Translate :

Sponsored

राज्याच्या क्रिडा विभागाकडून खेलो इंडिया (Khelo Inida)अंतर्गत प्रशिक्षण केंद्राची मागणी केंद्र सरकारची प्रक्रिया सुरू

पुणे :2025-04-21

राज्यात आणि जिल्ह्यात दर्जेदार खेळाडू तयार व्हावेत यासाठी युवा व क्रीडा आणि युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा संकुल समिती आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने खेलो इंडिया अंतर्गत प्रत्येक जिल्ह्याला एक प्रशिक्षण केंद्र देण्यात आले आहे. या केंद्रामध्ये अजून एका खेळाची भर सध्या एका वर्षासाठी प्रतिक्षेत आहे. केंद्र पातळीवर त्याबाबतचे धोरण ठरविले जात आहे.

राज्यातील क्रीडा संस्कृती वाढविण्याच्या द़ृष्टीने केंद्र सरकारच्या सहकार्याने खेलो इंडिया या उपक्रमांतर्गत प्रत्येक खेळाला एक प्रशिक्षण केंद्र देण्यात आले आहे. प्रत्येक जिल्ह्यात एका खेळाला एक प्रशिक्षण केंद्र सध्याच्या परिस्थितीत सुरु असून त्यामध्ये वाढ करण्याची मागणी राज्याच्या क्रीडा विभागाकडून करण्यात आली होती. या मागणीला केंद्रीय क्रीडा राज्यमंत्र्यांनी हिरवा कंदील दाखविला. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्याप्रमाणे खेळाची यादी आणि प्रस्ताव केंद्र सरकारला पाठविण्यात आला आहे. मात्र नवीन केंद्र देण्याबाबत केंद्र पातळीवर नव्याने धोरण तयार केले जात असून त्याचा फायदा सर्वच राज्यातील खेळाडूंना होणार आहे.

खेलो इंडिया अंतर्गत येणारे 36 जिल्हे व खेळ…
अहमदनगर (आर्चरी), अकोले (बॉक्सिंग), अमरावती (आर्चरी), छत्रपती संभाजीनगर (शुटिंग), बीड (कबड्डी), भंडारा (तलवारबाजी), चंद्रपुर (अ‍ॅथलेटिक्स), धुळे (फुटबॉल), गडचिरोली (आर्चरी), गोंदिया (अ‍ॅथलेटिक्स), हिंगोली (कुस्ती), जळगाव (बॉक्सिंग), जालना (खो-खो), कोल्हापुर (कुस्ती), लातुर (कुस्ती), मुंबई (कबड्डी), नागपुर (बॅडमिंटन), नांदेड (टेबल टेनिस), नंदुरबार (अ‍ॅथलेटिक्स), नाशिक (अ‍ॅथलेटिक्स), उस्मानाबाद (खो-खो), पालघर (बॉक्सिंग), परभणी (टेबल टेनिस), पुणे (व्हॉलीबॉल), रायगड (व्हॉलीबॉल), रत्नागिरी (बॅडमिंटन), सांगली (अ‍ॅथलेटिक्स), सातारा (अ‍ॅथलेक्टिस), सिंधुदुर्ग (कबड्डी), सोलापुर (बॅडमिंटन), ठाणे (बॅडमिंटन), वर्धा (बॉक्सिंग), वाशिम (कबड्डी), यवतमाळ (हॉकी), बुलडाणा (फेन्सिंग), मुंबई शहर (बॉक्सिंग)

केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून खेलो इंडिया अंतर्गत आणखीन एक खेळाचे प्रशिक्षण केंद्र राज्याला मिळणार असेल तर आनंदाची बाब आहे. परंतु अशा केंद्रांमध्ये तळागाळातील, ज्याला गरज असे खेळाडू प्राधान्याने असावेत.  त्यामुळे प्रत्येक गावातील खेळाडू प्रशिक्षणाच्या माध्यमातून पुढे येईल. तळागाळातील खेळाडूपर्यंत या सुविधा लवकरात लवकर पोहोचणे आवश्यक आहे.

– लतेंद्र भिंगारे (अध्यक्ष, क्रीडा समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य)

केंद्र शासनाच्या वतीने सर्वच राज्याच्या क्रीडा अधिकाऱ्यांची बैठक दिल्ली येथे बोलाविण्यात आली होती. या बैठकीमध्ये खेलो इंडिया प्रशिक्षण केंद्रांतर्गत एकाच खेळाचा समावेश झालेला आहे. त्यामुळे त्यामध्ये आणखीन खेळांचा समावेश करावा, अशी मागणी राज्याच्या क्रीडा विभागाकडून आम्ही केली होती. त्यानुसार केंद्र पातळीवर खेलो इंडियाबाबत नवीन धोरण ठरविण्याची प्रक्रिया सुरू असून त्यासाठीच्या निधीचीही तरतूद केली जाणार आहे. हे धोरण अंतिम झाल्यानंतर राज्याला आणखीन एका खेळाचे प्रशिक्षण केंद्र प्राधान्याने देण्याचे केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री यांनी मान्य केले आहे. पुढील आर्थिक वर्षात हे केंद्र मिळेल.

 – सुधीर मोरे (सहसंचालक, क्रीडा व युवक सेवा संचालनालय)

 

Sponsored
Jyoti Bhalerao:
Sponsored

This website uses cookies.

Sponsored