X

Translate :

Sponsored

World Heritage Site of Amer Fort in Jaipur (Built by King Mansingh in 16th Century)

जागतिक वारसा असलेला जयपुरचा आमेर किल्ला ( (बांधकाम – राजा मानसिंहद्वारा इ.स.१६ व्या शतकात)

राजस्थान मधील एक महत्त्वाचे पर्यटन स्थळ म्हणजेच जयपुरचा आमेर किल्ला (Amer Fort). आमेर हे खरे पाहता एक शहर आहे जे राजधानी जयपुर पासुन 11 किमी अंतरावर आहे, येथील किल्ला म्हणजेच आमेर किल्ला. पर्यटक आमेर किल्ल्यास  विविध नावांनी ‌ओळखतात जसे ‘अंबर पॅलेस, आमेरचा किल्ला, आमेर का किला’ इत्यादी. हा किल्ला १६ व्या शतक़ात राजा मानसिंह यांच्याद्वारे बांधला गेला. या किल्ल्याचे नाव अंबा माता या नावावरून ठेवण्यात आले आहे. कारण याला अंबर किल्ला म्हणूनही ओळखले जाते. युनेस्कोने या किल्ल्यास जागतीक वारसा म्हणुन घोषीत केले आहे. या जागेस किल्ला असे जरी संबोधले जात असले तरीही हा एक राजवाडा आहे, कारण या ठिकाणी राजघराण्यातील राजपरीवार राहत असे. जर आपल्याला त्याकाळचे राजघराण्यातील लोक कसे रहात असतील, त्यांचे वास्तव्याची ठिकाणं कशी होती हे जर आपल्याला अनुभवयाचे असेल तर त्यासाठी हा किल्ला आणि त्याचे आजचे स्वरूप आपल्याला खूप उपयोगी पडते.

अमेर किल्ल्याचा इतिहास (History of Amer Fort)

अमेर शहरावर सुरुवातीला मिना जमातींचे राज्य होते. त्यानंतर कछवाहा राजपुतांनी या शहराचा ताबा घेतला. असे मानले जाते कि कछवाहा राजपुतांनी सुरुवातीस मिना जमातींसोबत मित्र संबंध ठेवले, त्यानंतर त्यांनी मिना जमातीवर हल्ला करुन अमेर शहराचा ताबा घेतला. त्याकाळी राजस्थान मधील धुंदर प्रदेशावर कछवाहा राजपुत राज्य करत होते. अमेर शहर ही या राज्याची राजधानी, येथील अमेर किल्ला (Amer Fort) हा राजा मानसिंग (पहिले ) यांनी 16 व्या शतकात बांधला. अमेर किल्ला हा मुघलांनी देखील काबीज केला होता, नंतर महाराजा सवाई जयसिंग (दुसरा ) यांनी  तो परत मिळवला.  हा किल्ला अगदी रसिकतेने, निवांत वेळ घेऊन बघायचा असेल तर तुम्हाला तीन तासाच्या वर वेळ लागू शकतो. आणि खरं तर येथील प्रत्येक कोपरा न कोपरा सौंदर्याने भरलेला आहे. त्यामुळे हे पाहू कि ते असे आपल्याला होऊन जाते.

अमेर किल्ल्यामध्ये (Amer Fort) काय काय पहाल ?

येथे 11 महत्वाची ठिकाणे आहेत जी तुम्ही पाहु शकता. मुळात अमेर किल्ला (Amer Fort) हा अत्यंत सुंदर आहे. आजही तो अत्यंत चांगल्या अवस्थेत आहे. येथे पाहण्यासाठी खुप काही आहे. या किल्ल्यात काही ठिकाणं अशी देखील आहेत  जी अद्याप पर्यटकांसाठी बंद आहेत. अनेक हिंदी चित्रपटांचे चित्रीकरण देखील या किल्ल्यात झाले, जसे कि ‘ बाजीराव मस्तानी, मनिकर्नीका इत्यादी’. आमेर क़िल्ल्याच्या (Amer Fort) पायथ्यापासुनच आपल्याला या क़िल्ल्याविषयीची उत्सुकता वाटायला लागते. हा किल्ला उंच टेकडीवर वसवल्याप्रमाणे आहे. खालून वर जाण्यासाठी दोन नागमोडी मार्ग आहेत. एक मार्ग मोठा मोठ्या पायऱ्यांचा आहे. ज्यावरून हत्तींना येजा करता येते, तर दुसर्या मार्गावरून गाड्या वरपर्यंत जाऊ शकतात. पर्यटक हत्ती, गाडी अथवा चालत जाण्याचा पर्याय निवडतात. हत्तीवरून जाण्यासाठी आणि जीप गाडयांनी जाण्यासाठीचे वेगवेगळे दर आहेत. अंतर जास्त वाटत असले तरी चालत जाण्याचीही एक मजा आहे. मार्गात राजस्थाचे विविध पदार्थ, वस्तू विक्रीसाठी विक्रेते घेऊन फिरत असतात. हे सगळ बघत, विविध पदार्थ खात हे मार्ग मजेत संपतो. मार्ग संपून आपण या राजमहालाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर जाऊन पोहोचतो, आणि मग सुरु होते आपली एक सुंदर महालाची सफर. अगदी सुरुवातीपासूनच हा किल्लावजा राजमहाल आपला ताबा घेतो.

गणेश पोल –

राजवाड्यात प्रवेश करण्यासाठीचे मुख्य प्रवेशद्वार म्हणजेच गणेश पोल. हे प्रवेशद्वार अत्यंत सुंदर आहे, पर्यटक येथे सेल्फी काढण्यासाठी, फोटोग्राफीसाठी गर्दी करतात. हे प्रवेशद्वार म्हणजेच मुघल आणि राजपुत कलाकुसरीचे एक उत्तम उदाहरण आहे.  लोकांच्या मनातील भगवान गणेशाचे महत्व हे या प्रवेशद्वाराच्या नावातुन आपणास पाहण्यास मिळते. हिंदु धर्माप्रमाणे गणपती बाप्पाची पुजा प्रत्येक कार्याच्या सुरुवातीस केली जाते, कारण यामुळे कामातील अडचणी दूर होतात. यामुळे भारतातील अनेक लोकप्रिय स्थळांच्या प्रवेशद्वाराजवळ आपल्याला गणेश प्रतीमा पाहण्यास मिळते. गणेश पोल देखील याचेच उदाहरण आहे. तुम्ही गणेश पोल पाहण्या आधी ‘सुहाग मंदिर’ पाहु शकता. राजघराण्यातील स्त्रिया याचा वापर महालातून बाहेर देखरेख करण्यासाठी करत असत. त्यावेळेस राजवाड्यातील स्त्रियांना राजवाड्याबाहेर मोकळेपणाने फिरण्याची अनुमती नव्हती, यामुळे त्या सुहाग मंदीरातुन राजवाड्याबाहेर देखरेख करत असत.

दिवाने आम –


दिवाने आम म्हणजेच त्याकाळचे कोर्ट. राजा येथे आपल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना भेटायचा. विशेष प्रसंगी (जसे कि युद्ध किंवा अन्य आपत्तीत) येथे राजा आणि इतर महत्वाचे लोक भेटत असत.‌ 16 व्या शतकात उभारण्यात आलेल्या या कोर्टाच्या भिंतींवर मुघल आणि राजपुत संस्कृतींची छाप पाहण्यास मिळते. येथील खांब हे लाल वाळुच्या खडकांपासुन बनवण्यात आले असुन त्यावर पांढरा संगमरवर पाहण्यास मिळतो. येथील कलाकुसरीमधे हंती आणि फुलांचे नक्षीदार काम पाहण्यास मिळते. दिवाने आम येथुन माओता तलाव, दिलराम गार्डन तसेच जलेब चौक या ठिकाणांचे विहंगम दृश्य दिसते.

शेष महाल किंवा दिवाने खास –

दिवाने खास म्हणजेच अशि जागा जिथे राजा फक्त आपल्या अत्यंत जवळील व्यक्तींशी किंवा अत्यंत महत्त्वाच्या व्यक्तींशी भेटतो. यामुळे या जागेस त्यावेळी विशेष महत्त्व होते. या ठिकाणची सजावटही आकर्षक आहे. दिवाने खासच्या आतील बाजुस लहान लहान आरशांद्वारे केलेली सजावट पाहण्यास मिळते. शेष या शब्दाचाच अर्थ आरसा, यामुळे या जागेस शेष महाल देखील म्हणतात. रात्रीच्या वेळेस भिंतींवरील आणि छतावरील लहान आरशांद्वारे प्रकाश परावर्तीत होतो व आकाशात चांदने असल्याप्रमाणे देखावा निर्माण होतो. आरशांचा कलाकुसरीसाठी वापर हा पहील्यांदा मुघल साम्राज्याचा सम्राट शाह जहान याने केला होता. शेष महाल मधील आरशांच्या कलाकुसरी सोबतच येथे ‘जादुचे फुल’ ही संगमरवरावर केलेली कलाकुसरही पाहण्यास मिळते. यामधे फुल आणि त्यावर उडणारी फुलपाखरे यांचे कोरीवकाम आहे.

सुख महाल किंवा सुख मंदीर –

सुख महाल म्हणजेच राजाच्या वास्तव्याची जागा. सुख महाल हे शेष महाल पासुन जवळच आहे. येथील वातावरण थंड ठेवण्यासाठी विशेष व्यवस्था केलेली आपल्याला पाहण्यास मिळते, ज्यामुळे तिव्र उन्हाळ्यात देखील येथील वातावरण थंड राहते. सुख महालच्या भिंतींवर आपल्याला मुघल कलाकुसरीची छाप दिसते.

जनेना देऊरी –

जनेना देऊरी म्हणजेच राजवाड्यातील तो भाग जेथे राण्या आणि राजघराण्यातील इतर स्त्रिया राहत असे. जनेना या शब्दाचाच अर्थ स्त्रि असा होतो. या ठिकाणी राण्यांचे कक्ष आहेत, राण्यांच्या वैयक्तिक सहाय्यक स्त्रिया देखील येथे राहात होत्या.  या ठिकाणी मानसिंग महाल देखील आहे. मुघल साम्राज्याचा शासक अकबर जेव्हा अमेर शहरात आला त्यावेळी हा महाल बांधण्यात आला. येथील भिंतींवर एक दगड आहे, या दगडावर अकबराने दिलेला संदेश पारसी भाषेत कोरलेला आहे.

अमेर किल्ल्यापासून (Amer Fort) जयगढ किल्यापर्यंतचा भुयारी मार्ग –

अमेर किल्ल्यापासून (Amer Fort) जयगढ किल्ल्यापर्यंत जाण्यासाठी एक भुयारी मार्ग अमेर किल्ल्यामध्ये आहे. या भुयारी मार्गाचा शोध अलीकडेच लागला. या मार्गाबाबत अनेक वर्ष कोणालाच महिती नव्हती. संकटकालीन परीस्थितीमधे सुरक्षेसाठी या भुयारी मार्गाचा वापर केला जात असे. हा भुयारी मार्ग दिवाने आम, मानसिंग महाल तसेच जनेना देऊरी या ठिकाणांना जोडतो. भुयारी मार्ग पर्यटकांसाठी खुला आहे. तुम्ही या मार्गाद्वारे जयगढ किल्ल्यापर्यंत जाउ शकता.

शिला माता मंदिर –

अमेर किल्ल्यामध्ये (Amer Fort) शिलादेवीचे मंदीर आहे. या मंदिरामागील इतिहास फ़ार रोचक आहे. महाराजा मानसिंगाचे राजा केदार सोबत युद्ध झाले, या युद्धामधे महाराजा मानसिंगचा पराभव झाला. आपला पराभव झाला म्हणुन महाराजा मानसिंग बेचैन झाले आणि ते  काली देवीची पुजा करायला लागले. त्यानंतर एके दिवशी काली देवी महाराजा मानसिंगाच्या स्वप्नात आली. काली देवीने महाराजा मानसिंगास अमेर किल्ल्यात एक मंदीर बांधण्यास सांगितले, तसेच आपली हरवलेली मुर्ती जेस्सोर (बांगलादेशातील एक शहर) येथील समुद्रकिनाऱ्यावरुन आणन्यास सांगितली. आणि महाराजा मानसिंगास युद्धामधे विजय मिळेल असा आशिर्वाद दिला. महाराजा मानसिंग काली देवीची प्रतीमा शोधण्यासाठी जेस्सोरला गेले, जेथे त्याला एक शिला मिळाली. मानसिंगाने ही शिला आपल्या राजवाड्यात आणली. जेव्हा मानसिंगाने हि शिला व्यवस्थीतपने धुतली तेव्हा या शिलेवर मानसिंगास काली देवीची प्रतीमा दिसली. यामुळे या देवीचे नाव शिलादेवी असे पडले. त्यानंतर महाराजा मानसिंगाने अमेर किल्यामधे शिलादेवीचे मंदीर बनवले. शिलादेवी मंदीर हे मक्राना संगमरवरापासुन बनवले गेले आहे. मक्राना संगमरवर हा जगातील सर्वात उच्चप्रतीच्या संगमरवरापैकी एक मानला जतो. या मंदीरात चांबड्यापासुन बनविलेल्या वस्तु, मोबाईल फोन, कॅमेरा, पाकीट तसेच चपला घेऊन जान्यास परवानगी नाही.

नक्कार खाना –

नक्कार म्हणजेच नगाडा. नगाडा हा शब्द ऐकल्यावर आपल्याला लगेचच संगीताची आठवन होते, यावरुनच याजागेच्या वापराचा अंदाज़ येतो.  नक्कार खाना या ठिकाणी त्याकाळी राजदरबारातील लोक संगीताचा आनंद घेत. संगीतकार या ठिकाणी विविध वाद्यांचा वापर करुन मनमोहक संगीत वाजवत असत.

हमाम –

हमाम हे ते ठिकाण आहे जेथे राजघराण्यातील लोक स्नान करण्यासाठी येत. त्याकाळी तंत्रज्ञान एवढे आधुनिक नव्हते तरीही, स्नानासाठी थंड पाणी आणि गरम पाणी असा पर्याय येथे उपलब्ध असायचा. येथील न्हानीघर हे मक्राना संगमरवरापासुन बनवलेले आहे.

दिलराम बाग –

हा बगिचा अमेर किल्ल्याच्या (Amer Fort) खालील बाजूस आहे. अमेर किल्ल्यात प्रवेश घेण्यासाठी आपल्याला या बागिचातुनच जावे लागते. दिलराम बाग म्हणजेच ‘चार बाग’ या मुघल कलेचे उदाहरण. डाव्या बाजूला लाल वाळुच्या खडकांद्वारे बनविलेली सुंदर इमारत तुम्हाला दिसेल

जलेब चौक –

जलेब चौक हा तो परीसर आहे जिथे सैनिक व सेनानायक महत्त्वाच्या प्रसंगी एकत्र येत. जलेब हा मध्य पुर्वेकडील शब्द आहे याचा अर्थ ती जागा जेथे सैन्य एकत्र येते. या परीसरात येण्यासाठी फक्त दोन मार्ग आहेत, सुरजपोल दरवाजा आणि चांदपोल दरवाजा.

1 / 22

अमेर किल्ल्याची वेळ (Amer Fort Timings) –

अमेर किल्ला(Amer Fort) दिवसा सकाळी 8:00 वाजल्यापासून ते संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत खुला असतो. अमेर किल्ल्यास रात्रीच्या वेळीही भेट देता येते. अमेर किल्ला रात्री 6:30 पासुन ते रात्री 9:30 पर्यंत उघडा असतो.

आमेर किल्ल्यामधील प्रवेश फी (Amer Fort Entry Fee) –

आमेर किल्ल्यातील (Amer Fort) प्रवेश फी ही भारतीय पर्यटकांसाठी १०० रुपये तर विदेशी पर्यटकांसाठी ५०० रुपये आहे. विद्यार्थ्यांना प्रवेश फी मधे सूट मिळते, परंतु त्यासाठी ओळखपत्र आवश्यक आहे. भारतीय विद्यार्थ्यांसाठी प्रवेश फी १० रुपये तर विदेशी विद्यार्थ्यांसाठी १०० रुपये इतका दर आकाराला जातो.

जयपुर पासुन अमेर किल्ल्यापर्यंत कसे जाल (How to reach Amer Fort)-

अमेर किल्ला (Amer Fort) जयपुर पासुन 11 किमी अंतरावर आहे. स्वतःच्या वाहनाने अमेर किल्ल्यापर्यंत पोहोचण्यास 20 मिनीटे लागतात. तुम्ही जयपुर पासुन ते अमेर किल्ल्यापर्यंत बसद्वारेही जाऊ शकता, यासाठी तुम्हाला जयपुर मधील बडी चौपर येथे बस मिळेल.  अमेर किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी ऑटोरिक्षा तसेच टॅक्सी सुद्धा उपलब्ध आहे. तुम्ही उबेर किंवा ओला द्वारे देखील अमेर किल्ल्यापर्यंत पोहोचु शकता.

ज्योती भालेराव.

This post was last modified on March 15, 2021 6:45 pm

Sponsored
Jyoti Bhalerao:
Sponsored

This website uses cookies.

Sponsored