगम्य जागेत वसलेला महादेव ईश्वर म्हणजे बनेश्वर (Baneshwar) होय.

बनेश्वर शिव मंदिराविषयी – About Baneshwar Shiva Temple

पुणे शहरापासून जवळच असणारे निसर्गरम्य स्थळ म्हणजे बनेश्वर शिव मंदिर (Baneshwar Shiva Temple) आणि संपूर्ण परिसर होय. बनेश्वर मंदिराची रचना मध्यकालीन वास्तुशिल्पाप्रमाणे असून, ह्या मंदिराची स्थापना थोरले बाजीराव पेशवे ह्यांचे पुत्र नानासाहेब पेशवे (Nana saheb peshave) यांनी केली होती. शिवगंगा नदिच्या तिरावर इसवीसन १७४९ मध्ये त्यांनी हे सुंदर कल्पक मंदिर बांधून घेतले. त्यासाठी पेशव्यांना त्यावेळी ११ हजार, ४२६ रूपये, ८ आणे आणि ६ पैसे इतका खर्च आल्याची नोंद आहे.

बनेश्वर शिव मंदिराचा (Baneshwar Shiva Temple) सोपा तीन खणांचा असून त्यावर चौकोनी शिखर बांधण्यात आलेले आहे. या सोप्यांच्या स्तंभांवर कमळांच्या आकाराचे कोरीवकाम करण्यात आलेले आहे. सोप्याच्या मधल्या खणात छतावर एक मोठ्या आकाराची घंटा लटकावलेली आहे. थोरले बाजीराव पेशवे यांचे भाऊ चिमाजी अप्पा ह्यांनी इसवीसन १७३७ ते १७३९ या कालावधीत उत्तर कोकणातल्या वसई येथील एका युद्धात पोर्तुगीज सैन्यास पराभूत केले होते.त्या लढाईचेच विजयचिन्ह म्हणून ही घंटा ओळखली जाते. ह्या घंटेवर १६८३ हे साल कोरले असून, एक क्रॉस आहे. त्याआधी ही घंटा एका चर्चमधील असावी असे कळून येते. आपल्या विजयाचे प्रतिक म्हणून अशा घंटा आणल्या जात. पुढे हि भव्य घंटा येथे विराजमान झाल्याचे दिसते. 

baneshwar

भौगोलिक स्थान –

पुण्याच्या दक्षिणेस सुमारे ३५ किमी अंतरावर शिवगंगेच्या काठावर, गर्द झाडीत निसर्गरम्य वातावरणात हे सुंदर, प्रशस्त मंदिर (Baneshwar Shiva Temple) आहे. मंदिराच्या भोवतीचे वन संरक्षित आहे. या वनात अनेक फुलझाडे असून, ते विविध प्राणी, पक्षी यांचे आश्रयस्थान आहे. निसर्गप्रेमी आणि यात्रेकरूंसाठी हे एक आवडीचे स्थान आहे. 

बनेश्वर शिव मंदिराचा (Baneshwar Shiva Temple) मुख्य भाग हा एखाद्या वाड्याप्रमाणे बंदिस्त आहे. याच्या अग्नेय बाजूला एक दरवाजा आहे.  दरवाजातून पायऱ्या उतरून खाली जावे लागते. आत आल्यावर उजव्या बाजूला पाण्याची दोन दगडी कुंडे आपल्या नजरेस पडतात आणि मंदीराचे वेगळेपण आपल्याला जाणवते. उत्तरेकडील कुंडाच्या पश्चिमेला नंदी मंडपात भव्य नंदी पाहण्यास मिळतो. आणि अगदी त्याच्यासमोरच बनेश्वर शिवशंभोचे आपल्याला दर्शन होते. सोपा, सभामंडप, गर्भगृह असे या मंदीराचे तीन भाग पडतात. मंदिराचा सोपा ओलांडून पुढे आल्यावर सभामंडप लागतो. या सभामंडपाला एकही खांब नाही हे याचे वैशिष्ट्य. सभामंडप चार बाजूंच्या चार भींतीवर आधारलेला असून घुमटाने आच्छादलेला आहे. 

मंदिराच्या समोरील भागात दोन बाजूला दोन मोठे दगडी हौद बांधण्यात आलेले आहेत. दोन्ही हौदांमध्ये कासव आणि मासे मुबलक प्रमाणात आहेत. दोन्ही हौदांच्यामध्ये एक दगडी बांध असून, त्यामधील गोल मोठ्या छिद्रांमधून हे मासे व कासव ये जा करत असतात. त्यांची ही क्रीडा पाहणेही पर्यटकांसाठी मोठा विरंगुळा ठरतो.

गर्भगृह –

सभामंडपातून गर्भगृहाच्या पायऱ्या उतरून खाली आल्यावर आपल्याला प्रथम श्री विष्णू व श्री लक्ष्मी यांच्या मूर्ती दिसतात. या मूर्तीच्या समोरच उत्तराभिमूख शिवलिंग आहे. खरे तर या शिवलिंगाचे स्वरूप अगदी वेगळे आहे. दिसणारे शिवलिंग प्रतिकात्मक असून खरं तर ते एक प्रकारचे अच्छादन आहे. त्याच्या खाली एक पोकळीसमान जागा करून त्यात एक गोलाकार शिळेवर पाच शिवलिंगे कोरलेली आहे. या गोलाकार शिवलिंगाचा व्यास सहा इंच असल्याचे सांगण्यात येते. हे येथील खरे शिवलिंग आहे. त्याच्यावर पाण्याची संततधार सुरू असते. अंधाऱ्या  गर्भगृहामुळे ते सुरूवातीला नीटसे दिसत नाही. आधी तुम्ही कधी येथे भेट दिली असेल पण तेव्हा हे पाहिले नसेल तर पुढच्यावेळी त्याचे दर्शन नक्की घ्या. 

अद्धभूत पाणी वाहून नेण्याची रचना –

या मंदिरातील पाणी वाहून जाण्यासाठीची दगडी रचना पर्यटकांसह अभ्यासकांसाठीही आकर्षणाचा विषय आहे. पाण्याची येथील रचना खरोखर अद्भूत म्हणता येईल. या भागात असणाऱ्या झऱ्यांच पाणी प्रथम एकत्र करून ते एका दगडी कोनाड्यातून एका हौदात सोडण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्याच्या बाजूला १५ फूट चौरस आकाराचे कुंड आहे. हा लहान हौद भरला की त्यातील पाणी दगडी गोमुखावाटे एका चौरसाकृती कुंडात पडते. त्याच्या शेजारी आणखी एक मोठ्या आकाराचे कुंड आहे. लहान कुंडातील पाणी धार्मिक कार्यांसाठी आणि पिण्यासाठी वापरतात तर मोठ्या कुंडातील पाणी स्नान आदि कामांसाठी वापरले जाते. ही दोन्ही कुंडे सुमारे १२ ते १५ फुट खोल आहेत. या कुंडातील पाणी स्वच्छ ठेवण्यासाठी त्यात भरपूर मासे सोडण्यात आलेले आहेत. मंदीराच्या बाहेर प्रवेशद्वाराजवळच एक भव्य त्रिशुळ उभारलेला आहे, तो सर्वांचे लक्ष वेधून घेतो.

मंदिराच्या मागील बाजूस धबधबा असून, हे तेथिल एक प्रमुख आकर्षण आहे. पुणे शहरापासून ३६ किलोमीटर अंतरावर असलेल्या बनेश्वराला येण्यासाठी राज्य परिवहन गाड्यांच्या मदतीने नसरापूर येथून पुढे बनेश्वरसाठी (Baneshwar) स्थानिक वाहतुकीच्या साह्याने पोहोचता येते. सध्या याठिकाणी मंदिराच्या मागच्या बाजूला लहान मुलांसाठी अनेक साहसी खेळांसाठी खेळण्या, साहित्य उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. याशिवाय जसजसे आपण तयार करण्यात आलेल्या दगडी पायवाटेने पुढे जातो तसतसे आपल्याला निसर्गाचे रम्य रुप बघायला मिळते.

याठिकाणी अनेक लहान मोठे दगडी पार बसण्यासाठी बांधण्यात आलेले आहे. पर्यटक याठिकाणी जेवणाचे डबे घेऊन येतात आणि वनभोजनाचा आनंद घेतात. याशिवाय येथे खाण्यासाठी अनेक लहान मोठे हॉटेल्स आहेत. येथेच रहाण्याची सोय सुद्धा आहे. त्याच्या बाजूलाच रोपवाटिका आहे. तेथून अनेक प्रकारचे रोपं विकत घेता येतात. पुण्यापासून साधारण दोन तासाच्या अंतरावर असणारे हे ठिकाण एकादाच नाही तर अनेकवेळा जाण्यासारखे आहे. कौटुंबिक सहली, गेटटुगेदर साठी हा चांगला पर्याय आहे. 

एकूणच याठिकाणाची शांतता आणि निसर्ग दोन्ही आत्मिक शांती देणारे आहे. एक दिवसाची निसर्गरम्य सहल शांतता आणि निसर्घाचा सहवास दोन्ही मिळवून देणारे आहे. एक दिवसाची निसर्गरम्य सहल आणि देवदर्शन दोन्हीही साध्य होणारे, असे हे पेशवेकालीन वारसास्थळ आहे.

याठिकाणाला भेट द्यायला कसे जाल ?

Author
ज्योती भालेराव

Leave a Reply