कोणत्याही देशाची ओळख ही त्या देशाची संस्कृती, इतिहास, समाज म्हणजेत येथील नागरिक यावरूनच होत असते. देशातील हे नागरिक जेव्हा दुसऱ्या देशात जाऊन विविध क्षेत्रात आपली ओळख निर्माण करतात, तेव्हा सहाजिकच त्यांच्या वैयक्तिक ओळखीपेक्षाही जास्त ओळख ही त्यांच्या देशाला मिळत असते.
आज अनेक भारतीय जगातील विविध देशांमध्ये शिक्षण आणि नोकरी निमित्त स्थलांतरित होत असतात. अशा प्रवासी भारतीयांचा गौरव करण्याच्या निमित्ताने दरवर्षी प्रवासी भारतीय दिन साजरा केला जातो. मिसलेनियस भारतच्या या पानावर आपण या प्रवासी भारतीय दिनाची माहिती घेणार आहोत.
Table of Contents
भारतीय प्रवासी दिन कधी साजरा करतात ?
दरवर्षीच्या जानेवारी महिन्याच्या ९ तारखेला हा दिवस भारतीय प्रवासी दिन म्हणून साजरा केला जातो.
कोणाच्या संकल्पनेतून हा दिवस साजरा होतो ?
पहिला प्रवासी भारतीय दिवस सन २००३ मध्ये ९ ते ११ जानेवारी या दरम्यान भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या कल्पनेतून साजरा करण्यात आला होता.
कसा साजरा केला जातो हा दिवस ?
परदेशात राहून विविध क्षेत्रात मौलिक योगदान देणाऱ्या भारतीयांना प्रवासी भारतीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.या दिवसाच्या निमित्ताने परदेशात स्थायिक झालेल्या भारतीयांचे आपल्या देशाविषयीची मते जाणून घेतली जातात. प्रगत देशांच्या तुलनेत भारताने अन्य कोण कोणत्या सुधारणा, संकल्पना राबवायला हव्यात या विषयीची चर्चा घडवून आणण्याचे व्यासपीठ म्हणून हा दिवस महत्त्वाचा ठरतो.
भारताबाहेर राहून कला, व्यवसाय, विज्ञान अशा क्षेत्रांमध्ये काही संस्था निर्माण केल्या असतील किंवा काही विशेष नैपुण्या मिळाले असेल तर त्या अनिवासी भारतीयांचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. या दिवसामुळे अनिवासी भारतीयांचे भारतातील तरूण पिढीला बाहेरील देशात करियरच्या, शिक्षणाच्या कुठल्या संधी आहेत याचे मार्गदर्शन मिळते.
भारताबाहेरून काही आर्थिक गुंतवणूकीच्या संधी मिळतात का ? आणखी कोणते क्षेत्र आहेत ज्याने तरूणांना रोजगार मिळू शकतो अशा अनेक बाबतीत हे अनिवासी भारतीय मार्गदर्शन करतात. म्हणूनच या भारतीय प्रवासी दिनाचे महत्त्व आहे.
कोणातर्फे करण्यात येतो सन्मान ?
प्रवासी भारतीय दिनाच्या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन भारत सरकारच्या अनिवासी भारतीय कार्य मंत्रालय, उत्तर पूर्वी क्षेत्र विकास मंत्रालय, फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रिज आणि कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री यांच्या सौजन्याने करण्यात येते.
साधारण ७ ते ९ जानेवारी दरम्यान भारतातील एखाद्या शहरात प्रवासी भारतीय दिनाचे आयोजन करून अनेक सोहळे आणि कार्यक्रम आखले जातात. २००३ पासून २०१५ पर्यंत दरवर्षी सलग हे कार्यक्रम आयोजित करण्यात आले. मात्र २०१५ नंतर दर दोन वर्षांनी हा दिन साजरा केला जातो.
प्रवासी भारतीय दिनाचा इतिहास –
हा दिवस जरी सन २००३ ला सुरू करण्यात आला असला तरी याच्या मागची प्रेरणा बरीच जुनी आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात दक्षिण अफ्रिकेतील आंदोलन पुर्ण करून महात्मा गांधी भारतात परतले तो दिवस होता ९ जानेवारी १९१५. म्हणजे या अर्थाने खरं तर त्याकाळातील महात्मा गांधी हे खरे अनिवासी भारतीय होते ज्यांनी अनेक वर्षे परदेशात वास्तव्य करून आपल्यासह देशाचे नाव उंचावले होते. एक भारतीय दक्षिण अफ्रिकेतील जनतेला मार्ग दाखवतो हि गोष्ट मोठी अभिमानास्पद होती. भारतात ते परतल्यावर त्यांचे मोठ्या उत्साहाने स्वागत करण्यात आले.
पुढे त्यांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात महत्त्वाची राजकीय भूमिका वठवली. त्यांच्या दक्षिण अफ्रिकेतील कामगिरीप्रित्यर्थ तेथून त्यांच्या परतीच्या दिवसाची कायमस्वरूपी आठवण म्हणून ९ जानोवारी हा दिवस प्रवासी भारतीय दिन म्हणून साजरा केला जातो. २०२३ मध्ये इंदौर येथे प्रवासी भारतीय दिन साजरा करण्यात आला होता. यावर्षी ८ ते १० जानेवारी दरम्यान ओडीसा मधील भूवनेश्वर येथे हा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला आहे.
काय आहे २०२५ च्या कार्यक्रमाची रूपरेषा –
- ८ जानेवारी २०२५ पहिला दिवस – प्रवासी भारतीय तरूणाई दिवस विशेष
- ९ जानेवारी २०२५ दुसरा दिवस – १८ व्या प्रवासी भारतीय दिवसाच्या समारंभाचा उद्धाटन सोहळा
- १० जानेवारी २०२५ – तिसरा दिवस – प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कार प्रदान सोहळा
अशा तीन दिवसीय कार्यक्रमांच्या रूपरेषे नुसार यंदाचा प्रवासी भारतीय दिनाचा सोहळा पार पडणार आहे.
आज पर्यंतचे प्रवासी भारतीय दिन सोहळ्यांची ठिकाणे –
- २००३ – प्रथम प्रवासी भारतीय दिन – नवी दिल्ली
- २००४ – द्वितीय प्रवासी भारतीय दिन – नवी दिल्ली
- २००५ – तृतीय प्रवासी भारतीय दिन – मुंबई
- २००६ – चौथा प्रवासी भारतीय दिन – हैद्राबाद
- २००७ – पाचवा प्रवासी भारतीय दिवस – नवी दिल्ली
- २००८ – सहावा प्रवासी भारतीय दिवस – नवी दिल्ली –
- २००९ – सातवा प्रवासी भारतीय दिवस – चेन्नई
- २०१० – आठवा प्रवासी भारतीय दिवस – नवी दिल्ली
- २०११ – नववा प्रवासी भारतीय दिवस – नवी दिल्ली
- २०१२ – दहावा प्रवासी भारतीय दिवस – जयपूर
- २०१३ – अकरा प्रवासी भारतीय दिवस – कोचीन
- २०१४ – बारावा प्रवासी भारतीय दिवस – नवी दिल्ली
- २०१५ – तेरावा प्रवासी भारतीय दिवस – गांधी नगर
- २०१७ – चौदावा प्रवासी भारतीय दिवस – बैंगलोर
- २०१९ – पंधरा प्रवासी भारतीय दिन – वाराणसी
- २०२१ – सोळावा प्रवासी भारतीय दिन कोरोनो साथीमुळे हा कार्यक्रम आभासी (ऑनलाईन ) साजरा करण्यात आला.
- २०२३ – सतरावा प्रवासी भारतीय दिन – इंदौर
- २०१५ – अठरावा प्रवासी भारतीय दिन – भुवनेश्वर, ओडीसा.
अशा प्रकारे देशाबाहेर राहून देशाच्या उन्नतीसाठी आपला हातभार लावणाऱ्या अशा अनेक अनिवासी भारतीयांच्या सन्मानाचा हा क्षण असतो. मिसलेनियस भारत आणि मिसलेनियस वर्ल्डतर्फे सर्व अनिवासी भारतीयांना शुभेच्छा.
ज्योती भालेराव.
This post was last modified on January 8, 2025 3:09 am