Astronout Shubhanshu Shukla : भारतीयांसाठी आजचा दिवस एकदम खास आहे. नासासह अंतराळ मोहीमेवर गेलेले अंतराळवीर शुभांशू शुक्ला आज परत सुखरूप पृथ्वीवर परत आले आहेत.
कॅलिफोर्निया : 15/07/2025
भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांच्यासह चार अंतराळवीरांचे ड्रॅगन अंतराळयान कॅलफोर्नियाच्या किनार्यावर आज, 15 जुलै रोजी सुखरूप उतरले आहे. शुभांशू शुक्ला यांनी सुमारे 18 दिवस अंतराळात घालवले, ज्या काळात त्यांनी विविध वैज्ञानिक प्रयोग यशस्वीपणे पूर्ण केले आहेत. 25 जून 2025 रोजी ते फ्लोरिडाच्या केनेडी स्पेस सेंटर येथून फाल्कन 9 रॅकेटद्वारे अंतराळात रवाना झाले होते.
शुभांशू आणि त्यांचे अमेरिका, पोलंड आणि हंगेरीतील तीन सहकारी अंतराळवीर 14 जुलै 2025 रोजी दुपारी 4:45 वाजता आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरून पृथ्वीकडे परतण्यास निघाले. आता सर्व अंतराळवीर पृथ्वीवर परतले असून, त्यांना समुद्रातून सुरक्षितपणे बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, शुभांशू आणि त्यांच्या सहकाऱ्यांना बाहेर काढल्यानंतर त्यांच्या आरोग्याची तपासणी करण्यासाठी आणि अंतराळातील त्यांच्या शरीरावर झालेल्या परिणामांतून बरे होण्यासाठी 10 दिवस देखरेखीखाली ठेवले जाणार आहेत. त्यानंतर ते भारतात परतण्याची शक्यता आहे.
शुभांशु शुक्ला यांच्या अंतराळ मोहीमेविषयी (Astronout Shubhanshu Shukla )
अमेरिकन अंतराळ संस्था नासा आणि भारतीय संस्था इस्रो यांच्यातील करारानुसार, भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांची या मोहिमेसाठी निवड करण्यात आली होती. शुभांशू हे आंतरराष्ट्रीय अंतऱाळ स्थानकाला भेट देणारे पहिले भारतीय आणि अंतराळात जाणारे दुसरे भारतीय आहेत. 41 वर्षांपूर्वी राकेश शर्मा यांनी 1984 मध्ये सोव्हिएत युनियनच्या अंतराळयानातून अंतराळ प्रवास केला होता.
मोहिमेचे उद्दिष्ट (Astronout Shubhanshu Shukla )
ॲक्स -4 मोहिमेचा मुख्य उद्देश अवकाशात संशोधन करणे आणि नवीन तंत्रज्ञानाची चाचणी करणे ही होती. ही मोहिम खाजगी अंतराळ प्रवासाला प्रोत्साहन देण्यासाठी आखली होती. ॲक्सियम स्पेस नियोजनाचा एक भाग म्हणूनही याच्याकडे पाहिले जात आहे. जे भविष्यात एक व्यावसायिक अंतराळ स्थानक (ॲक्सियन स्टेशन ) बांधण्याची योजना आखत आहे.
ॲक्सियम -4 ही मोहीम या आधी 6 वेळा पुढे ढकलण्यात आली
1 29 मे ला , ड्रॅगन अंतराळयानाची तयारी नसल्याने प्रक्षेपण पुढे ढकलण्यात आले.
2 8 जून ला ते होणार होते. फाल्कन-9 रॉकेट प्रक्षेपणासाठी तयार नव्हते.
3 नवीन तारीख 10 जून देण्यात आली. पुन्हा एकदा खराब हवामानमुळे ते पुढे ढकलले.
4 11 जून रोजी चौथ्यांदा मोहिम आखली, यावेळी ऑक्सिजन गळती झाली.
5 नवीन तारीख 19 जून देण्यात आली. हवामानाची अनिश्चितता आणि क्रु मेंबर्सच्या आरोग्याच्या कारणास्तव ती पुढे ढकलण्यात आली.
6 सहावी मोहिम 22 जूनला होणार होती, आयएसएसच्या झ्वेझदा सर्व्हिस मॉड्युलचे मुल्यांकन करण्यासाठी अतिरिक्त वेळ आवश्यक होता. त्यामुळे मोहिम पुढे ढकलण्यात आली.
आता मात्र सर्व अंतराळवीर ही मोहीम फत्ते करून सुखरूप परत आले आहेत. आज 15 जुलै 2025 ला शुभांशू शुक्ला परत अंतराळातून पृथ्वीवर परतले आहेत.