X

Translate :

Sponsored

मराठीचे आद्यपत्रकार बाळशास्री जांभेकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ साजरा होणारा पत्रकार दिन– ( दर्पण वृत्तपत्राची सुरूवात -६ जानेवारी १८३२ )

स्वातंत्र्यपूर्व काळात, ब्रिटीशांविरुद्ध लढण्यासाठी, जनमानसात देशस्वातंत्र्याविषयी, समाजातील अंधश्रद्धांविषयी जनजागृती करण्यात त्याकाळच्या वृत्तपत्रांचा मोठा वाटा होता. महाराष्ट्रात त्यावेळी पहिले मराठी वृत्तपत्र सुरू केले ते बाळशास्री जांभेकर यांनी. तो दिवस होता ६ जानेवारी १८३२. बाळशास्री जांभेकरांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करण्याच्या हेतूने आणि मराठी पत्रकारीतेच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाने हा दिवस ‘मराठी पत्रकार दिन’ म्हणून साजरा करण्यास सुरूवात केली.

स्वातंत्र्यपूर्व काळातील वृत्तपत्रे –

स्वातंत्र्यपूर्व काळात अनेक मराठी वृत्तपत्रांची मोठी परंपरा होती. त्यात लोकमान्य टिळकांचे केसरी, खाडिलकरांचे नवाकाळ, आगरकरांचे सुधारक, पांडुरंग भागवत यांचे प्रभात, मोरोपंत अभ्यंकर यांचे तरूण भारत अशा काही वृत्तपत्रांनी मोलाचे काम केले आहे. या सगळ्या वृत्तपत्रांची प्रेरणा ही बाळशास्री जांभेकर यांनी सुरू केलेल्या मराठीतील पहिल्या वृत्तपत्राची होती. ज्या बाळशास्री जांभेकरांनी मराठी वृत्तपत्रसृष्टीचा पाया घातला त्यांच्याविषयीची माहिती आपण जाणून घेऊ.

बाळशास्री जांभेकर कोण होते ?

बाळशास्री जांभेकर यांना मराठीतील आद्य पत्रकार म्हणून ओळखले जाते. त्यांचा जन्म २० फेब्रुवारी १८१२ ला पोंभुर्ले येथे झाला. खरं तर त्यांच्या जन्माची हीच निश्चित तारीख आहे. मात्र महाराष्ट्र शासन ६ जानेवारीला पत्रकारीता दिवस साजरा करायला लागल्यापासून लोकांना तीच त्यांची जयंती आहे असे वाटते. मात्र ६ जानेवारीला त्यांनी दर्पण हे पहिले वृत्तपत्र सुरू केल्यामुळे हा दिवस पत्रकारीता दिवस म्हणून साजरा केला जातो.

बाळशास्री जांभेकर यांनी लहाणपणी वडीलांकडून मराठी आणि संस्कृतचे शिक्षण घेतले होते. पुढे ते मुंबईस आले. त्यांनी तेथे इंग्रजी, गणित, शास्र आणि संस्कृतचे शिक्षण सुरू ठेवले. फार कमी वयात त्यांनी अफाट नाव कमावले होते. वयाच्या वीस वर्षांच्या आत त्यांची बाँबे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या विद्यालयात प्राध्यापक म्हणून नियुक्ती  करण्यात आली होती. इ.स. १८३४ मध्ये एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये पहिले एतद्देशीय व्याख्याते म्हणून त्यांची नियुक्ती झाली.

बाळशास्रींना मराठी, संस्कृत, बंगाली, गुजराती, कानडी, तेलगु, फारसी, फ्रेंच, लॅटिन आणि ग्रीक इतक्या भाषांचे ज्ञान होते. त्याकाळी फ्रेंचच्या राजाकडून त्यांच्या फ्रेंचमधील ज्ञानासाठी सन्मान करण्यात आला होता. प्राचीन लिपींचा अभ्यास करून त्यांनी कोकणातील शिलालेख आण ताम्रपट यांचा अभ्यास केला होता. असे हे बाळशास्री अनेकार्थाने ज्ञानी आणि अभ्यासू व्यक्तीमत्व होते.

त्यांना इतक्या कमी वयात अफाट यश मिळाले असतानाही त्यांना समाजातील अनेक समस्या दिसत होत्या. देश पारतंत्र्यात तर होता, या प्रश्नासह आपल्या समाजात अनेक चुकिच्या रूढी,परंपरा आहेत. त्याच्या जोडीला अज्ञान, दारिद्र्य आहे याची त्यांना जाण होती. हे सर्व पाहून ते व्यथित होत. हे सर्व जर बदलायचे असेल तर समाजाचे प्रबोधन करणे आवश्यक असल्याचे त्यांना समजले आणि त्या संकल्पनेतूनच त्यांना  वृत्तपत्र सुरू करण्याची प्रेरणा मिळाली. यासाठी त्यांनी त्यांचे मित्र गोविंद कुंटे उर्फ भाऊ महाजन यांच्या मदतीने त्यांनी महाराष्ट्रात महिले मराठी वृत्तपत्र ‘दर्पण’ सुरू केले.

६ जानेवारी १८३२ ला दर्पणचा पहिला अंक प्रकाशित झाला. या वृत्तपत्राचे विशेष म्हणजे यात मराठी आणि इंग्रजी असे दोन्ही भाषेत मजकूर असे. वृत्तपत्राची किंमत एक रूपया होती. लोकांचे प्रबोधन व्हावे हाच याचा मुख्य हेतू असे. या वृत्तपत्रात येणारा मजकूर लोकांसह राज्यकर्त्या ब्रिटीशांनाही कळावा म्हणून मराठीसह इंग्रजीत मजकून असे. एकुण आठ वर्षे हे वृत्तपत्र सुरू होते. जुलै १८४० मध्ये याचा शेवटचा अंक प्रकाशित झाला. बाळशास्री जांभेकरांनी वृत्तपत्रासह इतर अनेक समाजउपयोगी कामे केली आहेत. १८ मे १८४६ ला अल्पशा आजाराने त्यांचे फार कमी वयात निधन झाले.

मराठी वृत्तपत्रांसाठी वाट निर्माण करून देणाऱ्या  बाळशास्री जांभेकर यांची आणि त्यांच्या दर्पण या वृत्तपत्राची आठवण म्हणून पत्रकार दिन साजरा केला जातो. आज महाराष्ट्रात अनेक मराठी वृत्तपत्रे पाय रोवून उभा आहेत. त्याअनुषंगाने अनेक मराठी भाषिक पत्रकारही आहेत. त्यांना सर्वांना मराठी पत्रकार दिनाच्या शुभेच्छा …..

ज्योती भालेराव      

This post was last modified on January 6, 2025 6:51 pm

Sponsored
Jyoti Bhalerao:
Sponsored

This website uses cookies.

Sponsored