X

Translate :

Sponsored

अहमदनगरचा भुईकोट किल्ला – भाग ३ (The Ahmednagar Fort)

बहमनी राजसत्तेची पाच शकले होऊन निजामशाहीची सुरूवात झाली. त्यातील निजामशाहीचा शासक मलिक अहमदशहा याने अहमदनगर येथे  त्याची राजधीनी स्थापन केली. येथे जो महालवजा किल्ला बांधला तो म्हणजेच अहमदनगरचा भुईकोट किल्ला होय. या निजामशाहीने सुमारे १२५ वर्षे सत्ता उपभोगली. एकुण ११ निजाम या कालखंडात होऊन गेले. निजामानंतर मुघल,पेशवे, ब्रिटीश अशा सत्ताधार्यांचा अंमल या किल्ल्यावर राहिला.

        या किल्ल्याच्या भिंतींनी राजकारणाचे अनेक पैलु, कट-कारस्थानं, हत्या, अमाप वैभव पाहिले आहे. हा किल्ला मुघलांच्या ताब्यात जाऊ नये यासाठी त्यावेळी एक स्त्री प्राणपणाने लढली होती. ती स्त्री होती ‘सुलताना चाँद..’ जीचे शौर्य जसे या किल्ल्याच्या भिंतींनी अनुभवले तसेच तीची तिच्याच सैनिकांनी फितुर असल्याच्या संशयावरून  केलेली हत्याही अनुभवली.

सुलताना चाँद ही निजामशहा पहिला हुसैन याची मुलगी तर विजापुरचा अली

आदिलशहा याची पत्नी होती. तिने निजामशाहीच्या संरक्षणाचे काम केले. या किल्ल्यासाठी अनेकांनी आपले प्राण गमावले इतके याचे सामरिक महत्त्व असल्याचे दिसून येते.

सुलताना चाँद हिच्या हत्येनंतर सन १६०० मध्ये पहिल्यांदा हा किल्ला मुघलांच्या ताब्यात गेला. पुढे मुघलांचा सरदार ‘कवी जंग’ याला वैयक्तिक जहागिरी बहाल करून पेशव्यांनी हा किल्ला अत्यंत मुत्सद्देगिरीने जिंकला. कालांतराने पेशव्यांकडुन हा किल्ला ब्रिटिशांनी हस्तगत केला.

निजामांनी या किल्ल्यात राहुन सत्ता आणि वैभव उपभोगल, राजकारण केल. मात्र त्यांच्या अस्ता नंतर ज्यांनी या किल्ल्यावर ताबा मिळवला त्यांनी बहुतेक करून याचा वापर कैद्यांना बंदी करण्यासाठी केला असल्याचे दिसून येते.

पेशव्यांकडे हा किल्ला असताना सन १७६७ मध्ये सदाशिव भाऊ पेशव्यांच्या तोतया प्रकरणातील तोतया आरोपी तसेच १७७६ मध्ये त्यांचे सरदार सखाराम हरी गुप्ते यांना कैदेत ठेवले होते. याशिवाय राघोबादादा यांचे अधिकारी चिंतो रायरीकर, नाना फडणविस, मोरोबा दादा, शिंदे यांचे दिवाण बाळोबा तात्या, सदाशिव मल्हार, भगिरथिबाई शिंदे यांना याच किल्ल्यात तुरुंगवास घडला.

ब्रिटिशांनीही दुसर्या महायुद्धात जर्मन कैद्यांनाही याच किल्ल्यात ठेवलं होत.
ब्रिटिशांच्या अंमलाखाली देश असताना पुढे तर त्यांनी या किल्ल्याचा वापर तुरूंग म्हणुनच केला. १९४२च्या चलेजाव आंदोलनाच्या काळात पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना आझाद, डॉ.पी.सी.घोष, पंडित गोविंद पंत, आचार्य नरेंद्र देव, आचार्य जे.बी.कृपलानी, असफ अली, पंडित हरेकृष्ण मेहताब, शंकराव देव आदि राष्ट्रीय नेते येथे बंदिवासात होते.

१९४२ च्या चलेजाव आंदोलनाच्यावेळी अनेक राष्ट्रीय नेत्यांना याठिकाणी बंदी करण्यात आले होते.

नेहरूंनी ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ हा प्रसिद्ध ग्रंथ याच ठिकाणच्या वास्तव्यात लिहिला. या ग्रंथाची काही हस्तलिखिते आजही येथे ठेवण्यात आलेली आहेत. नेहरूंचे सुबक हस्ताक्षर बघून आपण नक्कीच भारावून जातो. डॉ.पी.सी.घोष यांनीही याठिकाणी ‘हिस्ट्रि ऑफ एन्शंट इंडियन सिव्हिलायझेशन’ हा ग्रंथ लिहिला. याशिवाय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘थॉटस ऑफ पाकिस्तान’ आणि मौलाना आझाद यांनी ‘गुबार-ए-खातिर’ हे ग्रंथ याच शहरात लिहिले आहेत. या नेत्यांनी वापरलेल्या अनेक वस्तू आज येथे जतन करून ठेवलेल्या आहेत.

पंडित नेहरूंची बंदिकाळातील खोली
डिस्कव्हरी ऑफ इंडिया ग्रंथाच्या हस्तलिखीताची प्रत
डायनिंग हॉल
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मृती

सध्या हा किल्ला लष्कराच्या ताब्यात असून फक्त १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी या दिवशी पर्यटकांसाठी खुला ठेवण्यात येतो. जमिनीवर बांधलेला आणि स्थापत्यशास्राचा उत्कृष्ट नमुना असणारा हा किल्ला अहमदनगरला जाऊन एकदातरी नक्की बघायला हवा. मात्र त्यासाठी तुम्हाला स्वातंत्र्यदिवस किंवा प्रजासत्ताक दिनाचा मुहूर्त गाठावा लागेल. सद्य परिस्थितीत पर्यटनामध्ये काहीशा पिछाडीवर असणार्या अहमदनगर शहरात अशा अनेक वास्तू आहेत ज्यांचे अवशेषही प्रेक्षणीय आहेत. गरज आहे ती त्यांचे एतिहासीक महत्त्व जाणून घेत जतन व प्रसार करण्याची.  

– ज्योती भालेराव

This post was last modified on August 29, 2020 4:02 pm

Sponsored
Jyoti Bhalerao:
Sponsored

This website uses cookies.

Sponsored