Pune Crime News : पुण्यातील वाघोली पोलीस ठाण्यातील पोलिस हवालदार मंगळवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला आहे. काय आहे प्रकरण जाणून घ्या.
पुणे : 11/25/2025
पुण्यातील वाघोली परिसरातील पोलीस स्टेशनमधून एक लाच प्रकरण समोर आले आहे. विशेष म्हणजे एक पोलीस हवालदार ही लाच घेताना पकडला गेला आहे. एका महिलेने केलेल्या तक्रारीमुळे हा हवालदार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला. मालमत्ता जप्तीचे वॉरंट बजावण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच हा हवालदार घेत होता. मंगळवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) जाळ्यात तो अडकला.
काय आहे हे लाच प्रकरण (Anti Corruption Bureau Pune)
परमेश्वर माणिक पाखरे (३७) असे लाच स्विकारताना रंगेहाथ पकडलेल्या पोलिस हवालदाराचे नाव आहे. याबाबत एका महिलेने लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिली होती. कौटुंबिक वादातून तक्रारदार महिला पतीपासून विभक्त झाली आहे. तक्रारदार महिला मूळची सांगली जिल्ह्यातील आहे. तिचा पती वाघोली भागात राहतो. महिलेने पोटगीसाठी न्यायालयात दावा दाखल केला होता. तो मान्य करून न्यायालयाने तिला दरमहा पाच हजार रुपये पोटगी मंजूर केली. मात्र, पतीने पोटगीची रक्कम देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे तिने सहा लाख ६५ हजारांची थकीत पोटगी मिळण्यासाठी विटा न्यायालयात मालमत्ता जप्तीचे वॉरंट बजावण्यासाठी अर्ज केला. न्यायालायने संबंधित अर्ज मंजूर केला.
महिलेनी केली तक्रार (Anti Corruption Bureau Pune)
हे वॉरंट बजावण्यासाठी वाघोली पोलिस ठाण्यात पाठवण्यात आले. या कामाची जबाबदारी पोलिस हवालदार पाखरे याच्याकडे होती. मात्र पाखरे हे वॉरंट बजावत नसल्याने महिलेने पाखरेची भेट घेतली. त्या वेळी त्याने वॉरंट बजावण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारदार महिलेने याबाबत लाचलुचपतकडे तक्रार केली होती. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर पथकाने वाघोली पोलिस ठाण्याच्या समोरील चहाच्या टपरीच्या परिसरात सापळा लावून पाखरे याला तक्रारदार महिलेकडून पैसे घेताना पकडले. पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अतिरिक्त अधीक्षक अजित पाटील, अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई केली.